दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर डागलेल्या हजारो क्षेपणास्त्रानंतर युद्धाचा भडका उडाला. त्यानंतर इस्रायलनेही हमासच्या अड्ड्यांवर आणि गाझा पट्टीतल्या अनेक ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली. हमास आणि इस्रायलयमध्ये गेल्या चार दिवसांपासून युद्ध सुरू असून, या युद्धात आतापर्यंत 1,800 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. इस्रायलमधील जवळपास 1000 नागरिकांचा, तर गाझा पट्टीतील 830 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच इस्रायलमधील 4000, तर गाझा पट्टीतील 4250 नागरिक जखमी झाले आहेत. इस्रायलच्या प्रतिहल्ल्यानंतर हमासची पिछेहाट झाली आहे. गाझा पट्टीचा बराचसा भाग इस्रायली सैन्याने आता आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यातच हमासने 150 ओलिसांना ठार करण्याची धमकी दिली आहे.
एकीकडे हमासने इस्रायलला ओलीस ठेवलेल्या नागरिकांनाना ठार मारू अशी धमकी दिली आहे. हमासचा प्रवक्ता अबू उबैदा याने इस्रायलला धमकी दिली आहे, त्यात गाझा पट्टीतल्या नागरिकांवर इस्रायलने हल्ला केल्यास कोणत्याही क्षणी आम्ही ओलिसांना ठार करू, असे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एक मोठे वक्तव्य करून हमासला उत्तर दिले आहे. हे युद्ध आम्ही सुरू केले नसले, तरी या युद्धाचा शेवट आम्हीच करू, असा इशारा नेतान्याहू यांनी दिला आहे.