>> दक्षता खात्याकडून गैरव्यवहार नसल्याचे स्पष्ट
कळंगुट-कांदोळी, हडफडे-नागवा-पर्रा बाह्य विकास आराखडे (ओडीपी) तयार करण्याच्या कामात भ्रष्टाचार झालेला नाही, अशी माहिती राज्य सरकारच्या दक्षता खात्याच्या एससीबीने आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांना एका पत्राद्वारे काल दिली आहे. एसीबीच्या या अहवालामुळे माजी मंत्री, आमदार मायकल लोबो यांना मोठ्या दिलासा मिळाला आहे.
आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी राज्यातील कळंगुट-कांदोळी, हडफडे-नागवा-पर्रा या ओडीपीमध्ये भ्रष्टाचार आणि कला अकादमीच्या नूतनीकरणातील भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी करण्याची मागणी दोन वेगवेगळ्या तक्रारीद्वारे दक्षता खात्याच्या एसीबीकडे केल्या होत्या.
राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मार्च २०२२ मध्ये भाजपचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर विश्वजित राणे यांना नगरनियोजन खाते देण्यात आले. मंत्री राणे यांनी २७ एप्रिल २०२२ मध्ये राज्यातील ओडीपीमध्ये गैरव्यवहार झाल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर कळंगुट-कांदोळी, पर्रा-हडफडे-नागवा आणि वास्कोचे ओडीपी स्थगित ठेवण्याचा आदेश जारी करून या प्रकरणी चौकशीचा आदेश दिला होता. या बाह्यविकास आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. यासंबंधी नगरनियोजन खात्याकडून खास पथकाकडून चौकशी करून यासंबंधीचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला आहे. याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ते ताम्हणकर यांनी कळंगुटचे आमदार, माजी मंत्री मायकल लोबो यांच्याविरोधात दक्षता खात्याच्या एससीबीकडे ओडीपीमधील भ्रष्टाचाराबाबत तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली होती. एसीबीने ओडीपीच्या जमीन व्यवहारात भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा नसल्याचे तक्रारदार ताम्हणकर यांना कळविले आहे. ओडीपी प्रकरणी माजी मंत्री, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ओडीपी प्रकरणावरून आमदार लोबो यांना घेरण्याचा प्रयत्न करणार्या नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांना एक प्रकारे धक्का बसला आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
अकादमीच्या नुतनीकरण कामातही भ्रष्टाचार नाही
कला अकादमी इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झालेला नाही, असेही एसीबीने तक्रारदार ताम्हणकर यांना कळविले आहे.
राज्यात कला अकादमीच्या नूतनीकरणाचा विषय बराच गाजत आहे. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही हा विषय बराच गाजला आहे. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी गैरव्यवहाराचा इन्कार केला आहे. कला अकादमीतील या कथित गैरव्यवहारप्रकरणी ताम्हणकर यांनी एसीबीकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. कला अकादमीच्या कामात गैरव्यवहार झालेला नसल्याच्या अहवालामुळे मंत्री गोविंद गावडे यांनाही दिलासा मिळाला आहे.