उद्यापासून तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस

0
37

हवामान खात्याने उद्या रविवार दि. ५ सप्टेंबरपासून पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. वरील काळात हवामान खात्याने राज्यात ‘एलो अलर्ट’चा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून परिणामी ५ ते ७ सप्टेंबर या दरम्यान राज्यात परत एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच संपूर्ण राज्यभरात जोरदार पाऊस होऊ शकतो, असे खात्याने स्पष्ट केले आहे.

उद्या ५ सप्टेंबर रोजी ६.४ से.मी. पर्यंत पाऊस होऊ शकतो. तसेच ६ ते ७ सप्टेंबर या दरम्यान राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यापासून ३१ ऑगस्टपर्यंत राज्यात २६०.४ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत ३१ ऑगस्टपर्यंत ३ टक्के एवढा कमी पाऊस झाला आहे.
‘एलो अलर्ट’मुळे जोरदार पाऊस व वारा यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी, असा इशारा देण्यात आलेला आहे.