एका चिमटीची जादू ः हिंग

0
53
  • डॉ. मनाली महेश पवार

स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यातील हिंग हा मुख्य घटक आहे. हिंगाचे रोप लावल्यापासून ते हिंग मिळेपर्यंत चार ते पाच वर्षे जावी लागतात. हिंगाच्या एका रोपापासून जवळपास अर्धा किलो हिंग मिळतो आणि त्यासाठी सुमारे चार ते पाच वर्षे वाट पाहावी लागते. त्यामुळेच हिंगाची किंमत जास्त असते.

स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यातील हिंग हा मुख्य घटक आहे. अनेकांना हिंगाचा दर्प आवडत नाही, पण जेवणात मात्र हिंगाचा सढळ वापर केला जातो. कारण हिंग हा फोडणीतील पदार्थांपैकी सर्वात जास्त पाचक पदार्थ आहे. भारतात हिंगाचं उत्पादन घेतलं जात नाही; पण त्याचा सर्वाधिक वापर इथेच होत असल्याने हिमाचलमध्ये निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध लाहौल- स्पिती परिसरात ही लागवड करण्यात येत आहे. जगाच्या एकूण हिंगाच्या उत्पादनापैकी चाळीस टक्के वापरलं जाणारं हिंग परदेशातून (इराण, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान) आयात केलं जायचं. अफगाण किंवा पठाणी हिंगाला जास्त मागणी असते.
हिंगाचं झाड गाजर किंवा मुळा वर्गातल्या वनस्पतीसारखं असून थंड, कोरड्या हवामानात वितळून जमिनीत झिरपणार्‍या बर्फाच्या पाण्यावर हे झाड उत्तम वाढते. काही प्रजाती पंजाब, काश्मीर, लडाख आणि हिमाचलमध्येही उगवतात. पण प्रामुख्यानं ज्यापासून हिंग तयार होतो अशी फेरुला फेटिडा भारतात आढळून येत नाही. इराणमधून आणलेल्या बियाण्यांपासून काही रोपांची हिमाचलमध्ये लागवड केली. पण रोप लावले व लगेच हिंग मिळाला असे होत नाही. रोप लावल्यापासून ते हिंग मिळेपर्यंत चार ते पाच वर्षे जावी लागतात. हिंगाच्या एका रोपापासून जवळपास अर्धा किलो हिंग मिळतो आणि त्यासाठी सुमारे चार ते पाच वर्षे वाट पाहावी लागते. त्यामुळेच हिंगाची किंमत जास्त असते. फेरुला फेटिडा झाडांच्या मुळातील रसापासून हिंग तयार होतो. पांढर किंवा फिका हिंग पाण्यात विरघळतो तर काळा गडद हिंग तेलात विरघळतो.
आयुर्वेदात हिंगाचं महत्त्व-
हिंगु वातकफावह शूलघ्नं पित्त कोपनम्‌|
फटुपाकरसं रुच्यं दीपनं पाचनं लघु॥
हिंग वात-कफ नाशक आहे, शूलघ्नं म्हणजे वेदनाशामक आहे. पित्ताला वाढवतो. त्याचा पाक (रस) तिखट आहे. रूचीप्रधान तोंडाला चव आणणारा आहे. दीपन म्हणजे अग्नीला वाढवणारा, भूक वाढवणारा आहे. पाचनं म्हणजे पचन करायला मदत करणारा व पचायला हलका असे हिंगाचे गुणधर्म आहेत.

आरोग्यदायी हिंग

  • पचन कमजोर असल्यास हिंगाच्या चूर्णाचे सेवन फायदेशीर ठरते. पोटात गॅस असल्यास ताकाबरोबर हिंग घेतल्याने आराम मिळतो.
  • उचकी थांबत नसल्यास हिंग खाणे फायदेशीर ठरते. अधिक ढेकर किंवा मळमळ होत असेल तर मॅश केलेल्या केळ्यात चिमूटभर हिंग टाकून केळे सेवन करावे, आराम मिळतो.
  • छातीत कफ जमल्यास हिंगाचा लेप लावावा.
  • ऐकायला कमी येत असल्यास बकरीच्या दुधात हिंग घालून कानात दोन थेंब टाका.
  • टाचांना भेगा पडल्यास कडुनिंबाच्या तेलात हिंग मिसळून लावावा.
  • हिंग पोटासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज हिंगाचे सेवन करावे. अपचन, गॅस, पोटातील किडे, मुरड अशा अनेक आजारांवर हिंग उपयुक्त आहे.
  • हिंगात रक्त पातळ करण्याचे गुण असतात. म्हणून हायपरटेन्शन रुग्णांनी नेहमी आहारात हिंग वापरावा. याने नसांमध्ये ब्लड क्लॉटिंगसारखी समस्या राहत नाही.
  • खोकल्याची समस्या असल्यास हिंगाचे सेवन फायदेशीर आहे. हिंग कोरडा खोकला, डांग्या खोकला, दमा यांसारख्या आजारांमध्ये उपयुक्त ठरतो. डाळ, भाजीसारख्या पदार्थांमध्ये हिंग हा वापरावाच, पण श्‍वासासंबंधी आजार असल्यास हिंगात जरासं पाणी मिसळून छातीला लावल्याने आराम मिळतो. याव्यतिरिक्त खोकला आणि दमा यांसारख्या आजारात आपण हिंगात मध मिसळून सेवन करू शकतो.

अनेक महिलांना मासिकपाळी दरम्यान वेदना सहन कराव्या लागतात. दररोज हिंगाचे सेवन केल्याने या दरम्यान होणार्‍या वेदनांपासून मुक्ती मिळते. हिंग प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स उत्पादनास मदत करते. त्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो. मासिकपाळीच्या वेळी ज्यांना पोटात दुखत असेल, पाळी व्यवस्थित होत नसेल, त्यांनी १ ग्लास पाण्यात १ चिमूट हिंग मिसळून पाणी प्यावे. हिंग्वाष्टक चूर्णासारखे औषध ज्यात हिंग हे मुख्य द्रव्य आहे, हे चूर्ण गरम भाताबरोबर तूप व चूर्ण टाकून जेवताना पहिल्या दोन घासात खावे.

रोज हिंगाचे सेवन केल्यास डोकेदुखीपासून मुक्ती मिळू शकते. हिंगामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे पुरुषांमधील इरेक्टाइली इरेक्टाइल डिस्फंक्शनसारख्या गंभीर समस्यांवर मात करता येते. मधुमेहाच्या रुग्णांनीही नियमित हिंगाचे सेवन करावे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हिंगाचा उपयोग होतो.
कॅन्सरसारख्या आजारातही हिंगाचे नियमित सेवन करावे. हिंगामध्ये ऍन्टीऑक्सिडंट गुण असतात, त्यामुळे हिंग खाल्ल्याने कॅन्सरच्या पेशीच्या वाढीस प्रतिबंध होतो. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात दोन चिमूट हिंग टाकून पाणी प्यायल्याने पौरुषशक्ती वाढवण्यास मदत होते.

आयुर्वेदिक औषधोपचारांमध्ये पचनासंबंधी म्हणा किंवा अधोदर वात व्याधीमध्ये हिंगवाष्टक चूर्ण हे मुख्य औषध आहे. मात्र वैद्याच्या सल्ल्यानेच या औषधाचा वापर करावा.

हिंगाचे दुष्परिणाम

  • हिंगाचा अतिरेक झाल्यास दुष्परिणाम दिसून येतात. हिंगाचे प्रमाण जास्त झाल्यास गॅस, जुलाब आणि पोटात जळजळ होऊ शकते.
  • गरोदरपणात जास्त प्रमाणात हिंग सेवन केल्यास गर्भपात होऊ शकतो.
  • जास्त प्रमाणात हिंगाचे सेवन झाल्यास डोकेदुखी व चक्क येते.
  • हिंगाचे प्रमाण जास्त झाल्यास लाल डाग किंवा पुरळ उठू शकतात.
  • हिंग फायदेशीर पदार्थ आहे, पण त्याच्या सेवनाने काही लोकांच्या ओठांवर सुज येऊ लागते.
  • अर्धांगवायूमध्ये झटका आल्यास हिंगापासून अंतर ठेवावे.