आसिफ, वहाब, आमिरचा समावेश

0
114

>> पाकिस्तान संघात ऐनवेळी तीन बदल

इंग्लंडकडून एकदिवसीय मालिकेत सपाटून मार खावा लागल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पाकिस्तानने विश्‍वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या यापूर्वीच्या संघात तीन मोठे बदल केले आहेत. अनुभवी वहाब रियाझ व मोहम्मद आमिर या दुकलीसह नवोदित स्फोटक फलंदाज आसिफ अली याला १५ सदस्यीय संघात स्थान देताना डावखुरा जलदगती गोलंदाज जुनेद खान, अष्टपैलू फहीम अश्रफ व फलंदाज आबिद अली यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

निवड समितीचे प्रमुख इंझमाम उल हक यांनी सोमवारी विशेष बैठक घेताना संघातील बदलांची माहिती दिली. आसिफ व आमिर यांची निवड निश्‍चित मानली जात होती. परंतु, वहाबची निवड धक्कादायक ठरली. ४ जून २०१७ रोजी वहाब आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. या सामन्यात भारताकडून पाकला सपाटून मार खावा लागला होता. यानंतर वहाबने २७ ‘अ’ दर्जाचे सामने खेळले असून यात २८.४०च्या सरासरीने २७ बळी घेतले आहेत. शाहिन आफ्रिदी व मोहम्मद हसनैन यांच्या रुपात दोन अल्प अनुभव असलेले गोलंदाज संघात असल्याने ‘रिव्हर्स स्विंग’च्या अपेक्षेने व अनुभव नजरेसमोर ठेवून वहाबची निवड केल्याचे मानले जाते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर १४ एकदिवसीय लढतीत १४८.५०च्या सरासरीने केवळ दोन गडी बाद करूनही आमिरवरील विश्‍वास कायम ठेवण्यात आला आहे.
पाकिस्तान संघ ः सर्फराज अहमद, फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम, हारिस सोहेल, आसिफ अली, शोएब मलिक, मोहम्मद हफीझ, इमाद वासिम, शादाब खान, हसन अली, शाहिन आफ्रिदी, मोहम्मद आमिर, वहाब रियाझ व मोहम्मद हसनैन.