कंटाळा

0
273

ज सकाळी उठले आणि लक्षात आलं, वर्ष संपायला जेमतेम अडीच महिने राहिलेत… काय केलं एवढ्या दिवसांत? फक्त धावपळ. दिवसभर डोक्यात हजार कामं, प्रश्‍न… आणि त्यातच गुरफटलेला जीव. न उरकलेल्या कामांचा आणि त्यामुळे आलेल्या ताणाचा बोजा वाढतोय दिवसेंदिवस. खूप दिवसांनंतर आज मैत्रिणीशी बोलले फोनवर. आपल्या प्रश्‍नांची उत्तरं दुसर्‍या कुणाकडून मिळत नसतात, ती आपली आपणच शोधायची असतात, हे कळूनही आता अनेक वर्षं झालीत. त्यामुळे बोलणं ‘जनरल’ विषयावरच सुरू होतं…. हल्ली झालेले काही कार्यक्रम, नव्याने प्रकाशित झालेली पुस्तकं, पेट्रोलचे वाढते दर… वाढती उष्णता… आजची राजकीय परिस्थिती- दोघींनी मिळून अशा सर्व जगाच्या उठाठेवी करून, फोन ठेवता-ठेवता माझी मैत्रीण म्हणाली, ‘ब्रेक हवासा वाटतो गं, कंटाळा आलाय या ‘रुटीन’चा!’
‘‘कंटाळा…’ खरंच मलाही आलाय,’ मनातल्या मनात मीही म्हणाले. कितीतरी दिवसांनंतर मी या शब्दाचा उच्चार करत होते म्हणून जरा हसू आलं, आणि मनात थोडं दुखलंही. नकळत मन बालपणाकडं धावलं. कंटाळ्याला जागाच नव्हती तेव्हा. उगवणारा प्रत्येक दिवस नवीन कुतूहल आणि नवा उत्साह घेऊन उजाडायचा. प्रत्येक दिवसाला त्याचा असा चेहरा होता. आजच्यासारखा कालच्याच दिवसाचं प्रतिबिंब बनून उगवत नसे तो. तीच ती कामं वेगळ्या रीतीनं करण्याचा उत्साह आणि कौशल्य आपल्यात होतं हे तीव्रतेनं जाणवलं. कुठलंही काम केवळ उरकून टाकण्याच्या भावनेने करणे हा त्या कामाचा अपमान अन् ते करणार्‍याचा पराभव अशी आमची धारणा होती. कुठलंही काम जीव ओतून करायचं, आणि मनःपूर्वक जगायचं ही शिकवण शब्दातून, कृतीतून देणारी माणसं भोवती होती, हे आमचं भाग्य होतं. कंटाळ्याची सावली आमच्यावर पडू नये म्हणून घरातली माणसं खूप काळजी घेत होती, असं आज जुने दिवस आठवले की वाटून जातं. कुठलंही काम मन लावून केलं की कंटाळा येत नाही हे आम्हाला वेळोवेळी सांगितलं जायचं. अर्थात, आजोळी गेल्यानंतर चार-पाच दिवसांतच घरच्या आठवणीने येणारा तिथला कंटाळा, आणि पावसाळ्यात, धुंवाधार पाऊस पडत असताना वाचायला पुस्तक नसलं की कशातच मन न लागणं, या माझ्या ‘स्पेशल’ कंटाळ्यावर कोणाजवळच उपाय नव्हता.
पुढे शिक्षणासाठी म्हणून पुण्यात गेल्यावर हॉस्टेलच्या वातावरणात नवेपणा, बुजरेपणा, पटकन मैत्री करून घेण्याचा स्वभाव नसल्यामुळे एकटेपणातून येणार्‍या कंटाळ्याने खूप त्रास दिला. मी एकदा माझ्या एकमेव मैत्रिणीला, ती कोकणी भाषिक असल्यामुळे, म्हटलं, ‘वाज आयला गो माका.’ तसं तिथं जवळच असलेल्या, नव्याने ओळख झालेल्या माझ्या वर्गमैत्रिणीनी विचारलं, ‘वॉट इज दॅट वाज?’ त्या शब्दाचा अर्थ कळताच हॉस्टेलवरच्या बर्‍याच मुली इंंग्रजी बोलतानाही ‘वाज’ शब्दाचा वापर करू लागल्या. सर्वांशी चांगली ओळख, मैत्री झाल्यानंतर, अभ्यासाची गोडी वाढल्यानंतर माझ्या जगण्यातून मात्र कंटाळा हद्दपार झाला.
शिक्षण पूर्ण होऊन नोकरीला लागल्यानंतर काही काळाने जीवनाची गतीच इतकी वाढली की, आपलं मन, भावना, संवेदना जाणून घेण्याइतका निवांतपणाच राहिला नाही. जरी काही जाणवलं तर बोलायचं कुणाशी हे कळेनासं झालं. सोमवार ते शनिवार एकाच चेहर्‍याचे दिवस… रविवार संपला की एक आठवडा उलटला, एवढीच जाणीव. कोकणीत म्हणतात तसं- ‘खंय गेलो खंय ना, कितें हाडले कांय ना’- अशी परिस्थिती. छोटी-छोटी कामं अन् त्यांना चिकटलेले छोटे-छोटे प्रश्‍न.
स्वैंपाक करायचाच- भाजी कसली करू? झाडू जुना झालाय- नवीन कधी आणू? कपड्याला इस्त्री करायचीय- घरी करू का लॉंड्रित टाकू? जवळच्या नात्यातलं लग्न आहे- रजा मिळेल का? रेशन संपलंय, रद्दी साठलीय, जुन्या कपड्यांची गाठोडी वाढतायत, कुणी कौतुकाने आपलं पुस्तक दिलंय वाचायला अभिप्रायाच्या अपेक्षेने… कधी वाचू? मैत्रीण आजारी आहे, भेटायला जायचंय… कधी जाऊ?- एकूण, काय करू? कसं करू? कधी करू? तशातच मग मुलांच्या सुट्या असल्या की अजून प्रश्‍न. त्यांच्यासाठी काहीतरी विशेष आखणी- प्रवासाची, खाण्या-पिण्याची! त्यांना वेळ द्यायला हवा. आमच्या लहानपणी उन्हाळ्यात गोठ्यातली गुरं उघड्यावर वाडीत बांधली जायची, तसंच मुलांना शाळेला सुट्टी म्हणून दुसर्‍या एखाद्या क्लासला टाकायचं का? का त्यांना मोकळ्या मनाने सुट्टी एन्जॉय करू द्यायची? प्रश्‍नच संपत नाहीत. एकाच प्रश्‍नाला कधी-कधी अनेक उत्तरं. कुठलं उत्तर योग्य?- हा नवीन प्रश्‍न आणि अशा प्रश्‍नांचे वाढते ताण.
हवेतल्या प्रदूषणासारखेच जगण्यातले हे ताण पसरत जातात. या ताणांची दहशत जीवनाचं सौंदर्य नष्ट करत चाललीय. कामं आवडीनं, अपूर्वाईनं आणि परिपूर्णतेनं करण्यातला आनंद संपतोय जणू. वाईट वाटतं. फक्त पळतोय आपण. जगणं एक स्पर्धा बनवून टाकलीय. मुलांनाही नकळत हेच शिकवतोय. आणि एक दिवस बोलून जातो- ‘कंटाळा आलाय सगळ्याचा!’
खरंच, हे असं धावत राहण्यापेक्षा जीवनाच्या महासागरात आपण पोहायला शिकलो तर? जीवनाची खोली, जीवनाचा विस्तार समजून घेत या जलाशयात बुडून न जाता तरंगत राहायची कला आपण शिकली पाहिजे. कदाचित सगळे ताण दूर होतील… जीवनाच्या सौंदर्याचा साक्षात्कार होईल आणि ‘कंटाळा’ ही भावना विरून जाईल.
आमेन!