कंत्राटी शिक्षकांनी घेतली श्रीपाद नाईक यांची भेट

0
33

येथील आझाद मैदानावर पुन्हा बेमुदत आंदोलन करणार्‍या कंत्राटी शिक्षकांच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची काल भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घडवून आणण्याचे आश्‍वासन केंद्रीय मंत्री नाईक यांनी शिष्टमंडळाला दिले आहे, अशी माहिती या शिक्षक संघटनेचे प्रमुख गंगाराम लांबोर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील सरकारी विद्यालयात कंत्राटी पद्धतीवर विद्यादान करणार्‍या शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यासाठी ११ नोव्हेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट होत नसल्याने कंत्राटी शिक्षक नाराज बनले आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक एका कार्यक्रमानिमित्त येथे आले होते. त्याठिकाणी जाऊन कंत्राटी शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना भेडसावणार्‍या समस्या मांडल्या. राज्य सरकारने कंत्राटी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केल्याची माहिती लांबोर यांनी सांगितले.