उमेदवारी, युतीचा निर्णय संसदीय समिती घेईल

0
35

>> भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; ऐतिहासिक संख्याबळाने विधानसभा निवडणूक जिंकणार

कुटुंबातील एकाच सदस्याला पक्षाची उमेदवारी देण्याची भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे; परंतु गोवा हा त्याला अपवाद असू शकतो. त्यासंबंधी तसेच समविचारी पक्षांशी निवडणूकपूर्व युती करायची की नाही याविषयीचा निर्णय पक्षाची संसदीय समिती घेईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आपल्या गोवा भेटीदरम्यान पत्रकार परिषदेत केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सर्वतोपरी सज्ज असून, ही निवडणूक भाजप ऐतिहासिक संख्याबळाने जिंकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री व निवडणूक सहप्रभारी जी. किशन रेड्डी, रेल्वे व वस्त्रोद्योगमंत्री दर्शना जर्दोष, तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचीही पणजीतील पत्रकार परिषदेस उपस्थिती होती.
गोव्यातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांसमवेत पक्षाची निवडणूक रणनीती आखण्यासाठी फडणवीस यांचे गोव्यात दोन दिवसांसाठी आगमन झाले आहे. पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक झाल्यानंतरची फडणवीस यांची ही पहिलीच गोवा भेट आहे.

पर्रीकरांच्या अनुपस्थितीत पहिलीच निवडणूक
गोव्यात भाजपला ज्यांनी सर्वसमावेशक चेहरा दिला, त्या मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत पक्ष या निवडणुकीला सामोरा जात असल्याचे फडणवीस उद्गारले. मात्र, पर्रीकरांनंतर डॉ. सावंत यांनी राज्य प्रशासनाची धुरा समर्थपणे हाताळल्याचे गौरवोद्गारही फडणवीस यांनी काढले.

भाजपचेच सरकार सत्तेवर
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचेच सरकारच सत्तेवर येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणि राज्यात डॉ. सावंत सरकारने केलेल्या विकासकामांची पोचपावती येत्या निवडणुकीत मतदार देतील, असेही फडणवीस म्हणाले.

पक्षांतराचा विचार संबंधित
पक्षाच्या नेत्यांनीच करावा

कॉंग्रेसमधून दहा आमदारांच्या भाजपमध्ये झालेल्या घाऊक पक्षांतरासंबंधीच्या एका प्रश्नावर एवढ्या मोठ्या संख्येने पक्षांतरे का होतात, त्याचा विचार त्या पक्षाच्या नेत्यांनी करावा, असे फडणवीस उत्तरले. कॉंग्रेस पक्षामध्ये स्वतःच्या नेतृत्वाबाबतच अविश्वास आहे, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली. कॉंग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्यांच्या जागी राहुल गांधी यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसमधून केली जात आहे. एकीकडे पूर्णवेळ अध्यक्षाची मागणी करणारा कॉंग्रेससारखा पक्ष आहे, तर दुसरीकडे अहोरात्र केवळ देशाचाच विचार करणार्‍या नरेंद्र मोदी यांचा भाजप असल्याचे ते म्हणाले.

पर्रीकर कुटुंबाच्या पक्षनिष्ठेवर शंका नको
भाजपच्या निवडणूक प्रचार मोहिमेमध्ये मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर का दिसत नाहीत, या प्रश्नावर पर्रीकर कुटुंबाच्या पक्षनिष्ठेवर शंका घेऊ नका, असे फडणवीस म्हणाले. अजून प्रचाराला सुरुवात झालेली नाही. प्रत्यक्ष प्रचार सुरू होईल, तेव्हा ते त्यात सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस यांचे काल सकाळी दाबोळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी त्यांचे स्वागत केले.

पुन्हा पुन्हा येतच राहणार!
भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गोवा भेटीच्या पहिल्या दिवशी काल पक्षाचे विविध मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा पंचायत सदस्य, तसेच आमदारांसमवेत बैठका घेऊन त्यांना आगामी निवडणुकीसंबंधी मार्गदर्शन केले. ‘मी पुन्हा येईन’ असे आपण म्हणाला होता. गोव्यातही हे विधान करणार का, असे पत्रकारांनी विचारले असता ‘गोव्यात पुन्हा पुन्हा येतच राहणार’ असे ते म्हणाले.