आशिया चषक क्रिकेट नियोजित वेळेतच

0
153

>> पाकचे सीईओ खान यांना विश्वास; श्रीलंका वा यूएईही पर्याय

आयपीएलसाठी आशिया चषकाचा बळी जाणार असल्याची चर्चा क्रिकेट जगतात सध्या चालू आहे. परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसिम खान यांनी आयपीएलसाठी आशिया चषकाचा बळी देणार नसल्याचे स्पष्ट करतानाच कुठल्याही परिस्थितीत ही स्पर्धा नियोजित वेळेतच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

कोरोना महामारीमुळे मोठ्या क्रिकेट स्पर्धा सध्या स्थगित आहेत. या महामारीवर नियंत्रण मिळविल्यानंतर हळुहळू या स्पर्धांना वा मालिकांना प्रारंभ होणार आहे. ऑस्ट्रेलियातील नियोजित टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार कि नाही याबाबत अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यासंदर्भातील निर्णय येत्या जुलै महिन्यात होणार आहे. जर ही टी-२० विश्वचषकाचे आयोजन या वर्षी न करण्याचा निर्णय झाला तर त्याजागी आयपीएल स्पर्धेच्या आयोजनावर बीसीसीआय विचार करीत आहे. परंतु यजमान पाकिस्तानने कोणत्याही परिस्थितीत आशिया चषकाचे आयोजन होणारच असा पवित्रा घेतला असल्याने आयपीएलची आयोजनासमोर मोठा अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला यंदाच्या आयपीएलचे पर्व रद्द करावे लागणार हे निश्‍चित आहे.

आशिया चषकाविषयी बोलताना यजमान सीईओ खान यांनी पाकिस्तानात सध्या कोरोना महामारीच्या संसर्गाच्या रुग्णांतमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने ही स्पर्धा श्रीलंका किंवा युएई या त्रयस्थ ठिकाणी आयोजित करण्यावरही विचार चालू असल्याचे स्पष्ट केले.

पाकिस्तानी संघ २ सप्टेंबर रोजी इंग्लंड दौर्‍यावरून परतणार आहे. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आशिया चषकाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे खान यांनी स्पष्ट केले. काही गोष्टी येत्या काळात स्पष्ट होणार आहेत. श्रीलंकेत कोरोना महामारीचा प्रभाव जास्त नसल्याने तेथे आशिया चषकाचे आयोजन करण्याबाबत आम्ही आशावादी आहोत. त्यासंदर्भात त्यांच्या बोर्डाशी चर्चा चालू आहे. त्यांच्याकडून नकार मिळाल्यास युएईत ही स्पर्धा आयोजित करू शकतो. युएईने या स्पर्धेच्या आयोजनासाठी सकारात्मक आहे, असे खान म्हणाले.

भारतीय क्रिकेट संबंधाबाबत बोलताना खान यांनी विद्यमान स्थितीत भविष्यात भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका होण्याची कोणत्यीही संभावना नाही आहे. त्यासाठी तेथील सरकारकडून परवानगी मिळायला पाहिजे आणि ही शक्यता धूसरच आहे. विद्यमान स्थितीत दोन्ही बाजूंनी
एकमेकांविरूद्ध खेळण्याचा विचार करणे वास्तववादी नसल्याचे खान म्हणाले.
पुढील दोन ते तीन वर्षांसाठी आमच्या आर्थिक बाबींसंदर्भात आम्ही नियोजन करीत आहोत. केवळ आम्ही आमच्या आयसीसीच्या शेअर्सवर अवलंबून राहू नये यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे खान म्हणाले.
कोरोना महामारीमुळे आम्ही आमचा खर्च सुमारे एक अब्ज रुपयांनी कमी केला आहे. त्यानुसार वार्षिक अंदाजपत्रकातही बदल करण्यात आल्याचे खान यांनी स्पष्ट केले.