एक लग्न…दोन दृष्टीकोन

0
300

अंजली विवेक मुतालिक (कुडाळ)

एखाद्या गोष्टीबद्दल पुरुष जिथे केवळ वीस शब्द वापरतात तिथे तोच विषय मांडायला बाईला दोन हजार शब्द कमी पडतात … अशा प्रकारे अर्धा किंवा तासभर हजेरी लावून बायका जीवनाच्या अंतिम सत्य, मोक्षापर्यंत जाऊन येतात केवळ संवादातून आणि पुरुष मितभाषी स्वभावामुळे शांत राहून ‘इदं न मम’ म्हणत असावेत…

विवाह..! दोन मनांना जोडणारा सेतू! हीच दोन नवीन मनं संसारी झाली, मुरली की गोडवा वाढतो. पुरुष अर्थार्जन करतो अन् बर्‍याचदा व्यवहारी वागतो, तर बाई स्वप्नाळू, हौशी!! एकाच गोष्टीकडे किंवा चित्राकडे पहायचा दोघांचा दृष्टीकोन निरनिराळा असू शकतो.
लग्नसराई सुरु झाली की अमक्याच्या लग्नाला तू जा. तमक्याच्या लग्नाला आम्ही जातो. अशी सोयीस्कर विभागणी घराघरातून होत असते. अशाच एका दिनेशच्या लग्नात आम्हा पती-पत्नीला जावे लागले. आम्हा दोघांच्या नजरेतून ते लग्न अस्सं झालं….
विवाह समारंभ आटपून घरी आलो अन शेजार्‍यांनी प्रश्न केला, ‘‘अहो, त्या दिनेशच्या लग्नाला गेला होतात ना? कसं झालं लग्न?’’ (आपण कुठे जातो हे सविस्तर त्यांना माहिती असतं) यावर माझ्या पतीची प्रतिक्रिया, ‘‘उत्तम! जोडी छान! जेवण ठीक!!’’ झाले यांचे लग्न एक-दोन ओळीत गुंडाळले. पण हाच प्रश्न शेजारणीने मला विचारला, ‘‘अगं, कसं झालं ग लग्न?’’ यावर माझा निबंध…!
‘‘अगं, काही विचारू नको.. (तरी मी तुला सारं सांगणार आहे!) काय गर्दी ग लग्नात! मुलीच्या वडिलांनी एवढा मोठा मराठा एसी हॉंल बुक केला होता. पण अक्षरशः शिजायला झालं बाई!! ए आणि हल्ली काय ग शालू-बिलू घेत नाहीत. मस्त मोरपंखी रंगाची डिझायनर साडी होती ग नवरीची ती खड्यांची! अग तिला उचलत पण नव्हती. पाठीमागून सारखी खाली जात होती आणि चपलेत अडकायची त्यामुळे नवरी अस्वस्थ! एका फोटोत धड हसली नाही ग मनापासून! हां पण जोडा मस्त शोभत होता हं!! त्याचा शेरवानी पण तिच्या साडीला मस्त मॅच होत होता. त्याला साजेसे बूट पण होते. अगं, आणि त्या करवल्या-धेड्या पण फुल्ल जोमात होत्या. पायाच्या घोट्यापर्यंत अनारकली, शरारास्टाईल घालून मिरवत होत्या. त्यात क्रीम कलर, गोल्डन अन सिल्वर कलर यांची हल्ली फॅशन आलीय…. मंगलाष्टकाला काय गं एकेक गळे काढतात रडल्यासारखे.. स्वतः रचलेली मंगलाष्टकं त्यात कुटुंबातील सर्वांची नावे घालायची अन एका दिवसात त्याला चाल लाऊन… काय ग,ं असं काय म्हणून त्या बायका गात होत्या… ऐकवत नव्हत गं, शप्पथ!! आणि अगं जेवणाला तर काय गडबड… विचारू नकोस. दुष्काळातून आल्या- सारखी करतात माणसं अशावेळी!! किती हावरटपणा नुसता. पहिला माणूस जेवतोय तोपर्यंत त्याच्या खुर्चीला धरून मागे दुसरा उभा राहतो. समोरचा बकाबका घास घेतो. जंगलातले प्राणी बरे गं! यजमानांनी आग्रह केला म्हणून जेवायला थांबलो. गुलाबजाम होते जेवायला. एकदाच छोट्या वाटीत दोन वाढून गेला ते परत काही फिरकलेच नाहीत वाढपी. गर्मीमुळे थंडगार पाणी पिऊन लोक पोट भरत होते झालं. दिनूची आई भेटली तेव्हा पटकन हातावर पाकीट ठेवलं. त्या अहेराच्या रांगेत अन त्या फोटोसाठी कोण थांबतंय? शिरापडो. त्यांना समजले आम्ही आलो होतो हेच खूप झाले. झाले!!
आणि हो अग ती सावंतांची पिंकी किती पुढेपुढे करत होती गं. काही खर नाही तिचं! कुठं जमवलंय म्हणे तिचे तिने कुठेतरी. तुझ्या काही कानावर आलं का गं? असो. आपल्याला काय करायचेय? तिची ती बघून घेईल बाई! उगाच आपल्या डोक्याला कां ताप करायचा आपण? आणि रुखवंत पण यथातथा होते. काय कमी होते का सांग त्यांना, शिवाय एकटीच मुलगी. कोणाला देणार आहेत सारं? नवरा-नवरीची गाडी मस्त सजवली होती हां. असो.बाकीवीस तोळे सोने घालून लग्न करून दिले की नोटाबंदी असतानासुद्धा. कमाल आहे की नाही? काही नाही गं वेळ पडली की सगळे उभे राहतात आणि सारं पार पाडत असतात. तो वर बसलाय ना त्याला विश्वाची चिंता असते’’.
एखाद्या गोष्टीबद्दल पुरुष जिथे केवळ वीस शब्द वापरतात तिथे तोच विषय मांडायला बाईला दोन हजार शब्द कमी पडतात … अशा प्रकारे अर्धा किंवा तासभर हजेरी लावून बायका जीवनाच्या अंतिम सत्य, मोक्षापर्यंत जाऊन येतात केवळ संवादातून आणि पुरुष मितभाषी स्वभावामुळे शांत राहून ‘इदं न मम’ म्हणत असावेत…