उत्सव ः जीवनविकासाचा मार्ग

0
14

(योगसाधना- ५७१, अंतरंगयोग- १५६)

  • – डॉ. सीताकांत घाणेकर

आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर आपल्या इंद्रियांचा एक गण आहे. या गणाचा पती मन आहे. कोणतेही कार्य सिद्धीस न्यायचे असेल तर आपला हा गणपती ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पूजण्याचा अर्थ असा की मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत व स्थिर करायचे.

प्रत्येक देशात विविध उत्सव असतात. यासंदर्भात थोडा खोल विचार केला तर लक्षात येईल की आपला भारत देश अत्यंत उत्सवप्रिय आहे. इथे देव-देवतांची अनेक रूपं आहेत. त्यामुळे काही उत्सव राष्ट्रस्तरावर आहेत, तर काही राज्यस्तरावर आहेत. त्याशिवाय या देवांची मंदिरे वेगवेगळ्या शहरांत-गावांत आहेत. त्यामुळे उत्सवांची संख्या वाढतच असते. वार्षिक जत्रा ही प्रत्येक देवस्थानची असतेच, पण काही उत्सव थोड्या देवस्थानांतच साजरे केले जातात.

भारतात श्रावण-भाद्रपद-आश्‍विन-कार्तिक हे चार महिने तर पुष्कळच उत्सव असतात. कुठलाही उत्सव म्हटला की जनतेचा उत्साह वाढतो. लहान-मोठे सर्वजण उत्सवाच्या कर्मकांडात आनंदाने, उमेदीने सहभागी होतात.

भाद्रपदातील अत्यंत लोकप्रिय उत्सव म्हणजे श्रीगणेशचतुर्थी. श्रीगणेशाचा जन्मच अगदी गूढ. त्याबद्दलची कथा रोचक. पण सुज्ञ, विद्वान व्यक्तींनी त्याविषयी विचार करून त्यामागील भावार्थ-गर्भितार्थ, तसाच सूक्ष्म आध्यात्मिक विचार करणे अत्यावश्यक आहे. बहुधा असे घडत नाही म्हणून हे सर्व उत्सव कर्मकांडात्मकच साजरे केले जातात. थोडे खोलात जाऊन ज्ञान संपादन केले तर उत्सवांबद्दल दृष्टिकोन बदलतो व ते ज्ञान जीवनात वापरले तर प्रत्येकाचा जीवनविकास होईल. आज आपण हाच विषय थोडा जाणून घेऊ…
श्रीगणपतीची कथा, हत्तीचे मस्तक, विविध अवयव यांबद्दल आपण सविस्तर जाणून घेतले. आता पुढे जाऊ.

  • दुर्वा ः गणपतीला आपण दुर्वा वाहतो आणि त्याची पूजा करतो. याचे कारण म्हणजे- शास्त्रकार सांगतात की, गणपतीला दुर्वा फार आवडतात. वरवर बघितले तर या साध्या गवताला काहीही महत्त्व नाही. पण देवाने या गवताला प्रिय मानले म्हणून त्याचे मूल्य वाढते.
    श्रीगणेशाला आपण तत्त्ववेत्ता व नेता या स्वरूपात बघतो. खरा तत्त्ववेत्ता व नेता ज्यांना समाजात काही महत्त्व नाही, ज्यांना कोणी विचारीत नाहीत, अशांना आश्रय देतात.
    परमपूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले दुर्वांबद्दल हा सुंदर, श्रेष्ठ विचार सांगतात.
    शास्त्रीजी म्हणतात की, दुर्वांना काही रंग नाही, सुगंध नाही. आपणदेखील रंगविरहित, सुगंधविरहित- ज्यांची जगाच्या दृष्टीने काहीही किंमत नाही. असे कर्मदेखील प्रभूचरणावर प्रेमाने वाहिले तरी त्याला ते आवडते.

खरेच आहे. शेवटी देव भावाचा, प्रेमाचा भुकेला. प्रत्येकवेळी जेव्हा आपण गणपतीला दुर्वा वाहतो त्यावेळी असा विचार आपल्या मनात आला तर कुणीही स्वतःला दीन, दुबळा मानणार नाही.
या तत्त्वज्ञानाची आजच्या विश्‍वात अत्यंत गरज आहे. कारण समाजाच्या जडणघडणीमध्ये अशिक्षित, गरीब व्यक्तींना दुय्यम स्थान असते. त्यांना आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी हे ज्ञान आवश्यक आहे. अशा व्यक्तींना न्यूनगंड असतो. त्यांनी लक्षात ठेवायला हवे की ते जरी अशिक्षित असले, गरीब असले तरी अनेक सत्कर्मे ते करू शकतात. त्यामुळे ते देवाचे लाडके होऊ शकतात.

  • लाल फूल ः गणपतीला लाल फूल आवडते असे सांगितले जाते. लाल हा क्रांतीचा रंग मानला जातो. गणपती नेता असल्यामुळे त्याला दैवीक्रांती अपेक्षित आहे.
  • तांदूळ ः प्रत्येक पूजेमध्ये आपण देवाला तांदूळ वाहतो, म्हणजे ‘अक्षता’ वाहतो. अक्षता म्हणजे अखंड. इथे गर्भितार्थ आहे तो म्हणजे देवाची भक्ती अशी अखंड असावी.
    श्रीगणेशाला विविध नावे आहेत. त्यातील एक म्हणजे वक्रतुंड.
    १) पूजनीय शास्त्रीजी यासंबंधी सांगतात- रिद्धी-सिद्धीपासून मुख फिरवून राहणार्‍यालाच रिद्धीसिद्धी प्राप्त होतात.
    २) वक्रतुंडाबद्दल एक व्याख्या आहे- ‘व क्रान्- तुंडयति इति वक्रतुंड|’
    वाकडे-तिकडे चालणार्‍याला, आडव्या रस्त्याला जाणार्‍याला जो दंड देतो तो वक्रतुंड. नेत्यांबद्दल व तत्त्ववेत्त्यांबद्दल अशी अपेक्षा ठेवायला हवी.

सहज विचार केला तर लक्षात येईल की आजच्या विश्‍वात आडव्या रस्त्याने जाणार्‍या अनेक व्यक्ती आहेत. क्षणोक्षणी, जागोजागी प्रत्येकाला असा अनुभव मिळतो. त्यामुळेच पुष्कळ नकारात्मक घटना घडतात. लाचलुचपत, निसर्गनाश, नीतिमत्तेचे पालन न करणे, लढाया, तंटे-बखेडे… अशावेळी तत्त्ववेत्ते म्हणजे समाजातील विद्वान व नेते म्हणजे समाजातील धुरीण यांनी स्वतः पुढाकार घेऊन या सर्व गोष्टी बंद केल्या पाहिजेत. कारण त्यामुळे सर्वांना त्रास होतो व विश्‍व विनाशाच्या वाटेने वाटचाल करते. हे असे घडले तरच या व्यक्ती तत्त्ववेत्ते व नेते मानले जातील. तसेच त्यांना गणपती (गणांचा + पती) काय आहे व त्याचे गुण कोणते व त्याच्याकडून अपेक्षा काय आहेत याची जाणीव होईल व त्याप्रमाणे ते वागतील.

दुर्भाग्य या संस्कृतीचे व या राष्ट्राचे की आमच्यातील अनेक नेतेच भ्रष्ट होऊन वाकड्या मार्गाने जातात व अनुयायांना प्रेरित करतात.
त्यासंदर्भात प्रत्येकाकडे अनेक उदाहरणे असतील. आपण गोव्याचाच विचार केला तर लगेच लक्षात येईल की अशा पुष्कळ घटना रोजच्या जीवनात घडताहेत. पणजी मांडवी नदीतील वाढत असलेले कॅसिनो, बेकायदेशीर मटका, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थांचा भयावह धंदा, बांधल्यानंतर लगेच बिघडणारे पूल व रस्ते… यादी फार मोठी आहे.
इथे आपण या अशा घटनांचे कारण व त्यावर उपाय यावर विचार करीत आहोत.

प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीलाच आपण गणेशपूजन करतो. तत्त्ववेत्ता व नेते यांना गणपतीच्या रूपात बघितले व तसा त्यांना मान दिला, त्यांचा सत्कार केला, त्यांचे पूजन केले तर त्यांच्याकडून सतत मार्गदर्शन व सहकार्य मिळते व आपले इच्छित कार्य सिद्धीस जाते. आपले नेते असा विचार करतात का? त्यांना दिलेल्या पदाचा ते समाज व राष्ट्रविकासासाठी सर्वतोपरी उपयोग करतात का? बहुतेकजण स्वतःचाच स्वार्थ साधतात. अनेक अपवाद आहेत. आशेचा किरण हाच आहे. गणपती सर्वांना सद्बुद्धी देवो, हीच प्रार्थना.

पूजनीय शास्त्रीजी आणखी एक वेगळाच विचार मांडतात-

  • आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर आपल्या इंद्रियांचा एक गण आहे. या गणाचा पती मन आहे. कोणतेही कार्य सिद्धीस न्यायचे असेल तर आपला हा गणपती ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पूजण्याचा अर्थ असा की मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत व स्थिर करायचे, ज्याच्यामुळे काही विघ्ने उभी न व्हावीत, कार्य सुरळीतपणे पार पडावे.
    (संदर्भ ः पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले- ‘संस्कृतीपूजन- गणेशचतुर्थी’)