>> काँग्रेसला 17, तर सपा आणि अन्य घटक पक्षांना 63 जागा
>> राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्यात चर्चा; प्रियंकांची मध्यस्थी
गेल्या काही दिवसांपासून राजकीय धक्के सहन करणाऱ्या इंडिया आघाडीला उत्तरप्रदेशातून थोडा दिलासा मिळाला. केंद्रात सरकार बनवण्यासाठी सत्तेचा मार्ग ज्या राज्यातून जातो, त्या उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये जागावाटपाबाबत सहमती बनली. त्यामुळे उत्तरप्रदेशात इंडिया आघाडी कायम राहणार हे निश्चित झाले आहे. प्रदीर्घ संघर्षानंतर सपा आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाच्या सूत्रावर काल सहमती झाली. त्यानुसार काँग्रेस 17, तर सपा 63 जागांवर निवडणूक लढवणार आहे. सपा आपल्या कोट्यातून काही छोट्या पक्षांनाही जागा देऊ शकते. देशातील अन्य राज्यांपेक्षा उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत.
उत्तरप्रदेशात दोन्ही पक्षांमध्ये आघाडीची घोषणा करण्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या महत्त्वपूर्ण चर्चा झाली. तसेच इंडिया आघाडी कायम राहावी, यासाठी प्रियंका गांधी यांनी देखील मध्यस्थी केली.
काँग्रेसच्या वतीने यूपीचे प्रभारी अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि सपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल आणि प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन काल सायंकाळी युतीची घोषणा केली. 7 वर्षांनंतर उत्तरप्रदेशात काँग्रेस आणि सपा पुन्हा एकत्र निवडणूक लढवणार आहेत. यापूर्वी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढले होते.
उत्तरप्रदेशात काँग्रेस आणि सपामध्ये आघाडी झाल्याने इंडिया आघाडी वाचवण्याचा संदेश देशभर पोहोचणार आहे. 2014 मध्ये भाजप उत्तर प्रदेशातून पुढे आला होता आणि येथूनच 2024 मध्ये भाजप सत्तेतून बाहेर पडेल, असे सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले.
देशातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. शेतकरी, तरुण रस्त्यावर उतरले आहेत. आजचा समाज भाजपच्या डावपेचांना बळी पडत आहे. आम्ही देशाच्या आणि राज्यातील मतदारांना आवाहन करतो की त्यांनी राष्ट्र वाचवण्यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश पटेल म्हणाले.
राहुल गांधींच्या दौऱ्याचा इंडिया आघाडीवर सकारात्मक परिणाम झाला आहे. तसेच प्रियांका गांधी यांनी युती पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे अविनाश पांडे म्हणाले. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तरप्रदेशात असून, 24-25 फेब्रुवारीला या यात्रेत अखिलेश सहभागी होणार आहेत, असेही पांडे म्हणाले.
काँग्रेसला कोणत्या जागा मिळाल्या?
उत्तरप्रदेशात काँग्रेसला लोकसभेच्या ज्या 17 जागा मिळाल्या आहेत, त्यामध्ये रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघांबरोबरच कानपूर, नगर, फतेहपूर सिकरी, बसगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, अमरोहा, झांसी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, सितापूर, बाराबंकी आणि देवरिया या मतदारसंघांचा समावेश आहे.