उमेदवारी यादीनंतर भाजपमध्ये बंडाचे वारे

0
26

>> पक्षासमोर मोठे आव्हान; दीपक पाऊसकर, सावित्री कवळेकर अपक्ष लढणार; पर्रीकर, पार्सेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

बहुप्रतीक्षित आणि सर्वांचे लक्ष लागून राहिलेली भाजप उमेदवारांची यादी काल अखेर जाहीर झाली. भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ४० पैकी ३४ मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले असून, ही यादी नवी दिल्ली येथे जाहीर करण्यात आली. अपेक्षेनुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राणे आणि मोन्सेरात दांपत्याला उमेदवारी मिळाली आहे, तर उत्पल पर्रीकर, दीपक पाऊसकर, फिलीप नेरी रॉड्रीगीस, इजिदोर फर्नांडिस, लक्ष्मीकांत पार्सेकर व सावित्री कवळेकर या प्रमुख दावेदारांना उमेदवारी नाकारली आहे. परिणामी उमेदवारी नाकारलेल्या भाजपमधील दावेदारांनी आता बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यामुळे पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

भाजपने उमेदवारी नाकारल्याने मंत्री दीपक पाऊसकर, सावित्री कवळेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे, तर उत्पल पर्रीकर हे शुक्रवारी व लक्ष्मीकांत पार्सेकर येत्या तीन दिवसांत निर्णय जाहीर करतील.

दीपक पाऊसकर अपक्ष लढणार
दीपक पाऊसकर यांनी आपल्याला उमेदवारी दिली जाणार नाही, तर आपल्या बंधूला उमेदवारी देण्याची विनंती केली होती. भाजपने दोन्ही प्रस्ताव नाकारल्यानंतर मंत्री पाऊसकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत अपक्ष निवडणूक लढवण्याचा विचार बोलून दाखवला आहे.

पक्षाकडून पक्षपात : सावित्री कवळेकर
सावित्री कवळेकर यांनी सांगे मतदारसंघातील उमेदवारीसाठी दावा केला होता. उमेदवारी नाकारल्याने नाराज बनलेल्या सावित्री कवळेकर यांनी कार्यकर्त्यांची काल बैठक घेत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. भाजपने राणे आणि मोन्सेरात या दोन दांपत्यांना उमेदवारी दिली; मात्र आपल्याबाबत निर्णय घेतला पक्षपात केला आहे, असा आरोप कवळेकर यांनी यावेळी केला. त्यांनी भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला.

पार्सेकर ३ दिवसांत घेणार निर्णय
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकात पार्सेकर यांनी काल कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पार्सेकर यांनी भाजपचा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, अशी मागणी बैठकीत कार्यकर्त्यांनी केली. राजकीय भवितव्याबाबत येत्या तीन दिवसांत निर्णय घेणार आहे, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच भाजप जाहीरनामा समिती अध्यक्षपदाचा राजीनामाही ते देणार आहेत.