ऑलिम्पिकच्या उद्घाटनापूर्वी रेल्वे मार्गांवर जाळपोळ, तोडफोड

0
13

फ्रान्समधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या सुमारे 10 तास आधी पॅरिसमधील रेल्वे नेटवर्कवर शुक्रवारी हल्ला झाला. पॅरिसच्या वेळेनुसार काल पहाटे 5.15 वाजता अनेक रेल्वे मार्गांवर तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. रेल्वे रुळांवर हल्ला कोणी केला आणि का केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
देशात एकूण 4 प्रमुख हायस्पीड रेल्वे मार्ग आहेत, ज्या संपूर्ण देशाला पॅरिसशी जोडतात. त्यापैकी 3 वर हल्ले झाले, तर एका रेल्वे मार्गावरील हल्ला हाणून पाडण्यात आला. ज्या मार्गांवर हल्ला झाला, त्यात अटलांटिक, नॉर्दर्न आणि ईस्टर्न लाईन्सचा समावेश होता.
पॅरिसपासून 160 किमी अंतरावर असलेल्या फ्रान्सच्या अरास शहरात हा हल्ला झाला. यानंतर, कोर्टलेन शहरातील टूर्स आणि ले मॅन्स लाइनवर दुसरा हल्ला झाला. हे शहर पॅरिसपासून 144 किमी अंतरावर आहे.

या हल्ल्यानंतर अर्ध्या तासात पॅरिसला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या. अनेक रेल्वे 90 मिनिटे उशिराने धावत आहेत. या हल्ल्यामुळे जवळपास 8 लाख प्रवासी स्थानकांवर अडकून पडले आहेत. फ्रान्सची सरकारी रेल्वे कंपनी एसएनसीएफने सर्व प्रवाशांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. दुसऱ्या बाजूला एसएनसीएफने आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना रेल्वे यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी कामावर लावले आहे.

या हल्ल्यामुळे पॅरिस ते लंडनपर्यंत जाणाऱ्या रेल्वे मार्गांना सर्वाधिक फटका बसला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने आपल्या नागरिकांसाठी प्रवासादरम्यान मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. तसेच फ्रान्सच्या रेल्वे मार्गांचा वापर न करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये कालपासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली. ती 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. कालच्या उद्घाटन सोहळ्याला सुमारे 3 लाख प्रेक्षक आणि 10 हजार 500 खेळाडू उपस्थित होते.