उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीने ४२ जणांचा मृत्यू

0
23

उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने भीषण स्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांना मोठा पूर आला असून मुसळधार पावसामुळे आतापर्यंत एकूण ४२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उत्तरखंड सरकारने दिली आहे. चंपावत जिल्ह्यात एक घर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नदीला पूर आल्याने बांधकाम सुरू असलेला पूलही वाहून गेला आहे. नैनी तलाव ओव्हर फ्लो झाला असून त्याचे पाणी आता रस्त्यांवरून वेगाने वाहत आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे नैनी तलाव तुडूंब भरून वाहत आहे. रस्ते बंद आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. मुसळधार पावसामुळे नैनीताल, रानीखेत, अल्मोडा ते हल्द्वानी आणि काठगोदामपर्यंत रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.

मुसळधार पावसात एसडीआरएफने आतापर्यंत २२ भाविकांना वाचवले आहे. चारधाम यात्राही स्थगित करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये अनेक भागांमध्ये होत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी पर्यटक अडकले आहेत. एसडीआरएफ आणि उत्तराखंड पोलिसांनी जानकी चट्टी येथून भाविकांना रात्री उशिरा सुरक्षित गौरीकुंडमध्ये पोहोचवण्यात आले. केदारनाथचे दर्शन घेऊन परतत असताना हे भाविक अडकले होते.

पंतप्रधानांकडून माहिती
मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील भीषण परिस्थितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करून माहिती घेतली. तसेच उत्तराखंडमधून येत असलेले केंद्रीय मंत्री अजय भट यांच्याशीही संपर्क साधला आणि मदतीचे आश्वासन दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री धामी यांच्याकडून फोनद्वारे माहिती घेत मदतीचे आश्वासन दिले आहे.

एनडीआरएफच्या १० टीम तैनात
उत्तराखंडमध्ये मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या १० टीम तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तराखंडच्या ७ जिल्ह्यांमध्ये या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. डेहराडून, अल्मोडा, पिथोरागढ, हरिद्वार यांच्यासह इतर जिल्ह्यांमध्ये या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच केदारनाथच्या दर्शनासाठी गेलेल्या ४ हजार भाविकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.