कथा मुलाची, व्यथा आईची

0
1060
  •  नीना नाईक

‘कॉलेज सुरू झाल्यापासून तो फक्त दोन-तीन दिवस आला होता’. आता मी अश्रू थांबवू शकले नाही. पोरगं हातातून गेलं हे ठळक दिसलं… तिरमिरत घरी आले. ऑफिसात कळवले तब्येत खराब आहे. तो रुममध्ये होता.

आज सकाळपासून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ऍडमिशनसाठी खास नव्हती. दररोज उसळणारी गर्दी पाहता आज उसंत मिळेल असे वाटले होते. आज सर्व पसारा आटपायचा असा विचार करत ड्रॉवर बाहेर काढला. असंख्य पेपर हातावेगळे केले. त्यांची अनुक्रमणिकेप्रमाणे केव्हा कसे काय करायचे याचा आढावा घेतला. सर्व जागेवर नीटनेटके झाल्यावर मी सुस्कारा घेत इतर कामाची आखणी करण्यात मग्न होते, तेवढ्यात नीटनेटकी, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची महिला आत आली. जुजबी माहिती विचारल्यावर तिने आपल्या लेकाची दहावीची गुणपत्रिका माझ्यासमोर ठेवली. पंच्यांशी टक्के. मी मान वर करून तिच्याकडे पाहिले. माझ्या चेहर्‍यावरचे आश्‍चर्य लपू शकले नाही. सहजच भुवया उंचावल्या. तिने खजिल होत मानेनेच होकार दाखवला. डोळे मिचकावले. याला ‘ओपन स्कूल’ का? असा माझ्या मनात विचार आला. खुर्चीचा मान असावा मी माझी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तिने माझ्या विचारांची साखळी तोडली आणि अकरावीचा रिझल्ट हातावर ठेवला. सायन्सचा विद्यार्थी अर्ध्याअधिक विषयात नापास. थोडंसं गूढच वाटले. त्या काही बोलतील अशी अपेक्षा होती. माय-लेक स्तब्ध होते. त्याला रुळावर आणण्यासाठी त्याची माहिती करून घेणे गरजेचे होते. मुलाला.. ‘जरा बाहेर बस’… असं सांगत रूमच्या बाहेर ठेवले. मोर्चा आईकडे वळवला. डोळ्यांनीच इशारा केला आणि ‘सांगा’ इतकं म्हणायचा अवकाश, आई धडाधडा ट्रेन रुळावरून जावी तशी बोलू लागली.
‘‘मी महाराष्ट्रातून आले. ‘परभणी’ आमचं गाव. तिथे मी नोकरी करते. वडीलही उच्च पदावर आहे. माझा मुलगा लहानपणापासून अत्यंत हुशार. त्यात एकुलता एक. त्यामुळे अत्यंत लाडात वाढलेला. आम्ही त्याला काहीच कमी पडू दिलं नाही. तोंडातून एखादी गोष्ट बाहेर पडली की हजर होत असे. दोघेही कमवत होतो. आम्ही ज्या गोष्टींपासून वंचित होतो परिस्थितीमुळे काही मागे राहिलेल्या आशा- आकांक्षा त्या आम्ही मुलांत पाहत होतो. नोकरीत असलो तरी त्याचे क्लासेस, त्याच्या हौशी-मौजी, कराटे, तबला शिकणं चालू होतं. आखिव-रेखीव संसार. त्याची ने-आणण्याची सोय चोख होती. त्याची गैरसोय होऊ नये याची खबरदारी दोघेही घेत होते. दहावीत उत्तम मार्क मिळाले. त्यात आमचा आनंद द्विगुणित झाला आणि त्याच्या हट्टापायी त्याला आम्ही लेटेस्ट फोन घेऊन दिला. फोन हातात पडल्या पडल्या त्याने सर्व जाणून घेतले. आता त्याला कुणाचीच गरज वाटत नव्हती. तो नि त्याचा फोन… हेच त्याचे विश्‍व झाले. घर आणि कॉलेज यात तो रमला, असं आम्हाला वाटत राहिलं. त्याला काही विचारले की तुटक उत्तरं मिळू लागली. वाढतं वय असल्याने पौगंडावस्था म्हणत दुर्लक्ष केले. त्याला त्याची ‘स्पेस’ हवी आहे, हे तो म्हणे. स्पेसचा अर्थ आम्हाला कळला नाही पण प्रश्‍न-उत्तरांचा तास आम्ही पूर्णपणे बंद केला.

दिवस भराभर निघून गेले. कॉलेजमध्ये गेल्यापासून त्याच्या वह्या पाहणे मी बंद केले होते. मी बँकेत काम करत असल्याने मुलाच्या कॉलेजमध्ये शिकवणार्‍या प्रोफेसरांची अकाउंट्‌स आमच्या शाखेत होती. तसेच गावात तसे एकमेकांना ओळखणारेही असतात. आपलेच दात आणि आपलेच ओठ. मुलातील बदल जगासमोर मांडण्यात अर्थ नव्हता. तरी उत्सुकता म्हणून मी कॉलेजात प्रोफेसरांना मुलाबद्दल माहिती विचारायचे ठरवले. मी अमुक अमुक…..ची आई. प्रस्तावना प्रोफेसरांसमोर मांडली. अनेक विद्यार्थी असल्याने त्यांनी मला सांगितले, ‘‘पुढच्या वेळी येईन तेव्हा तुम्हाला सांगेन. आता माझ्या डोळ्यासमोर तो विद्यार्थी येत नाही’’. चार-पाच दिवसांनी सर बँकेत आले. माझ्यासमोर बसले. मी त्यांच्याकडे आशेने पाहात होते. सरांनीच विषय काढला. ‘‘अहो! तुमचा मुलगा नियमित कॉलेजात येत नाही’’. माझ्या पायाखालची जमीन सरकली. तोंडाचा आऽऽ तसाच राहिला. ‘‘सर, मीच त्याला कॉलेजात सोडते. तो येत नाही असं होणार नाही.’’ सरदेखील बुचकाळ्यात पडले. धीरगंभीर आवाजात म्हणाले, ‘‘नीट लक्ष द्या.’’ माझं मन सैरभैर झालं. कामात लक्ष लागेना. त्याला मी फोन केला. मुलाने सांगितले आपण कॉलेजात आहो. मी मनाची समजूत घातली. सरांची चूक झाली वाटतं त्याला ओळखण्यात. परत कामात गुंतवून घेतले. घरी आल्यावर नवर्‍याच्या कानावर सर्व कथा घातली. मुलाच्या रुममध्ये जाऊन पाहिले. खात्री करून घेतली की तो अभ्यास करतोय. एकदा मनात पाल चुकचुकली की शहानिशा करायला हवा म्हणून त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. तो कॉलेजात येतो ना. त्यांनीही केच सांगितले की मध्येमध्ये येतो पण कुणाच्यात मिसळत नाही. उत्तर धड नसतं. मुलावर अत्यंत विश्‍वास आम्हा दोघांचा. त्यामुळे सर्वच जग खोटे बोलते आहे असे वाटले.

मी खोलीत जाऊन इथे-तिथे फोन करून प्राथमिक चौकशी करते याचा राग माझ्या नवर्‍याला यायला लागला. आमचे खटके उडू लागले. सर्व कसं पटपट होत होतं. मधले काही दिवस बेचैन गेले, मी एक दिवस कॉलेज गाठले. त्याला कॉलेजजवळ सोडले. ऑफिसात आले आणि मग परत कॉलेजात गेले. वर्ग माहिती होता. सरांशी ओळख झाली होती. इतरही प्रोफेसरांशी जुजबी ओळख होती. तो क्लासमधे नव्हता. मी सरांची अनुमती मागितली व हजेरीचा पट पहायला मिळेल का हे विचारले. त्यांनी शिपायाकडून मागवला आणि त्याच्या समोर पट्टी धरली. कॉलेज सुरू झाल्यापासून तो फक्त दोन-तीन दिवस आला होता. आता मी अश्रू थांबवू शकले नाही. पोरगं हातातून गेलं हे ठळक दिसलं.

तिरमिरत घरी आले. ऑफिसात कळवले तब्येत खराब आहे. तो रुममध्ये होता. त्याला माझ्या अचानक येण्याची कल्पना नसल्याने तो गांगरला. मोबाईलवरचं चॅट थांबवणं शक्य नव्हतं. माझी नजर भिरभिरत होती. राग अनावर झाला होता. मी मोबाईल माझ्या ताब्यात घेतला. व्हिडिओ कॉलवर कुणीतरी मुलगी होती. माझं थोबाड पाहून तो फोन बंद झाला. मी त्याला बसवून विचारले की ‘तू कॉलेजात का जात नाहीस?’ त्याने धडधडीतपणे सांगितले, ‘‘मला कॉलेजात जायला आवडत नाही. शिकवलेलं कळत नाही.

ट्यूशनमध्येही तेच शिकवतात.’’ प्रॅक्टिकलचे काय?’’ तो निरुत्तर झाला. फोनवरची मुलगी कोण हे मात्र मी विचारायचे टाळले कारण मैत्रिणींचा फोन यापूर्वीही त्याला येत असे. काही अडचणी असल्या तर त्याला विचारत, त्यात नावीन्य नव्हते. माझ्या कटकटीला वैतागून त्याने सांगितले की आपण उद्यापासून रोज कॉलेजात जाऊ.
दुसर्‍या दिवशीपासून मी जरा जास्तच काळजी घेऊ लागले. आठवडाभर दिनक्रम तोच होता. आता मला समाधान वाटले की मुलगा जागेवर पडला. मी निर्धास्त झाले. माझं लक्ष परत त्याच्यावरून हलले. पगार बँकेत येत असल्याने परत सरांची भेट झाली. त्यांनी सांगितले, तो आठ दिवस आला. नंतर पत्ता नाही.
गोंधळ घालण्यात अर्थ नाही. माझ्याचमुळे सर्वकाही होत आहे असं नवरा म्हणतो. निदान मुळापर्यंत जाऊन पाहूया काय झालंय? पहिला प्रश्‍न होता- हा नशा तर करत नाही? … माझी चक्र त्याप्रमाणे फिरायला लागली. कसला नाद लागलाय हे जाणून घेणे आवश्यक होते. आता मी वेडीपिशी झाले. तो तोंड उघडायला तयार नव्हता. मला कुणीतरी आयडिया दिली, नेट पॅक बंद कर. त्याची चिडचिड झाली तर मोबाईल आणि लॅपटॉप चेक कर. पडत्या फळाची आज्ञा म्हणून मी ते केले. संध्याकाळी तो फणफणतच होता. त्याने रुद्रावतार घेतला. भांडणे नको म्हणून मी नेटपॅक घातला. माझ्या मैत्रिणीला मी कल्पना दिली. ती कॉंप्युटर, फोनमध्ये माहीर आहे. तिला त्या दिवशी जेवणाचे आमंत्रण दिले. आदल्या दिवशी मी उद्या घरी राहणार हे जाहीर केले. तो दुसर्‍या दिवशी कॉलेजात गेला. लॅपटॉप घरी होता. सरांना कॉलेजात जाऊन काही गोष्टी कशा करणार आहोत हे सांगितले. मुलगा मोबाईल सोडत नव्हता. सरांनी शक्कल लढवली. मुलांचे मोबाईल एका ट्रेमध्ये ठेवण्याचा हुकूम केला. आम्ही जय्यत तयारीत होतो. वेळ थोडा होता. मैत्रिणीने धीर दिला. सरांचे सहकार्य लाभले. फटाफट पंचेचाळीस मिनिटात ऑपरेशन करायचे होते. आम्ही ते पारही पाडले.

घरी आलो. धुकं निवळलं होतं. स्पष्टता आल्याने पुढील पावलं उचलणं शक्य होणार होतं. माझा मुलगा प्रेमात पडला होता. मुलगी औरंगाबादची होती. तो कॉलेजातून आल्यावर मी त्याच्याशी बोलले. त्यामुलीबद्दल माहिती विचारली. तिचा पत्ता विचारला. उपाय शोधणे गरजेचे होते. आतापर्यंत मुलाचे शैक्षणिक नुकसान झालेले होते. सहा महिने उलटून गेले. कॉलेजची बोंबाबोंब. त्या मुलाची घसरण.

नवर्‍याशी वाद यात मी होरपळून जात होते. मी निर्णय घेतला.. इस पार या उस पार करायची तयारी ठेवली. कुणालाही न सांगता मी थेट औरंगाबादला येऊन पोहचले. तिचं घर शोधून काढलं. चॅटचे प्रिंट हाताशी ठेवले होते. लढाई सोपी नव्हती. दोन आयुष्यांचा प्रश्‍न होता. बेधडकपणे त्यांच्या घरात शिरले. वस्तुस्थिती सांगितली. तिच्या आईवडलांना मोठा धक्का बसला. मुलगी शांत होती. अबोल होती. तिचेही आईवडील नोकरी करणारे. एकुलती एक. सर्व पुरावे सादर केले. तीही अकरावीतच होती. हुशार होती. टाईमटेबल सेम. घरातून बाहेर पडायचे. परत घरी यायचे आणि चॅट करायचे. उतु गेलेले प्रेम. काळजी, आकर्षण यात दोघेही पार बुडून गेलेले. दिवसभर चर्चा झाली. तिच्या आईवडिलांनी मला समजावले की आम्ही आमच्या मुलीला ह्यातून बाहेर काढू. शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगू. सर्व धीराने घेण्याची गरज आहे. आम्ही लग्नाला तयार नाही. आमच्या बाजूने हा विषय संपला. आपण घेतलेल्या त्रासाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी दोघांनी एकमेकांना फोन नंबर्स दिले. समाधानाने आणि मला समजून घेतल्याने मी शांत झाले. प्रवासात वेगवेगळे विचार येत होते. आत्महत्या तर करणार नाहीत ना हाही विचार घोळत होता. तिच्या आईवडिलांच्या मीही मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढे जायचे ठरवले.

परभणीला पोचून सर्व भेटी ठरवल्या. मुलाला न कळू देता मानसोपचारतज्ज्ञाकडे गेले. सर्व गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या. मी औरंगाबादला तिच्या आईवडिलांना भेटले हेही नमूद केले. खोटेपणात अर्थ नव्हता. आता जर झाकली मूठ केली तर लाखमोलाचे नुकसान होणार आहे हे ध्यानात येत होते. मुलीच्या आईवडिलांनी शब्द पाळला. मुलगा भ्रमिष्टासारखा दोन दिवस वागला. मी बदल पाहात होते. मी ऑफिसातून सुट्टी घेतली. पहारा देणे गरजेचे होते. मुलाच्या भवितव्याचा प्रश्‍न होता. मात्रा लागू पडली. हळुहळू प्रेमप्रकरण ठप्प झालं. तेच मित्रमैत्रीणी, तेच वातावरण यात मुलाची घुसमट होऊ नये म्हणून त्याच्या कलाने घेतले. गोव्यात माझे नातेवाईक आहेत. त्यांच्यातर्फे ओपन स्कूलची माहिती काढली. बदलीसाठी विनंती केली. भाड्याने जागा पाहिली. आता तुमच्या पदरात लेकराला घातले’’…. मी त्यांना दिलासा दिला. आज वर्ष उलटून गेले. तो दिवस आजही जसाच्या तसा आठवतो. तारखा बदलल्या तरी परिस्थिती बदलायला आईने घेतलेला निर्णय, धैर्य सार्थकी लागले. रीझल्ट झाला. नव्वद टक्के गुणांनी तो पास झाला. दुखरा भाग बरा झाला होता. क्लॅट परीक्षा तो उत्तीर्ण झाला. लॉ कॉलेजात त्याने प्रवेश घेतला. आई-बाबा परत एकत्र आले. परभणीला तिने बदली करून घेतली. त्याचे वर्ष फुकट गेले नाही… हे आईच्या आणि मुलाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. परत तेच बॅचमेट, परत पहिले वर्ष तो साजरे करत होता.