एफसी गोवाच्या अभियानास आजपासून प्रारंभ

0
94

>> घरच्या मैदानावर चेन्नईनचे आव्हान

गतउपविजेता एफसी गोवा बुधवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आपलत्या अभियानास सुरुवात करणार आहे. गेल्या दोन मोसमांतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे गोवा संघ स्थिरावला आहे. दुसरीकडे चेन्नईनने पुनर्बांधणी केली आहे. त्यामुळे गोव्यासमोर किती आव्हान निर्माण होते याची उत्सुकता असेल.

गेल्या मोसमात चेन्नईनचा संघ तळात फेकला गेला. विजेतेपद राखण्याची त्यांची मोहीम साफ फसली. मोसमापूर्वी त्यांनी पुनर्बांधणी केली. त्यामुळे मागील मोसमातील अपयश निव्वळ अपवाद ठरल्याचे दाखवून देण्याचा त्यांना प्रयत्न असेल.

विशेष म्हणजे दोन्ही प्रशिक्षक तिसर्‍या मोसमासाठी कायम आहेत. गोव्याने सर्जिओ लॉबेरा, तर चेन्नईयीनने जॉन ग्रेगरी यांना कायम ठेवले आहे. गोव्याचा संघ अपेक्षेप्रमाणे स्थिरावलेला आहे याचे कारण महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक खेळाडू संघाकडे कायम राहिले आहेत. फेरॅन कोरोमीनास, ह्युगो बुमुस, अहमद जाहौह आणि एदू बेदीया या सर्वांचाही तिसरा मोसम आहे. मंदार राव देसाई, सेरीटॉन फर्नांडीस, लेनी रॉड्रीग्ज, जॅकीचंद सिंग अशा भारतीय खेळाडूंना लॉबेरा यांची कार्यपद्धत ठाऊक आहे.
चेन्नईनने गेल्या मोसमातील धक्यानंतर पुनर्बांधणी केली आहे. एली साबिया याचा अपवाद वगळता ग्रेगरी यांनी परदेशी खेळाडूंची फळी पूर्ण बदलली आहे. त्यांनी सहा नवे परदेशी चेहरे आणले आहेत.

भारतीय खेळाडूंच्या ताफ्यातही काही बदल झाले आहेत. विशाल कैथ, लालियनझुला छांगटे, एडविन वॅन्सपॉल आणि रहिम अली संघात आले आहेत.
घरच्या मैदानावर एफसी गोवाचे पारडे जड असेल, पण चेन्नईनच्या सुदैवाने अहमद जाहौह उपलब्ध नसेल. गेल्या मोसमात बेंगळुरू एफसीविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याला लाल कार्डला सामोरे जावे लागले होते.