कन्याकुमारीतून कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू

0
10

>> विरोधी पक्षाचा एकही नेता भाजपला घाबरणार नाही : राहुल गांधी

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या कॉंग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला कालपासून कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधींच्या हाती तिरंगा ध्वज सोपवल्यानंतर ही यात्रा सुरू झाली. दरम्यान, गोव्यातून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व अन्य काही कार्यकर्त्यांनी या यात्रेत भाग घेतला.

कन्याकुमारी येथून कॉंग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी राहुल गांधींनी तामिळनाडूमध्ये श्रीपेरुंबदुर येथील वडिलांच्या स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केले. श्रीपेरुंबदुर येथेच २१ मे १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. ही यात्रा १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. दररोज २१ किमी चालल्यानंतर १५० दिवसांत ३ हजार ५७० किमी. अंतर कापून ही यात्रा काश्मीरमध्ये पोहोचणार आहे.
यात्रेला सुरुवात केल्यानंतर राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला. त्यांना (भाजप) वाटते की, ते सीबीआय, ईडी आणि आयटीचा वापर करून विरोधकांना घाबरवू शकतात. मात्र ते भारतीय नागरिकांना ओळखत नाहीत. भारतीय घाबरत नाहीत. विरोधी पक्षाचा एकही नेता भाजपला घाबरणार नाही, असे गांधी म्हणाले.

राष्ट्रध्वज हा या देशात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा आहे; मात्र त्यांना (भाजप आणि आरएसएस) वाटते की हा झेंडा त्यांची वैयक्तिक मालमत्ता आहे. देशाचा तिरंगा ध्वज हा आपली खासगी मालमत्ता आहे, अशी समजूत भाजप नेत्यांची आहे. प्रत्यक्षात हा ध्वज प्रत्येक भारतीय नागरिकाचे प्रतिनिधित्व करतो. हा तिरंगा आपल्याला सहजासहजी मिळालेला नाही. तसेच हा तिरंगा ध्वज कोणी एका व्यक्तीने मिळवलेला नाही, तर तो प्रत्येक भारतीयाने स्वातंत्र्यलढ्यातून मिळवला आहे, असे ते म्हणाले.

याशिवाय, आज भारत सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मूठभर मोठे उद्योग आज संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवतात. पूर्वी भारतावर नियंत्रण ठेवणारी ईस्ट इंडिया कंपनी होती आणि आज संपूर्ण भारताला तीन-चार मोठ्या कंपन्या नियंत्रित करत आहेत, असे गांधी म्हणाले.