आशिया चषकासाठी भारत पात्र

0
114

>> मकाऊवर ४-१ असा विजय

एएफसी आशिया चषक पात्रता स्पर्धेतील काल बुधवारी श्री कांतिरवा स्टेडियमवर मुसळधार पावसात झालेल्या सामन्यात भारताने मकाऊचा ४-१ असा पराभव करत ‘आशिया चषक २०१९’ स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. ‘अ’ गटात भारताने आपले चारही सामने जिंकत दिमाखात मुख्य स्पर्धेसाठी स्थान मिळविले.

भारताने या सामन्यात विजय मिळविण्याच्या उद्देशानेच खेळ केला. दुसर्‍याच मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. आठव्या मिनिटाला भारताला पहिली गोलसंधी मिळाली. परंतु, जाकिचंद सिंग याचा कमकुवत फटका मकाऊच्या गोलरक्षकाने अडविला. पहिल्या कॉर्नरसाठी मकाऊला १५व्या मिनिटापर्यंत वाट पहावी लागली. भारताप्रमाणेच त्यांनीदेखील ही संधी व्यर्थ घालवली. भारताचा आक्रमक खेळ रोखण्यासाठी मकाऊच्या खेळाडूंनी धसमुसळा खेळ केला. आघाडीपटू सुनील छेत्रीला धोकादायकरित्या रोखण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विसाव्या मिनिटाला मकाऊच्या लाओ किन याला रेफ्रींनी पिवळे कार्ड दाखविले. २८व्या मिनिटाला रॉवलिन बोर्जिसने भारताचा पहिला गोल नोंदविला. यंदाच्या पात्रता फेरीत पहिल्या सत्रात भारताने नोंदविलेला हा पहिलाच गोल होता. यापूर्वीच्या तिन्ही सामन्यात भारताने दुसर्‍या सत्रात गोल नोंदविले होते. ३७व्या मिनिटाला निकोलस तार्राव याने मकाऊला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत उभय संघ १-१ असे बरोबरीत होते. ६०व्या मिनिटाला बदली खेळाडू बलवंत सिंगने रचलेल्या चालीवर सुनील छेत्रीने गोल नोंदवत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ७०व्या मिनिटाला मकाऊने स्वयंगोल करत भारताची आघाडी फुगवली. अतिरिक्त वेळेत जेजे लालपेखलुआ याने भारताचा चौथा गोल केला.