आसामात भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन

0
178

>> फेरमतदान घेण्याची निवडणूक आयोगाची घोषणा

आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात गुरूवारी एक ईव्हीएम मशीन भाजप उमेदवाराच्या गाडीमध्ये सापडले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आसामातील करीमगंज येथे हिंसा उसळली होती. याबाबत आता निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत त्या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची घोषणा केली आहे.

ज्या कारमधून पोलिंग टीमचे सदस्य ईव्हीएम घेऊन स्ट्रॉंग रुमपर्यंत गेले होते ती कार पथरकंडी येथील भाजपचे उमेदवार कृष्णेंदु पॉल यांची होती. भाजपने मशिनशी छेडछाड केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

आसाममध्ये गुरुवारी विधानसभेच्या ३९ जागांसाठी दुसर्‍या टप्प्यासाठी ७७ टक्के मतदान झाले. मतदानानंतर रातबारीमध्ये नियुक्त निवडणूक आयोगाच्या निवडणूक गटाची गाडी रस्त्यात बंद पडली. त्यामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना गाडीसाठी विभागीय कार्यालयात, फोन केल्यानंतर त्यांना दुसर्‍या गाडीची व्यवस्था करण्यात आली. मात्र या गटानेे सरकारी गाडीची वाट न पाहता एका खासगी गाडीची लिफ्ट घेतली. पण ही गाडी भाजप उमेदवार कृष्णेंदु पॉल यांची होती.
दरम्यान, ही गाडी स्ट्रॉंग रुमच्या परिसरात पोहोचताच विरोधकांनी गाडी ओळखून तिच्यावर हल्ला केला. यानंतर चालक आणि निवडणूक कायकर्त्यांनी पळ काढला. यावेळी जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने जमावावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर या घटनेतसहभागी असलेल्या निवडणूक कार्यकत्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान करण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.