करिअर आणि संस्कृती

0
205

– प्रा. रामदास केळकर

जबाबदारी शाळेपुरती किंवा सरकारपुरती मर्यादित नसून ती तुम्हा-आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. हा देश चालविण्यासाठी याच देशाचे नागरिक पुढे यायला हवेत. त्यासाठी योग्य ती संस्कृती आपणच निर्माण करायची आहे. यासाठी माहितीची गंगोत्री आपल्या मदतीला आहेच.

आपण नेहमी एकाच नजरेने गोष्टींचा विचार करतो पण ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे सगळे करत असतो त्यांचेही विचार आपण जाणून घेतले पाहिजेत ना!

हल्लीच क्रीडा आणि युवा संचालनालयातर्फे तीन दिवसांचे व्यक्तिमत्व विकास शिबिर पणजीच्या मिनेझिस सभागृहात संपन्न झाले. पणजी तसेच आसपासच्या अनेक उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. यामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली. माझ्या सत्रानंतर काही विद्यार्थी मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी मला भेटले. त्यांच्या समस्या तशा जुजबी होत्या. मला अमुक करणे जमेल का? त्यासाठी मला काय प्रयत्न करावे लागतील इत्यादी. आज आपण माहितीच्या युगात असूनही अशा समस्या असाव्यात?… यावर विश्वास बसत नाही पण वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. यातूनच करिअरमधल्या अडचणी आहेत याची कल्पना येऊ लागली. आपण नेहमी एकाच नजरेने गोष्टींचा विचार करतो पण ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे सगळे करत असतो त्यांचेही विचार आपण जाणून घेतले पाहिजेत ना!

आंतरिक गुण महत्त्वाचे!

एका जत्रेत एक फुगेवाला हवेत जाणारे रंगीबेरंगी फुगे विकत होता. फुग्यांचे आकर्षण मुलांना जास्त असते. त्या फुगेवाल्याच्या मागोमाग एक मुलगा सारखा फिरत होता. फुगेवाल्याच्या लक्षात ते आले. त्याने त्या मुलाला ‘तुला फुगा हवा का रे?’, असे विचारले. त्यावर तो मुलगा म्हणाला, ‘मला फुगा घ्यायचा तर आहेच पण मला एक शंका आहे ती मी विचारु का?’ फुगेवाला म्हणाला ‘नक्कीच विचार’. मुलगा म्हणाला, ‘काळ्या रंगाच्या फुग्यात हवा भरता येईल का? आणि तो आकाशात उडेल का?’ त्या फुगेवाल्याने त्या मुलाकडे बारकाईने पहिले. तो मुलगा काळा होता. फुगेवाला म्हणाला, ‘अरे मुला, फुग्याचे वर जाणे हे त्याच्या रंगावर अवलंबून नसते तर त्यामध्ये असलेल्या हवेवर अवलंबून असते’. त्याच्या या उत्तराने मुलगा खुश झाला. फुगेवाल्यालाही या मुलाच्या प्रश्नाचे कौतुक वाटले आणि त्याने त्याला एक फुगा बक्षीस म्हणून दिला. मित्रहो, करिअरच्या बाबतीत हेच घडत असते. अनेकांना न्युनगंडाने पछाडलेले असते. त्यांना योग्य ती माहिती तर दिलीच पाहिजे शिवाय प्रोत्साहन देऊन त्यांच्या मनातील शंका दूर केल्या पाहिजेत.

गुणपत्रिकेवरच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरविणारी मानसिकता आपल्या अनेक विद्यार्थ्यांना योग्य ते करिअर निवडायला अडचणीची ठरते. गुणपत्रिकेशिवायही आपण उत्तम करिअर करु शकतो याचे वास्तव भान आपण विद्यार्थ्यांना देण्यात कमी पडतो… ही वस्तुस्थिती आपण नाकारु शकत नाही. यशाचे शिखर गाठण्यासाठी बाह्य रंग म्हणजे गुण आवश्यक नसतात तर आपल्यातील अंतरीचे आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टि, धाडस, सातत्याने परिश्रम करण्याची तयारी आदी गुण महत्वाचे ठरतात. धीरूभाई अंबानीकडे प्रमाणपत्रांची भेंडोळी नव्हती पण त्यांच्याकडे धाडस, आत्मविश्वास, रोजची मळवाट न तुडविण्याचा निर्णय या गोष्टी त्यांच्यात होत्या. अमुकच क्षेत्रात करिअर असते, अमुक क्षेत्रात नसते ही मानसिकता आपल्याला यशाची झेप घ्यायला मागे खेचते.

उप-करिअरचा विचार व्हावा…

आपल्या देशातील काही भागात अजूनही दारिद्रय, काबाडकष्ट, पुरेसे अन्न नाही, देह झाकण्यासाठी पुरेसे वस्त्र नाही, हलाखीच्या जीवनाशिवाय पर्याय नाही… असे चित्र आहे तर दुसरीकडे सधन कुटुंब, मोबाइल, मोटरसायकल अन्य व्यसनांमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेल्या मुलांचे विश्व. यातून करिअरचा कोणता पर्याय यांच्यापर्यंत पोचवावा? कष्टाशिवायचे करिअर कोणते? असाही भाबडा प्रश्न त्यांच्यासमोर असू शकतो. कष्ट कोणते आणि कशा प्रकारचे? हे समजण्याची कुवत त्या मुलात कितपत आहे? आणि पालकही त्या बाबतीत काय सांगणार? आजकाल विद्यार्थी-पालकांना चकाकणार्‍या विश्वातील करिअरची माहिती घ्यावीशी वाटते किंवा असे करिअर त्यांच्या लक्षात राहतात. पण त्यांच्यामागे असलेल्या ताणाची, त्यांच्यातील तोट्यांची कल्पना जाणून घ्यायची आपली तयारी नसते, इच्छाही नसते. डॉक्टर, अभियांत्रिकी संगणक शिक्षण झालेच तर ‘शिक्षकी पेशा’ या करिअरकडे आकर्षित होण्याचे एक कारण म्हणजे त्या क्षेत्राला असलेले वलय आणि मान्य करा वा न करा त्यामागची आर्थिक मिळकतदेखील आकर्षणाचा भाग ठरते. नाही म्हणायला एखादी संगीता, एखादा विशाल आर्मीत जाण्याचा विचार मनात आणते/आणतो. एखादा संजय, एखादी मिनल नागरी सेवा स्पर्धेची माहिती घ्यायला उत्सुक असते पण हे अपवाद! आपल्याकडे मोठे शिक्षण नसले पण आपण दुरुस्तीमध्ये चांगले आहोत ह्याची कल्पना असणार्‍यांना इथेच चांगला व्यवसाय करण्याची संधी असते. एखाद्या वाहनावरून कितीतरी करिअरच्या शाखा आपण समजून घेऊ शकतो.

वाहनासाठी शोरूम खुला करणे… यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असतेच पण त्यातून तुम्ही काहींना रोजगार देऊ शकता. त्यानंतर नवीन गाडीचा विमा; आर.टी.ओ.तील नोंदणीसाठी आपल्याला काम करून देणारा एजंट पाहिजे; दुरुस्तीसाठी मेकॅनिक पाहिजे; त्याच्यासोबत नंबर प्लेटस रंगविणारा; दुचाकी- चारचाकीच्या रंगारीचे काम जाणणारा हवा; स्पेअरपार्ट विकणारा दुकानदार हवा; दुचाकी-गाडी शिकविणार्‍या शाळा चालविणारे पाहिजेत. यात आणखीही भर घालता येईल. .. पण आपण अशा उप-करिअरचा कधी विचार करतो का? असा विचार करण्यासाठी प्रोत्साहन देतो का? अशीच यादी अन्य सभोवती आढळणार्‍या अन्य करिअरची करता येईल. आज विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची फारशी चिंता आहे असे वाटत नाही. कुठेतरी नोकरी मिळाली की गंगेत घोडे न्हाले. घरी- दारी- आसपास… ‘किती मार्क मिळाले..’ आणि ‘पुढे कुठल्या कोर्सला जाणार…’ याच्यापलीकडे संवाद ऐकण्याची सवयच आपण लावून घेतलेली नाही. त्यामुळे मुलेही मार्कांच्या पलीकडचे विश्व जाणून घ्यायला सहसा तयार होत नाहीत.

जीवनाचा हेतू मुलांना सांगावा..

 

शाळेत गेल्यानंतर त्याला कोणी… ‘काल बाबा तू कुठले चांगले काम केलेस?… कुणाला मदत केलीस का?… घरच्या मंडळीना सोडून अन्यत्र कुणाच्या मदतीला गेलास का?’ … याचा आलेख कधी कोणी घेत नाही. त्यामुळे मुलाचे विश्व सीमित होऊन जाते. पूर्वी एकत्र कुटुंबीय असायचे त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त ज्यादा माहिती देण्याचे काम कुणीतरी घरातील ज्येष्ठ मंडळी करीत. परंतु आता विभक्त कुटुंबात बिर्‍हाड संस्कृती तर आलीच. शिवाय मुले एक तर टीवी-व्हिडीओ गेम्स, आणि आता मोबाइलच्या आहारी गेली किंवा मोलकरणीच्या ताब्यात पोचली. या मार्गातून त्यांना कोणती माहिती मिळणार? माहिती जरूर मिळेल, पण ती घातकी ठरणारीही असू शकते. आत्महत्येचे प्रकार वाढत आहेत.. ही चिंतेची बाब निश्चित आहे, पण ते करणार्‍यात वयाची पातळी कमी कमी होत चाललेली आहे. पूर्वी आजारपण, कर्जबाजारी होणे, नोकरी न मिळणे, प्रेमभंग आदी ठराविक कारणे असत आणि याचे बळी जास्त वयाचे किंवा वयात आलेले असत. पण आता कुठल्याही कारणासाठी आत्महत्या होऊ शकते. यात नैराश्य, एकाकीपणा तर आहेच पण क्षुल्लक कारणासाठीही आत्महत्या केल्या जात आहेत. मोबाइल न मिळाल्याने, परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून, आदी कारणे पाहिली की आपल्या जीवनाचा हेतूच या पिढीला समजण्यात किंवा समजविण्यात कुठे तरी त्रुटी निर्माण झाली आहे हे लक्षात येते.

आईवडील किती खस्ता खाऊन पैसे कमावतात ह्याची कल्पना मुलांना कुठे असते? ते आपल्याच विश्वात रममाण झालेले असतात. जसे आईवडिलांचे त्रास तद्वत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे त्रास, हालअपेष्टा, यातना, त्यांनी केलेला त्याग, दिलेली प्राणाहुती याची नव्या पिढीला कुणी जाणीव करून देतो का? एखादे व्याख्यान ऐकल्यानंतर आपण सर्वजण माना डोलावतो, वक्त्याने मांडलेले विचार आपल्याला पटतात. पण पुढे काय? हे सर्व कुणीतरी सांगायला हवेच.. असे म्हणत तिथून आपण घरी येतो. पुढे काहीच घडत नाही. सरकारने आर्थिक मदत देऊन विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी येथे जाण्याची व्यवस्था केली, त्याचा लाभ अनेकजण घेतात हे खरे असले तरी त्या स्वामीजींप्रमाणे देशसेवेचे करिअर करण्यासाठी कुणीच का बरे प्रवृत्त होत नाही? अंदमानमधील सेल्युलर जेल, स्वा. सावरकरांच्या तेथील वास्तवाच्या मरण यातना.. आपण त्यांच्या पुस्तकातून वाचत असतो. तिथे आयोजित होणारा ‘लाईट साउंड शो’तून आपल्याला बरीच माहिती ऐकायला मिळते. डॉ. अजय वैद्य यांनी तर यावर नीटनेटका कार्यक्रमही तयार करून शाळांमधून सादर केला आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्ञात-अज्ञात अशा कित्येकांनी प्राणाहुती दिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले बलिदान याची माहिती आजच्या पिढीला असती तर अशा बेफिकीरीने वागणारी पिढी तयार झालीच नसती.

संस्कृति निर्मिती करणे गरजेचे!

शाळेत मोबाइल, मोटरसायकल आणू नये.. पालकांनी मुलांचे यासाठी लाड करू नये… यातच ज्येष्ठांनी आपला अमूल्य वेळ घालवायचा? समाजात वावरताना शिस्तीत वागावे, चेंगराचेंगरी करू नये, अडचणीत असलेल्याला मदत करावी, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता – शांतता राखावी एवढेही काम आपल्या स्वतंत्र भारतात आपण करणार नाही आहोत का? म्हणून तर आता यापुढे समाजसेवक म्हणून करीयर करण्यासाठी आपणाला आग्रह धरावा लागेल.

रस्त्यावरची रहदारी पहिली कि आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत कि गुलाम आहोत… हेच समजत नाही. दिलीच्या मेट्रोत ज्यांनी प्रवास केला असेल त्यांच्या लक्षात येईल कि तिथे बहुतेक प्रवासी काही सेकंदाच्या आत शिस्तीत डब्यात चढतात – उतरतात, डब्यात स्वच्छता ठेवतात. हे वातावरणच एक प्रकारची संस्कृती निर्माण करायला मदत करते. आज आपल्याला अशाच संस्कृतीची निर्मिती करावी लागणार आहे … जेणेकरून करीयर म्हणजे अमुकच शाखेत जायला हवे, अमुकच शिक्षण घ्यायला हवे याची चिंता कुणालाही न पडता आपल्या कुवतीप्रमाणे जे जमेल त्यामध्ये करीयर करायला प्रत्येकजण उत्सुक असेल. ही जबाबदारी शाळेपुरती किंवा सरकारपुरती मर्यादित नसून ती तुम्हा आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. हा देश चालविण्यासाठी याच देशाचे नागरिक पुढे यायला हवेत. त्यासाठी योग्य ती संस्कृती आपणच निर्माण करायची आहे. यासाठी माहितीची गंगोत्री आपल्या मदतीला आहेच.

मंदिरात शिवलिंगावर दुधाचा अभिषेक केल्यास दुष्काळ दूर होईल असे एका राज्यात कोणीतरी साधू पुरुष राजाला सांगतो, त्याप्रमाणे राजा दवंडी पिटवतो. अमुक दिवशी दुग्धाभिषेक करण्याचे आवाहन केले जाते खरे; पण त्या दिवशी राजाच्या लक्षात येते कि दुधाचा अभिषेक करायला कुणीच आलेले नसते. त्याचे कारण समजून घ्यायचा राजा प्रयत्न करतो तेव्हा त्याला समजते ते असे, प्रत्येकाने विचार केलेला असतो कि दुसरा दुध नेईल मी का जाऊ? प्रत्येक जणाच्या मनात हाच विचार येतो. आपल्या मनात असा विचार येणार नाही ही अपेक्षा. हल्लीच एका कार्यक्रमाला गेलो होतो तिथे अन्यत्र दुसरा कार्यक्रम होणार होता, त्याची चौकशी करायला एक ज्येष्ठ नागरिक त्या कक्षात गेला पण तेथील आयोजकांपैकी एकानेही त्याला नीट उत्तर दिले नाही. उलट त्याला भलतेच प्रश्न विचारून भंडावून सोडले. बिचारा हिरमुसला होऊन दुसर्‍या कार्यक्रमासाठी चालता झाला. शेवटी आपल्याच नागरिकाने आपल्याच नागरिकाला दिलेली ही वागणूक. संस्कृतीनिर्मिती ही म्हणूनच सर्वांचीच जबाबदारी आहे.