ऐकावे जनाचे करावे मनाचे

0
529

या कोपर्‍यात एक छानसे जाळे विणून त्यात अडकणार्‍या किटकांवर यथेच्छ ताव मारायचा असा विचार त्या कोळी किटकाने केला. जेमतेम अर्धेअधिक कोळिष्टक विणून झाले न झाले तोच एक मांजरी येऊन त्याला हसली. त्याने मांजरीला हसण्याचे कारण विचारताच ती म्हणाली, ‘‘बावळट आहेस, या घरात इतकी स्वच्छता असताना इथे कशाला कीटक येतील तुझ्या तावडीत सापडायला?’’
ते ऐकून कोळ्याने मोठाल्या खिडकीच्या कोपर्‍यात काम सुरू केले. थोडेफार विणून होते न होते तोच एक चिमणी तिथे आली नि म्हणाली, ‘‘वेडा आहेस का तू? या खिडकीतून सोसाट्याचा वारा आत येतो. त्याने तुझे कोळिष्टक मोडले, कोसळले तर तूही त्यात सापडून आपटशील नि तुला दुखापत होईल.’’
कोळी ते ऐकून दुसरीकडे कुठे जागा आहे का ते पाहू लागला. तोच त्याला एक जुनाट कपाट दिसले. त्याचे दार नि भिंतीच्या मध्ये त्याने काम करायला सुरुवात केली. थोडेसे काम होते न होते तोच त्याला झुरळाने हाक मारली. ‘‘मित्रा, हे जुने कपाट उद्या विकले जाणार आहे. इथल्या माणसात याची अडगळ होत असल्याची चर्चा चालली होती. मग तुझी उचलबांगडी होईल नि तुला नव्याने डोलारा उपसावा लागणार. त्यापेक्षी तू आताच दुसरीकडं गेलेलं बरं.’’ एव्हाना कोळ्याला प्रचंड भूक लागली होती. आतापर्यंतच्या श्रमाने त्याचा जीव मेटाकुटीस आला होता. मदतीच्या आशेने त्याने मुंगीकडे पाहिले. ‘‘दुसर्‍याचे ऐकून दिशा बदलत राहशील तर हाती काहीही न लगता उपाशी मरायची पाळी येईल. सबब नीट विचार करून पावले उचल.’’ मुंगीचा सल्ला कोळ्याला पटला आणि तो निर्धाराने कामाला लागला.