उन्हाळा गावाकडचा!

0
909
  • सुनेत्रा कळंगुटकर

अवघ्या थोड्याच दिवसांत आभाळातून पाऊसपक्षी थेंबांची पिसे सांडत अलगद वसुंधरेवर उतरणार असतो. रसरंगगंधनादाची अनंत हस्तांनी उधळण करणारा, मुलाबाळांना रिझवणारा, मनामनाला आल्हाद देणारा चैतन्यदायी उन्हाळा पुढील वर्षी पुन्हा येण्याचे वचन देऊन सृष्टीचा निरोप घेण्यासाठी सज्ज होतो…

फाल्गुनी पौर्णिमेला होळी साजरी होते आणि आभाळातून, झाडांवरून गावात उन्हाळा उतरायला लागतो. उन्हाची धग हळूहळू वाढू लागते. उन्हाच्या काहिलीने झाडं-झुडपं, जनावरांची तगमग होऊ लागते. रखरखत्या उन्हात गुरं सावली शोधू लागतात. एखाद्या डेरेदार वृक्षाच्या गार सावलीत विसावतात. कृष्णपक्षी, बुलबुल अशा पक्ष्यांची घरटी बांधून अंडी घालण्याची लगबग सुरू होते. झाडांझाडांवर फांद्यांच्या बेचक्यात कावळ्यांची काटक्यांची ओबडधोबड घरटी दिसू लागतात.

सावरीच्या झाडावरील काळ्या रंगाची कापसाची बोंडं फुटून त्यातून मऊशुभ्र कापूस बाहेर पडतो आणि वार्‍यावर स्वार होऊन सभोवताली जमिनीवर पसरतो. जमिनीच्या अंगावर पसरलेल्या त्या पांढर्‍याशुभ्र कापसामुळे जमीन जणू शुभ्र वस्त्र धारण केलेली संन्यासिनीच भासते. वार्‍यावर उडणार्‍या कापसाच्या मागं मुलं धावू लागतात आणि कापूस हातात आला की एखादा अमोल ठेवा गवसल्यागत त्यांना अपरिमित आनंद होतो.

परीक्षा होऊन शाळांना सुट्‌ट्या लागतात आणि गावातील मुलांची निसर्गाची शाळा सुरू होते. चैत्र-वैशाखात सृष्टीवर ऋतुराज वसंताचं साम्राज्य असतं. वसंतऋतूत झाडांना नवीन पालवी फुटते. पानांफुलांना बहर येतो. वसंताचा उत्सव सुरू होतो. उन्हाची प्रखरता वाढू लागते. रसरंगरूपगंधनादमय उन्हाळ्याचं सौंदर्य हळूहळू उलगडू लागतं. झाडावरून कोकिळांचं आर्त कुहूकुहू ऐकू येतं. बुलबुल, दयाळ यांचं सुरेल गायन सुरू होतं. आंबा, काजू, फणस, जांभळं, करवंदं, चुन्नं, भिरंडं, गुलमोहर, मोगरा अशी अनेक प्रकारची फळं-फुलं उन्हाळ्याला रूपरंगरसगंधाचं वैभव बहाल करतात. उन्हाळा नानातर्‍हेच्या फळा-फुलांमधून लाल, हिरवा, पिवळा, केशरी, निळा, जांभळा अशा अनेक रंगांची जणू रंगपंचमीच खेळत असतो. गावातील पोरासोरांना खुणावत असतो.

रस्त्याच्या कडेवरील आंब्याच्या झाडांवरील हिरव्यागार कैर्‍या, आंबे वार्‍यावर झोके घेत असतात. वार्‍यानं एखादी कैरी, आंबा खाली पडत असतो. मुलं धावत जाऊन त्यावर झडप घालतात. दगड भिरकावून कैर्‍या, आंबे पाडून ते आंबटगोड चवीनं खातात. काजूच्या बागांमध्ये झाडं लाल-पिवळ्या बोडांनी भरलेली असतात. ही काजूची बोंडं मुलांना खुणावतात. मग पोरांची वानरसेना काजूच्या बागांकडे वळते. कधी बागेतील राखणदाराची विनवणी करून, तर कधी त्याची नजर चुकवून काजूची बोंडं मिळवली जातात. काही कच्चे काजू, बिब्बेही खिशात भरले जातात. काही बोंडं तिथल्या तिथं खाल्ली जातात. उरलेली बोंडं उस्कीच्या झुडुपाच्या लहान फांदीत गुंफून त्यांची माळ बनवली जाते आणि ती हातात धरून मोठ्या ऐटीत मुलांची सेना घरची वाट धरते.
उन्हाळ्यात करवंदं, चुन्नं असा रानमेवा झाडांना लगडतो आणि मुलांची भिरी हा रानमेवा लुटण्यासाठी भिरभिरतात. पाखरांसारखी धाड घालून करवंदीच्या जाळीतील हिरवी, काळीकरंद करवंदं, चुन्नांच्या झाडावरील मोतिया रंगाची चुन्नं दोन्ही हातांनी लुटतात. रानमेव्यानं मुलांचे खिसे भरून जातात. जणू आनंदाचा खजिनाच त्यांना गवसलेला असतो. जांभळांच्या देखण्या घोसांनी जांभळीचं झाड भरून गेलेलं असतं. मुलं दगड मारून जांभळं पाडतात. झाडाखाली जांभळांचा खच पडलेला असतो. कुणीतरी वर चढून झाडांवरील जांभळांचे घोस काढतात. गर्द जांभळ्या रंगाची ताजी जांभळं खाऊन मुलांच्या जिभा जांभुळतात. भिरंडीच्या झाडाची लालगुलाबी भिरंडं चवीनं खात गंमतजंमत करीत, उद्याचे बेत रचित मुलं आनंदानं घरी परततात.

गावाला नदीची सुंदर किनार लाभलेली असते. उन्हानं तापलेल्या गावाला गारवा देत नदी वाहत असते. तिच्या किनार्‍यावरील हिरवाई उन्हानं तप्त झालेल्या डोळ्यांना सुखद गारवा देत असते. उन्हाळ्यात नदीचं पात्र काहीसं कृश झालेलं असतं. नदीच्या पारदर्शी पाण्यातील गुळगुळीत गोटे, शेवाळ दिसतं. नदीतील लहानमोठे चमकदार मासे उन्हात लख्ख चमकतात. उन्हाच्या काहिलीने तप्त झालेलं शरीर नदीत पाय बुडवल्यावर सुखावतं. नदीचं थंड नितळ पाणी पायांना बिलगतं. पाण्यातून हा गारवा शरीरात झिरपत जातो आणि उन्हाच्या तापानं श्रांत झालेले डोळे थंडावतात. पाण्यात पाय बुडवून आपण कितीतरी वेळ तसेच उभे राहतो. प्रवाहातून वाहत येणारी नदीकाठावरील बकुळीची इवली फुलं आपली ओंजळ सुगंधानं भरून टाकतात. नदीचं हिरवं पाणी आपल्या रुपानं, स्पर्शानं आपल्यावर गारूड करतं. त्या हिरव्या गारूडात मंत्रमुग्ध झालेल्या मनाला मग वेळेचंही भान उरत नाही.

सुट्टीत गावातील मुलं नदीची वाट धरतात. नदीकाठावरील लहानगं झाड नदीच्या पात्रावर झुकलेलं असतं. काही मुलं त्या झाडावर चढून नदीच्या पात्रात उड्या टाकतात. नदीच्या काठावर असलेल्या उंच कड्यावर एक मोठं आंब्याचं झाड असतं. काही मुलं पोहत पोहत त्या आंब्याच्या झाडाखाली जातात. काहीवेळा झाडावरील छोटे आंबे नदीच्या पात्रात पडतात. झाडावर बसलेली वानरंही आंबे खाली टाकतात आणि पोहणार्‍या मुलांना आयतेच आंबे सापडतात. वरून पडलेला आंबा मिळवण्यासाठी मग पाण्यात मुलांची शर्यत लागते. आंबा हातात आल्यावर मुलांच्या चेहर्‍यावर उमटणारा आनंद अवर्णनीय असतो. पोहणार्‍या मुलांमध्ये नदीच्या एका काठावरून दुसर्‍या काठापर्यंत पोहचण्याची शर्यत लागते. पाणी ढवळीत सगळेजण वेगाने एका काठावरून दुसर्‍या काठापर्यंत जातात आणि पुन्हा त्याच वेगाने परत फिरतात. नदीचा तळ ढवळला जाऊन पाणी लाल बनतं. मुलं पाण्यात लहानलहान दगड भिरकावून खेळ खेळतात. पाण्यात कपडा पसरवून छोटे छोटे मासे धरतात. तासन् तास नदीत डुंबताना संध्याकाळ कधी होते हे कळतही नाही. उतरणारी उन्हं नदीच्या पाण्यावर पसरू लागतात आणि मुलं घरच्या वाटेला लागतात.

वैशाखात उन्हाची प्रखरता वाढू लागते. एखाद्या चित्रकाराने रंगविलेल्या चित्रात अधूनमधून कुंचल्यानं लालपिवळ्या रंगाचे फटकारे मारावेत त्याप्रमाणे लालकेशरी, पिवळ्या फुलांनी बहरलेले गुलमोहराचे वृक्ष दृष्टी वेधून घेतात. उन्हाळ्याला सुरूवात झाल्यावर गुलमोहराची चिंचेच्या पानांसारखी असलेली पानं गळतात आणि फुलं येतात. लाल गुलमोहराच्या झाडाला लहान तलवारीसारख्या शेंगा असतात. गुलमोहराचं पुष्पवैभव प्रखर उन्हाळा आल्हाददायक बनवतं. सूर्याच्या शरांचे वार अंगावर झेलत फुलणारी ही स्वर्गीय फुलं सगळ्या आसमंताला सौंदर्याचं देणं देतात.

गावातील फणसांची झाडं हिरव्या हिरव्या लांबट, भरीव अंगाच्या फणसांनी जडावलेली असतात. सगळीकडे पिकलेल्या फणसांचा घमघमाट सुटलेला असतो. घरात रोज एकतरी फणस फोडला जातो. येणार्‍या-जाणार्‍या पाहुण्यांना, गावातील लोकांना फणस दिले जातात. फणसाची साटं केली जातात. फणसाचे गरे, आठळ्या सुकवून पावसाळ्यात खाण्यासाठी साठवल्या जातात. आंब्यांच्या झाडांवर हिरवे आंबे लोंबत असतात. झाडांवर तयार झालेले आंबे काढून गवतात घालून पिकवले जातात. पिकलेले आंबे पाहुण्यांना, परिचितांना, शेजार्‍या- पाजार्‍यांना पोहचवले जातात.

उन्हाळ्यात गाव हळूहळू पावसाळ्याच्या तयारीला लागतो. गावातील कौलारु घरं शाकारली जातात. माकडांनी उड्या मारून मारून फोडलेली कौलं बदलून नवीन घातली जातात. चुडताची खोपटी नवीन चुडतांनी शाकारली जातात. गावातील कष्टकरी बायका बारीक-मोठी लाकडं रानातून आणून विकतात. बारीक लाकडं खोपटात व्यवस्थित रचून ठेवली जातात. मोठी लाकडं लाकूडफोड्याकडून फोडून घेऊन खोपटात व्यवस्थित भरून ठेवली जातात. गावात मीठ घेऊन येणार्‍या गाडीतून पावसाळ्यात लागणार्‍या मीठाची खरेदी केली जाते. माडांचे नारळ काढले जातात. मिरची उन्हात घालून सुकवून ठेवली जाते. घरात लोणची, पापड, सांडगे तयार होतात. सगळं घरच या कामांना लागतं. मुंग्यांनी जशी बेगमी करावी तसा सगळा गाव पावसासाठी बेगमी करायला लागतो. पाऊस पडायला लागल्यावर सुरू होणार्‍या शेतीच्या कामांसाठी शेतकर्‍यांची तयारी सुरू होते.

वैशाखवणव्यात वाहणार्‍या गार वार्‍याच्या झुळका धगधगणारी सूर्याची आग सुसह्य करतात. कधीमधी बरसणार्‍या वळवाच्या सरी गारवा शिंपतात. हळूहळू दूर आभाळात कृष्णमेघांची चाहूल लागू लागते. अवघ्या थोड्याच दिवसांत आभाळातून पाऊसपक्षी थेंबांची पिसे सांडत अलगद वसुंधरेवर उतरणार असतो. रसरंगगंधनादाची अनंत हस्तांनी उधळण करणारा, मुलाबाळांना रिझवणारा, मनामनाला आल्हाद देणारा चैतन्यदायी उन्हाळा पुढील वर्षी पुन्हा येण्याचे वचन देऊन सृष्टीचा निरोप घेण्यासाठी सज्ज होतो…