कालपासून महाराष्ट्रात लातूरजवळच्या उदगीरमध्ये सुरू झालेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये संमेलनाध्यक्ष श्री. भारत सासणे, उद्घाटक श्री. शरद पवार आणि प्रमुख पाहुणे व ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ कोकणी लेखक श्री. दामोदर मावजो या तिघांच्याही भाषणांमध्ये लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा प्रकर्षाने चर्चिला गेला आणि तो अनपेक्षितही नव्हता. परंतु त्या निमित्ताने एकूण तिघांचाही रोख देशातील विद्यमान राजवटीवरच असल्याचेही दिसले. संमेलनाध्यक्ष सासणे यांचे जवळजवळ संपूर्ण अध्यक्षीय भाषण बोचर्या टोमण्यांनी ठासून भरलेले होते. ‘काळ तर मोठा कठीण आला आहे’ हेच त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचे एकूण सूत्र दिसून आले. आजकाल साहित्य संमेलनामधून अशा प्रकारची प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्धची मते प्रकट करणे हे प्रतिष्ठेचे ठरू लागले आहे की काय असे त्यामुळे वाटू लागले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर साहित्यिक भूमिकेच्या आडून आपली विशिष्ट राजकीय भूमिका आणि विचारधारा मांडण्यासाठीच सर्रास होत आलेला गेली काही वर्षे प्रकर्षाने दिसतो आहे. बडोद्याच्या संमेलनात तत्कालीन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘राजा, तू चुकतो आहेस’ चा इशारा दिला होता. या संमेलनामध्ये सासणेंनी यंत्रयुग आणि तंत्रयुगानंतर आपण भ्रमयुगात येऊन पोहोचलो आहोत, सामान्य माणूस भ्रमित, संमोहित झालेला आहे, त्याची वाचा हरवलेली आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक त्याच्या जगण्याला वेढून व्यापून राहिलेला आहे आणि या भीतीबद्दल साहित्याने बोलणे, सांगणे अपेक्षित आहे असे ठासून सांगितले. तेवढे बोलून ते थांबले नाहीत, तर आपण सध्या छद्मबुद्धी विद्धंसकांच्या ताब्यामध्ये जातो आहोत, ही काळरात्रीची सुरूवात आहे, एका पुंगीवाल्यामागून समाज फरफटत चाललेला आहे वगैरे वगैरे कोरडे ओढत त्यांनी आपली विशिष्ट राजकीय भूमिकाच आपल्या अध्यक्षीय भाषणामधून बळेबळे मांडण्याचा प्रयत्न केला.
संमेलनाचे उद्घाटक शरद पवार तर स्वतः राजकारणी नेतेच. त्यामुळे त्यांनीही देशातील विद्यमान राजकीय नेतृत्वावर ताशेरे ओढणे स्वाभाविक होते. त्यात भरीस भर म्हणून आपले ज्ञानपीठकार दामोदर मावजो यांनी आज साहित्यात सत्ताधार्यांना चिअर्स करणारे चिअर लीडर्स तयार झाले आहेत असे म्हणत आपलेही हात धुवून घेतले. सत्ताधार्यांना चिअर्स करणारे चिअर लीडर्स आजच तयार झालेले आहेत काय? प्रत्येक राजवटीमध्ये, प्रत्येक विचारधारेच्या राजवटीमध्ये असे सत्तेपुढे नांगी टाकणारे, हांजी हांजी करणारे होते आणि अर्थात आजही आहेत. ती शेवटी एक प्रवृत्ती आहे. विशिष्ट विचारधारेचाच साहित्यिक हा ताठ कण्याचा असतो असे कसे काय म्हणता येईल? कोणी कधी कोणापुढे कसे कणे झुकवले त्याचा इतिहास खरोखर मांडला गेला तर भल्याभल्यांना चेहरे लपवणे कठीण जाईल. आणीबाणीच्या काळ्या कालखंडामध्ये कोणी कोणी कसे शेपूट घातले होते हे देश विसरलेला नाही.
साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे जरूर असावे, परंतु ते त्याच्या आडून आपल्या राजकीय भूमिका मांडण्याचा मंच बनू नये एवढीच सामान्य वाचकाची अपेक्षा आहे, कारण तो तेथे आपली साहित्यिक भूक भागविण्यासाठी मोठ्या अपेक्षेने आलेला असतो. आपला राजकीय कंडू शमवण्यासाठी नव्हे. अशा व्यासपीठावरून राजकीय नेतृत्वाला जेव्हा विदूषक, थाळीवाला आणि पुंगीवाला संबोधून खिल्ली उडविली जाते तेव्हा एका परीने देशातील लोकशाही प्रक्रियेप्रतीच यातून अविश्वास प्रकट होतो असे म्हणणे भाग आहे. भाषणांतून मांडली गेलेली अस्वस्थता ही खरोखर लेखकाची अस्वस्थता आहे की सत्तेपासून दूर राहिलेल्या विचारांची अस्वस्थता आहे, असा प्रश्न मग कोणी विचारला तर चुकीचे कसे म्हणायचे?
साहित्य संमेलनामध्ये काल गोव्यातील कोकणी – मराठी वादाचेही पडसाद उमटले. एकीकडे कोकणी लेखकाला संमेलनात बोलवायचे आणि प्रत्यक्ष उद्घाटनसत्रामध्ये ‘आम्हाला तुम्हाला बोलवायचे नव्हते’ असे सांगणे हे अशिष्टपणाचे ठरते असे आम्हाला वाटते. कोकणी ही आज बोली राहिलेली नाही, ती भाषा म्हणून विकसित होते आहे हे वास्तव मराठीप्रेमींनी आता स्वीकारायला हवे, आणि गोव्यातील मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीची परंपरा कोणी कितीही अमान्य केली तरी ती पुसली जाणारी नाही हे कोकणीच्या पुरस्कर्त्यांनीही लक्षात ठेवायला हवे. संवाद जरूर व्हायला हवा, परंतु त्यासाठी आधी एकमेकांचा द्वेष सोडावा लागेल. हे द्वेष करणे थांबेल तेव्हाच तर संवादाला वाव मिळेल!