ईडीकडून चौघांची 7 तास कसून चौकशी

0
12

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरण : गोवा विधानसभा निवडणुकीतील सहभाग, प्रचार आणि खर्चाबाबत नेत्यांना विचारणा

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी पाटो-पणजी येथील कार्यालयात सक्तवसुली संचालनालया (ईडी)च्या अधिकाऱ्यांनी काल आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर, आपचे नेते रामराव वाघ, गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक आणि दत्तप्रसाद नाईक यांची सहा ते सात कसून चौकशी केली. मात्र ईडीकडून झालेल्या चौकशीबाबत नेमकी माहिती देणे या चारही नेत्यांनी टाळले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण उत्तरे दिली, असे चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना चौघांही नेत्यांनी काल सांगितले. या नेत्यांना निवडणुकीतील सहभाग, प्रचार आणि खर्चाबाबत विचारणा झाली.

ईडीने बुधवारी आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर, रामराव वाघ, भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, दत्तप्रसाद नाईक यांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. आपने गोवा विधानसभा निवडणुकीत जो पैसा खर्च केला होता, त्या खर्चाच्या विषयावरून ईडीने तपास सुरू केला आहे. मद्य धोरणासाठी दक्षिण गटाकडून (साऊथ ग्रुप) लाचेच्या स्वरूपात मिळालेला पैसा हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून गोव्यातील निवडणुकीसाठी पाठवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. या घोटाळ्यातून मिळालेल्या रकमेपैकी सुमारे 45 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा वापर 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत आपने केल्याचा दावा ईडीने केला आहे. त्याच अनुषंगाने काल ईडीकडून या चौघांची चौकशी करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची सतावणूक केली जात आहे. या सतावणुकीने आता मर्यादा ओलांडली आहे. राज्यातील लोकांनी काय चालले आहे ते पाहावे आणि विचारपूर्वक मतदान करून सत्ताधारी पक्षाला त्यांची जागा दाखवून द्यावी, असे अमित पालेकर यांनी चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सुडाचे राजकारण सुरू; अमित पालेकरांचा आरोप
आपण ईडीला चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करीत आहे. तथापि, आम आदमी पक्षाला लोकसभा निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी सुडाचे राजकारण सुरू झाले आहे. हे सूड नाट्य संपलेले नाही. मला वाटते हा नाटकाचा पहिला अंक असावा, असे आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी ईडीच्या चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सर्व प्रश्नांना उत्तरे : नाईक
गोवा विधानसभेच्या वर्ष 2022 च्या निवडणुकीतील सहभाग, तसेच आम आदमी पक्षाशी असलेल्या संबंधांबाबत विचारणा करण्यात आली. आपण आपच्या उमेदवारीवरून निवडणूक लढविल्याची माहिती ईडीला दिली. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांनी मागितलेली कागदपत्रे देखील सादर केली, असे दत्तप्रसाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

खर्चाबाबत विचारणा : वाघ
ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपच्या निवडणूक प्रचार आणि खर्चाच्या तपशिलाबाबत विचारणा केली. त्यांना निवडणूक खर्चाची माहिती सादर करण्यात आली, असे रामराव वाघ यांनी सांगितले.

व्हेन्झी व्हिएगस काय म्हणाले?
ईडीकडून चौकशीसाठी आपणाला सुध्दा समन्स बजावला जाऊ शकतो, असे आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.