कर्नाटकातील 223 पैकी 217 आमदार कोट्यधीश : एडीआर

0
5

>> 122 आमदारांविरुद्ध फौजदारी खटले, 77 जणांविरुद्ध गंभीर गुन्हे नोंद

कर्नाटक इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने कर्नाटक 2023 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी 224 पैकी 223 उमेदवारांच्या स्व-शपथ प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले असून, विश्लेषण केलेल्या 223 विजयी उमेदवारांपैकी 217 म्हणजेच 97 टक्के आमदार कोट्यवधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या विश्लेषणात 221 आमदारांपैकी 215 म्हणजेच 97 टक्के आमदार कोट्यधीश होते.

विजयी 223 विजयी उमेदवारांपैकी 122 म्हणजेच 55 टक्के विजयी उमेदवारांनी स्वतःविरुद्धचे फौजदारी खटले घोषित केले आहेत. त्यातील 77 म्हणजेच 32 टक्के विजयी उमेदवारांनी स्वतःविरुद्ध गंभीर गुन्हेगारी प्रकरणे घोषित केली आहेत. 2018 मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या विश्लेषणात 221 आमदारांपैकी 77 म्हणजेच 35 टक्के आमदारांनी स्वतःविरुद्ध गुन्हे नोंद असल्याची माहिती दिली हेोती.
काँग्रेसच्या 134 विजयी उमेदवारांपैकी 78, भाजपच्या 66 विजयी उमेदवारांपैकी 34, जेडीएसच्या 19 विजयी उमेदवारांपैकी 9 आणि कल्याण राज्य प्रगती पक्षाच्या विजयी 1 उमेदवाराने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात स्वत:विरुद्धचे फौजदारी खटले घोषित केले आहेत.

विजयी 79 (35 टक्के) उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता 5वी पास आणि 12वी उत्तीर्ण असल्याचे घोषित केले आहे, तर 139 (62 टक्के) विजयी उमेदवारांनी पदवी आणि त्याहून अधिक शैक्षणिक पात्रता असल्याचे घोषित केले आहे. 5 विजयी उमेदवार डिप्लोमाधारक आहेत. 64 (29 टक्के) विजयी उमेदवारांचे वय 25 ते 50 वर्षांच्या दरम्यान, तर 156 (70 टक्के) विजयी उमेदवारांचे वय 51 ते 80 वर्षे दरम्याने आहे. 3 विजयी उमेदवार 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

विश्लेषण केलेल्या 223 विजयी उमेदवारांपैकी 10 (5 टक्के) विजयी उमेदवार महिला आहेत. 2018 मध्ये 221 आमदारांपैकी 7 (3 टक्के) आमदार महिला होत्या. दरम्यान, काँग्रेसचे आमदार केलचंद्र जॉसेफ जॉर्ज यांच्या शपथपत्राची संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याने त्याचे विश्लेषण करण्यात आलेले नाही.

शिवकुमार यांनी दिल्ली दौरा टाळला

कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठा विजय संपादन केला असला तरी मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोन नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. याच पार्श्वभूमीवर काल दिल्लीत काँग्रेसने बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी सिद्धरामय्या दिल्लीत दाखल झाले, तर शिवकुमार यांनी दिल्ली दौरा टाळला. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार या दोन्ही नेत्यांना या बैठकीसाठी दिल्लीत बोलावले होते. शिवकुमार यांनी स्वत: या बैठकीबाबतची घोषणा केली होती. या घोषणेनंतर काही तासांतच शिवकुमार यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला. मला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने आपण दिल्लीत जाणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवकुमार ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिली.
काँग्रेसचे 135 आमदार आहेत. माझ्याकडे एकही आमदार नाही. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? हा निर्णय मी पक्षाच्या हायकमांडवर सोडला आहे, असेही शिवकुमार यांनी सोमवारी सांगितले.