एकत्र येण्याची हवा

0
14

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून रंगल्या आहेत. ठाकरे कुटुंबीयांच्या एकत्र येण्याच्या कल्पनेतून मराठी माणसाला होणारा भावनिक आनंद सोडून द्या, परंतु खरोखरच असे एकत्रीकरण झाले तर त्याचा खरा राजकीय फायदा नेमका कोणाला होणार हे थोडे खोलात जाऊन पाहिले तर लक्षात येते. राज ठाकरे यांच्याकडून एकाएकी उद्धव यांच्या टाळीला हात पुढे करण्याच्या शक्यतेचे सूतोवाच का होऊ लागले आहे ह्याचे उत्तर त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीत मिळते. राज ठाकरे यांची भूमिका नेहमीच वारे येईल तसे सूप धरण्याची राहिली आहे. मात्र, प्रत्येकवेळी त्यांचे राजकीय गणित चुकते आणि निवडणुकीत शेवटी हाती काही लागत नाही. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत आग ओकणारे राज ठाकरे नंतर मोदी आणि भाजपवर स्तुतिसुमने उधळू लागल्याचेही जनतेने पाहिले. आता उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेसमवेत जाण्याचे संकेत त्यांच्याकडून मिळत असले तरी उद्धव गटाला त्यामागील हेतू स्वच्छ दिसत नाहीत हेही तितकेच खरे आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रेरणेनेच राज उद्धव यांच्याशी हातमिळवणी करू पाहत असावेत असे राजकीय निरीक्षकांना वाटते. त्याची काही कारणेही आहेत जी विचार करण्यासारखी आहेत. 2017 साली मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याची हाक उद्धव यांनी राज यांना दिली होती, तेव्हा त्यांनी त्यांची टर उडवली होती. तेच राज ठाकरे आता त्या प्रस्तावाबाबत सकारात्मक का आहेत असा प्रश्न लोकांना पडला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर धूळधाण जरी उडाली तरी मागील निवडणुकीत खुद्द मुंबईतील दहा जागा उद्धव यांच्याकडेच गेल्या. म्हणजेच मुंबईमध्ये उद्धव यांचा प्रभाव अजूनही आहे. उद्धव यांचा हा वरचष्मा कमी करण्यासाठी भाजपकडून मनसेचा वापर होतो हे वेळोवेळी दिसून आले आहे. मात्र, मनसे स्वतंत्रपणे काहीही चमत्कार घडवू शकलेली नाही, कारण मुळामध्ये राज यांच्या भूमिकेतच सातत्य दिसत नाही. त्यांच्या धरसोड धोरणांमुळे मतदार त्यांच्या सभांतील हास्यविनोदाची आणि टवाळीची मजा लुटायला येतात, परंतु पारड्यात मते मात्र टाकत नाहीत ही राज यांची शोकांतिका आहे. पूर्वी मोदींना टीकेचे लक्ष्य करणाऱ्या राज यांनी मागील लोकसभा निवडणुकीसाठी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत ते दोन्हींपासून अलिप्त राहिले. आता एकाएकी उद्धव यांच्या सेनेसोबत जाण्याचे संकेत ते देऊ लागले आहेत, त्यामागे पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न तर आहेच, शिवाय भाजपकडून त्यांना त्यासाठी अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले जात असावे अशी शंका घेण्यास वाव आहे. परंतु राज यांच्यापेक्षा उद्धव यांची राजकीय ताकद अजूनही मोठी आहे. त्यामुळे राज यांच्या प्रस्तावावर विश्वास ठेवून तडजोड करण्याची उद्धव यांची तयारी दिसत नाहीत. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली. परंतु उद्धव यांना राजकीय भूमिका घेण्यासाठी रश्मी ठाकरे यांच्याकडून दबाव येत असेल असे वाटत नाही. ते स्वयंनिर्णय घेण्यास निश्चितच समर्थ आहेत आणि रश्मी ह्यांनी स्वतःला कटाक्षाने राजकारणापासून अलिप्त ठेवले आहे. मध्यंतरी त्यांच्या माहेरच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होऊनही त्या शांत राहिल्या. त्यामुळे शिंदे गटाकडून झालेल्या ह्या टीकेकडे त्या दुर्लक्ष करतील हे दिसतेच आहे. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदऱ्यांसारख्यांनी प्रयत्न करून पाहिले होते, परंतु ते शक्य झाले नव्हते, मग आता एकाएकी राज यांना उद्धव यांना साथ देण्याचे का सुचावे असा प्रश्न कोणालाही पडणारच. राज यांना उद्धव यांच्याशी हातमिळवणी करायला लावण्यामागे भाजपचे राजकारण असू शकते अशीच शक्यता मग दृढ होते, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतर राखू लागलेल्या उद्धव यांना सोबत घेऊन त्या दोन्ही पक्षांची ताकद कमी करण्यास भाजप उत्सुक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांच्याशीही भाजपने जवळीक वाढवली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचीही पुडी नुकतीच सोडण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर सर्वस्व पणाला लागलेल्या उद्धव यांनी अद्याप तरी आपला पक्ष टिकवून ठेवला आहे. भाजपने मुख्यमंत्रिपद स्वतःकडे घेतल्यापासून आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यापासून शिंदे गटाचे महत्त्व कमी झाले आहे. अशा वेळी राज यांच्या माध्यमातून उद्धव यांच्याशी बाहेरून का होईना, अप्रत्यक्ष हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करून भाजप आपल्या विरोधकांची शक्ती अधिक क्षीण करण्याचा प्रयत्न करीत आहे असेच दिसते.