एक कळी चुरगळली

0
151

ख्यातनाम कलात्मक छायाचित्रकार आणि गंधतज्ज्ञ मोनिका घुर्डे यांच्यावर त्यांच्या सांगोल्डा येथील निवासस्थानी झालेल्या बलात्कार व हत्येची घटना हादरवून टाकणारी आहे. आपले छोटेसे आयुष्य जिने केवळ कलेच्या सान्निध्यात आणि नानाविध गंध ओळखण्यात आणि घडवण्यात घालवले, त्यांचे महत्त्व ओळखणारी विलक्षण संवेदनशीलता बाळगली, अशा तरूण स्त्रीच्या वाट्याला नियतीने असे मरण वाढून ठेवलेले असावे हे अतर्क्य आहे. मोनिका यांची कारकीर्द कलात्मक छायाचित्रकार म्हणून बहरत होती. मोठमोठ्या छायाचित्रण प्रकल्पांच्या संधी त्यांच्यापुढे चालून येत होत्या. पण त्याच बरोबर विविध प्रकारचे गंध ओळखण्याची दैवी देणगी आपल्यापाशी आहे याचीही त्यांना जाणीव झाली होती. घरी न्यायमूर्ती असलेल्या वडिलांना भेटायला येणार्‍या पाहुण्याच्या केवळ वासावरून ती व्यक्ती कोण आहे हे ओळखणार्‍या मोनिका यांना तिचा भाऊ लहानपणी ‘स्निफर डॉग’ म्हणून चिडवत असे. परंतु वेगवेगळे गंध ओळखण्याची आपली ही क्षमता व्यवसायाची नवी संधी आपल्यापुढे ठेवू शकते याची जाणीव त्यांना करून दिली ती त्यांच्या घरी आलेल्या भारत कामटे या गंधतज्ज्ञाने. त्यामुळे मोनिका यांनी आपले विविध गंधांचे ज्ञान जाणीवपूर्वक विकसित केले. जवळजवळ अठरा महिने त्यांनी विविध गंधांचा अभ्यास केला. ब्रिटनच्या पिकोट प्रयोगशाळेतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय ज्ञान संपादन केले. गंधांसंबंधी संशोधन करणारी ‘मो लॅब’ही प्रयोगशाळाही त्यांनी नंतर स्थापन केली. त्यांच्या कार्यशाळा हा मोनिका यांच्या गंधविषयक ज्ञानाचा जणू खजिनाच असे. अशा कार्यशाळा गोव्यातही त्यांनी घेतल्या होत्या. जाईचा सुवास हा मोनिका यांना सर्वांत प्रिय होता. सुगंधांच्या विश्‍वामध्येही शुद्ध जाईचा सुवास हा अत्यंत मौलिक मानला जातो. जाईच्या आठ हजार कळ्यांपासून जेमतेम एक ग्रॅम शुद्ध अत्तर तयार करता येते. जाईला इंग्रजीत ‘जास्मीन’ म्हणतात तो शब्द पर्शियन ‘यास्मीन’ पासून आलेला आहे वगैरे सखोल माहिती मोनिका यांच्या कार्यशाळांमधून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असे. त्यांना गंधांच्या दुनियेची आगळी सफर घडवीत असे. माणूस रोज २३०४० वेळा श्‍वास घेतो. पाच सेकंदांची ही श्‍वासोच्छ्वासाची क्रिया किती प्रकारचे गंध आपल्यापर्यंत पोहोचवीत असेल, असे त्या विचारायच्या. प्रत्येक गंधाशी आपल्या आठवणी जोडलेल्या असतात असे त्यांना वाटे. हे सगळे ज्ञान त्यांनी व्यासंगातून संपादन केले होते. गंधांची आवड त्यांना बालपणापासून होतीच. कुठेही गेले तर आपण आठवण म्हणून तिथले अत्तर वा तेल घेऊन यायचे असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. पारिजातकाचे फूल कोमेजले तर आपले आवडते कुत्र्याचे पिल्लू मेल्यागत दुःख होते असेही त्या सांगत. त्यामुळे अशा विलक्षण संवेदनशील महिलेची निर्घृण हत्या व तीही गोव्यासारख्या सुसंस्कृत प्रदेशात अशा प्रकारे व्हावी हे दुर्दैवी आहे. मोनिका यांनी पाच वर्षांपूर्वी गोव्याची वास्तव्यासाठी निवड केली होती. इथल्या निसर्गामध्ये नाना गंध मिसळलेले आहेत या भावनेनेच त्यांनी गोव्याची निवड केली असेल यात शंका नाही. परंतु या विश्‍वासाला तडा देणारी घटना त्यांच्या बाबतीत घडली. फुलांनाही कान असतात, ह्रदय असते म्हणणार्‍या या संवेदनशील स्त्रीच्या वाट्याला हे भोग का आले याचा छडा लागला पाहिजे. हा अग्रलेख लिहित असतानाच अशाच प्रकारे आणखी एका महिलेची हत्या काकोडा येथे दिवसाढवळ्या झाल्याची वार्ता आली आहे. या घटनांमागील सत्य उलगडण्याची आणि गुन्हेगारांना सजा देण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यात कोणतीही कसूर होणार नाही हे सरकारने पाहावे. फुलांच्या, कळ्यांच्या विश्‍वात जगत आलेल्या मोनिका घुर्डे यांची हत्या हे गोव्यासाठी लांच्छन आहे.