उठाव की कट?

0
148

सडा उपकारागृहातील कैद्यांनी घातलेला हैदोस आणि त्यात एका कुख्यात गुंडाचा झालेला मृत्यू ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. या सार्‍या घटनेची समूळ न्यायालयीन चौकशीच सत्य काय हे समोर आणू शकेल. तुरुंगातील ४९ कैद्यांनी पळून जाण्यासाठी उठाव केला असे तुरुंगाधिकार्‍यांतर्फे सांगितले गेले. पण केवळ पळून जाण्यासाठी हा उठाव असता तर विनायक कारबोटकरचा मृत्यू निश्‍चितच ओढवला नसता. त्यामुळे पूर्वी मारल्या गेलेल्या अश्पाक बेंग्रेची टोळी व कारबोटकर यांच्यातील टोळीयुद्धाचे हे सूडनाट्य होते का आणि कारबोटकरचा काटा काढण्यासाठीच उठावाचे नाट्य रचले गेले का या अंगानेही तपास होण्याची आवश्यकता आहे. काही असो, तुरुंगात जे घडले त्याची जी माहिती आतापर्यंत समोर आली आहे, त्यानुसार काही गोष्टींबाबत संशय घेण्यास बराच वाव आहे. पहिली गोष्ट म्हणजे कारबोटकर याचा मारहाणीत मृत्यू झाला की त्याची तुरुंगातच हत्या घडवण्यासाठी हा सारा डाव रचला गेला हे स्पष्ट होत नाही. त्याच्या विरोधी टोळीतील किंवा त्याच्याशी वैमनस्य असलेल्या कैद्यांना जवळच्या कोठडीत का ठेवले होते याचेही उत्तर तुरुंग प्रशासनाने द्यावे लागेल. या कैद्यांनी जो धुडगूस घातला तो पाहिल्यास सडा उपकारागृहाची सुरक्षा व्यवस्था किती ढिसाळ होती हे दिसते. ज्या सहजपणे हे कैदी कोठडीतून बाहेर आले ते पाहिले तर तेथील सुरक्षा रक्षकांची बेफिकिरीच अधिक दिसते. कारबोटकरच्या कोठडीचे दार खुले असताना शेजारील कोठडीतील कैद्यांना बाहेर कसे काय येऊ दिले गेले? तेही त्यांच्यातील वैमनस्य जगजाहीर असताना? या हाणामारीत सुर्‍याचा वापर झाल्याचेही सांगितले जाते. हा सुरा कारागृहात आला कुठून? सडा कारागृहाची इमारत अतिशय निकृष्ट दर्जाची आहे व जुनाट झाली आहे. कोलवाळ येथे नवे सुसज्ज कारागृह सुरू होऊन बराच काळ लोटला आहे. मग सडा येथील कैद्यांना कोलवाळला हलवण्यात एवढी दिरंगाई का झाली? कैद्यांचे हितसंबंध कोणाशी होते? सडा कारागृहातून हलायला ते का राजी नव्हते? असे अनेक प्रश्नही उभे राहतात. गोव्यातील कारागृह सुरक्षा नेहमीच अत्यंत ढिसाळ राहिली आहे. अगदी पूर्वीच्या आग्वाद कारागृहामधूनही कैद्यांचे पलायन ही नेहमीची बाब झाली होती. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाताना ते सहजतेने पळ काढत असत. सडा कारागृहामधूनही कैद्यांनी यापूर्वी पलायन केले आहे. कारावासात हाणामार्‍याही झाल्या आहेत. परंतु तरीही सुरक्षा व्यवस्थेचा ढिसाळपणा कायम होता. कैद्यांचे लागेबांधे त्यांना सर्व सुविधा कारागृहात मिळवून द्यायचे का याचीही चौकशी या निमित्ताने व्हायला हवी. तुरुंगातील पोलिसांची भूमिकाही या सगळ्या प्रकरणात अत्यंत संशयास्पद वाटते. ज्या सहजतेने तुरुंग फोडून कैदी आतील प्रांगणात आले आणि त्यांनी गाड्यांची तोडफोड चालवली, वीजपुरवठा तोडून सर्वत्र अंधार केला, हे सगळे पाहिले तर सुरक्षा रक्षकांच्या कुवतीबाबतच प्रश्न निर्माण होतात. केवळ कैद्यांवर खापर फोडून चालणार नाही. या बेफिकिरी आणि ढिलाईची शिक्षा त्यांनाही व्हायला हवी. केवळ कैद्यांनी केलेला उठाव या अंगानेच या प्रकरणाची चौकशी होता उपयोगी नाही. विनायक कारबोटकरचा मृत्यू कसा झाला, त्यासाठी एखादा कट त्याच्या विरोधी टोळीकडून रचला गेला नव्हता ना, याचीही तपासणी चौकशीत होणे आवश्यक आहे. या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु तुरुंग सुरक्षा ही काही हसण्यावारी नेण्याजोगी बाब नाही. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेविषयीचा धाक नाहीसा होत असतो. ते होऊ द्यायचे नसेल तर कारागृहे अधिक सुरक्षित होणे आत्यंतिक गरजेचे आहे