>> सेवेत कायम करण्याची मागणी; भरतीत डावलण्याचा प्रयत्न
वीज खात्यात कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या कर्मचार्यांनी काल खात्याच्या प्रवेशद्वाराजवळ (विद्युत भवन) धरणे आंदोलन करून आपणाला सेवेत कायम केले जावे, अशी मागणी केली. यावेळी वीज खात्याच्या कर्मचारी संघटनेचे नेते राजू मंगेशकर व प्रसन्न उटगी हे हजर होते.
यावेळी कर्मचार्यांनी पत्रकारांशी बोलताना आम्ही गेल्या १० ते १५ वर्षांपासून वीज खात्यात कंत्राटी पद्धतीवर काम करीत असून, आता सेवेत कायम केले जावे, अशी मागणी असल्याचे सांगितले. सरकार आम्हाला डावलून कायमस्वरुपी पदांवर नव्या उमेदवारांची भरती करू पाहत असल्याचा आरोप यावेळी या कर्मचार्यांनी केला व तसे केल्यास आम्ही ते सहन करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. २०१४ नंतर बर्याच जणांना सेवेत कायम करण्यात आले. आता ३५० कर्मचारी शिल्लक राहिले आहेत. त्यांनाही सेवेत कायम करावे, अशी मागणी कर्मचार्यांचे नेते राजू मंगेशकर यांनी केली.
कंत्राटी परिचारिकांची निदर्शने
कांपाल-पणजी येथील आरोग्य संचालनालयासमोर ६१ कंत्राटी परिचारिकांनी निदर्शने करून कंत्राटाचे नूतनीकरण करण्याची मागणी काल केली.
कोविडच्या काळात या परिचारिकांची ऑक्टोबर २०१९ मध्ये कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सेवेला दोन वर्षे पूर्ण झाली असून, कंत्राटाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ४ एप्रिलपासून त्यांना आता घरी पाठविण्यात आले आहे. कंत्राटी परिचारिकांनी नव्याने कंत्राटाचे नूतनीकरण करण्याची मागणी केली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्या परिचारिकांना कंत्राटी पद्धतीद्वारे कामाला घेतले होते. त्यांच्या पुन्हा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर त्यांना सेवेत सामावून घेतले जाऊ शकते, असे आरोग्य संचालिका डॉ. गीता काकोडकर यांनी सांगितले. दरम्यान, आयपीएचबीच्या कामावरून कमी केलेल्या २८ कंत्राटी कर्मचार्याचे आंदोलन सुरूच आहे.