उमेदवारांची खर्चमर्यादा ४० हजारांपर्यंत वाढवली

0
101

>> पंचायत निवडणूक ः २१ निर्वाचन अधिकार्‍यांची नियुक्ती

– ११ जून रोजी १८६ पंचायतींच्या निवडणुका
– उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासून आचार संहिता
– सरकारी कार्यक्रमांवर विशेष निर्बंध नाहीत
– प्रभाग आरक्षणाबाबत अद्याप अधिसूचना नाही

येत्या दि. ११ जून रोजी होणार्‍या १८६ पंचायत निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उतरणार्‍या प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा पंचवीस हजारावरून चाळीस हजारांवर आणणारी अधिसूचना काल दुपारी राज्य निवडणूक आयोगाने जारी केली. प्रचारकाळात खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच निरीक्षकांची नियुक्ती केली जाईल, असे आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी सांगितले.

निवडणुकीची मतमोजणी तालुका केंद्रातून होणार असून निवडणूक प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी एकूण २१ निर्वाचन अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. मामलेदारांची निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासून निवडणूक आचारसंहिता लागू होईल, असे असले तरी सरकारच्या कार्यक्रमावर विशेष निर्बंध घालणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.
मतदारांना आपले मतदान कोणत्या केंद्रावर जाऊन करावे, याची माहिती असणे आवश्यक आहे. याबाबतीत गोंधळ उडू नये म्हणून आयुक्तांनी काळजी घेण्याचे ठरविले आहे. निवडणुकीत आरक्षणाची उपलब्ध आल्याशिवाय निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे शक्य नसल्याने अधिसूचना जारी करण्यास विलंब झाला तरी आयोगाने तयारी ठेवल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.
मतदानाची मंडप
गेल्या पंचायत निवडणुकीत ८०.३१ टक्के मतदान झाले होते. यावेळी ऐन पावसाळ्यात निवडणूक होत आहे. मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून मतदान केंद्रावर आवश्यक तेथे मंडप उभारण्याची तयारी ठेवल्याचे आयुक्तांनी सांगितले.
आरक्षण व फेररचनेबाबत गोंधळ
येत्या ११ जून रोजी होणार्‍या पंचायत निवडणुकीसाठीच्या प्रभागांचे आरक्षण व प्रभांगाच्या फेररचनेच्या प्रक्रियेत बराच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. किचकट स्वरुपाच्या या प्रक्रियेत राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे गोंधळात भर पडली आहे. निवडणुकीच्या दिवशी कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करावे याबाबतीतही मतदारांची तारांबळ उडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. काल संध्याकाळपर्यंत राज्य निवडणूक आयुक्त प्रभागांच्या आरक्षणासंबंधीच्या अधिसूचनेची वाट पहात होते. कोणत्याही स्थितीत आज अधिसूचना जारी होणे आवश्यक होते. त्यामुळे पंचायत खात्यातील कर्मचार्‍यांची काल रात्रीपर्यंत धावपळ सुरू होती.

१८ पासून अर्ज स्वीकारणार
पुढील महिन्याच्या ११ जून रोजी होणार्‍या पंचायत निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याची तारीख १८ ते २५ मे २०१७ अशी आहे. उमेदवारांच्या अर्जांची छाननी दि. २६ आणि २७ मे असे दोन दिवस होणार असून अर्ज मागे घेण्याची तारीख दि. २९ मे आहे. दि. ११ जून रोजी मतदान झाल्यानंतर दि. १३ जून रोजी मतमोजणी होईल.