आला रंगगंधाचा श्रावण न्यारा

0
149
  • पौर्णिमा केरकर

महामारीचे सावट गडद होताना कोमेजल्या मनांना श्रावणसांज हवी आहे. भक्तिरसात डुंबून परमतत्वाच्या लावण्यात हरवून जीवनचैतन्याचा ठेवा जपायचा आहे. मेंदीभरल्या हातांनी श्रावणाला हुंगायचे आहे आणि जमलंच तर रंग गंध श्रावणाचे ओंजळीत भरून सुक्या सड्यावर पेरायचे आहेत.

निळ्या नभाचा फुलला पिसारा
आला रंगगंधाचा श्रावण न्यारा
भक्ती प्रीत उमलली अभंगामधुनी
मोरपंखी स्वप्नांना घेऊन आला वारा.
आला रंगगंधाचा श्रावण न्यारा

भुरभुरणारा.. झिरझिरणारा.. शिरशिरणारा.. हुळहुळणारा.. ऊन सावल्या सोबतीने आपालिपाचा खेळ खेळणारा श्रावण आला की सारा सभोवतालच त्याच्या स्वागतासाठी जणू सज्ज होतो. अगदी दृष्ट लागण्यासारखे धरित्रीचे लावण्य खुलून येते. नसानसांत तो भिनत जातो आणि आठवत जातात बालपणीची, त्याच्याही पूर्वीची त्याची असंख्य रूपे! श्रावण मासातील प्रत्येक संध्याकाळ ही जाई, जुई, मोगरा, सोनचाफ्याच्या गंधभाराने भारावून गेलेली असायची. ही संध्याकाळ तर दूर देवळात वाजणार्‍या नौबतीची असायचीच, त्याच्या सोबतीने ध्वनिक्षेपकावर लावलेले अभंग थकल्या भागल्या जीवाला श्रांत करायचे. तिन्हीसांजेलाच शेतावर गेलेले आईवडील घरी परतलेले असायचे. पडवीतल्या झोपाळ्यावर बसून झोके घेत घेत आपल्या लहान भावंडांना गाणी गात जोजविणार्‍या त्यांच्या मोठ्या भावंडांचा. आईवडिलांच्या चाहुलीने जीव भांड्यात पडायचा. हातपाय धुऊन मंदिरातील भजनात सामील होण्यासाठी त्यांच्या जीवाची घालमेल होत असायची. काहीही करून भजन संपल्यावर वाटली जाणारी गोड तिखट वाटाण्याची उसळ त्या बालवयाला चुकवावीशी वाटत नसे. पेंगत पेंगत का असेना भैरवीपर्यंत जड झालेल्या डोळ्यांना ओढून ताणून जागं ठेवण्यासाठी जीवाचा कोण आटापिटा चालायचा.. हे त्या त्या वयालाच माहिती असणार. श्रावणाला स्वतःचा एक चेहरा होता. तो आलाय, तो येतोय याची चाहूल मनाला.. सभोवतालाला न्याहाळताना जाणवायची.

अंगणाच्या कडेकुशीने आणि भितोडीला रिकाम्या असलेल्या जागेत आईने घातलेली दोडकी, चिटकी, भेंडी, अंगणातील पडवळ, काकडीचा मांडव याच महिन्यात तरारून यायचा. काकडीच्या छोट्या छोट्या टिपर्‍या हळूच खाताना त्याची वाढत जाणारी चव श्रावणाविषयीची ओढ अधिकच वृद्धिंगत करायची. श्रावण भजन-आरत्यांचा कीर्तनांचा महिना. त्याला भक्ती, अध्यात्म, तत्त्वज्ञानाचा स्पर्श झालेला आहे. थकल्या भागल्या जीवाला तर ज्ञानेश्वरी, हरिविजय, भक्तीविजयसारख्या ग्रंथांच्या पारायणांनी शांतता लाभायची. जाणत्या-नेणत्यांच्या कानांवर हे भक्तिपूर्ण शब्द पडले की आपोआपच संस्काराचा प्रवाह वाहता राहायचा. नागपंचमीच्या सणाने या मासाची सुरुवात अगदी मनमोही झुलण्यातून व्हायची. भावा बहिणीच्या अतूट नात्याचे रेशिमबंध उलगडून दाखविणारा हा महिना. नागपंचमीला पुजली जाणारी नागाची मृण्मयी मूर्ती आणण्यासाठी चित्रशाळेत गेल्यावर त्याचवेळी भाद्रपदात येऊ घातलेल्या चतुर्थीची लगबग सुरू व्हायची. नागोबाला आणताना गणपतीची मूर्ती करण्यासाठी चौरंग दिला जायचा. सोबत आवडलेल्या गणपतीचे लग्नपत्रिकेवरील चित्र दिले जायचे. मोरावर, उंदरावर, वाघावर.. स्वार झालेल्या गणपतीचे चित्र त्यात असायचे तर कधी जास्वंद, गुलाबाच्या फुलांवर आरूढ झालेले श्री गजानन महाराज आम्हा मुलांना आवडायचे. तशीच मूर्ती आपण पुजावी ही तीव्र इच्छा मनात रेंगाळत राहायची. चित्र देऊनही मनासारखी मूर्ती काही तयार होत नव्हती. बघूया. पुढच्या वर्षी हवी तशीच मूर्ती करून घेऊया असे मनाला समजावताच सारे काही निवळायचे.

भाद्रपदाची तयारी श्रावण अर्धीअधिक करून ठेवायचाच! गणपतीच्या आवडीची फुलपत्री, फळफळावळ, भाजी, रंगीबेरंगी फुले ही देणगी श्रावणाचीच. आयतार पूजनाची परंपरा ही तर या महिन्याचे सांस्कृतिक लावण्य अधोरेखित करणारी आहे. एकूणच संपूर्ण महिन्यात येणार्‍या चार नाहीतर पाच रविवारी महिला आपल्या पतीच्या आयुष्य.. आरोग्यासाठी व्रत करतात. आयतार आदित्यवार.. सूर्याची उपासना करून सूर्याची तेजस्विता, त्याचे शौर्य आणि त्याचे चिरंजीवी आयुष्य आपल्या पतीला प्राप्त होवो, ही कामना या मालिनी फुलपत्री वाहून सूर्यदेवाकडे करतात. मुठली, पायस, पातोळ्या, सान्न, शिर्वाळ्यो अशातर्‍हेचा गावठी सुरय तांदळाच्या पिठापासून करण्यात येणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवून सकाळी सुरू केलेल्या व्रताची सांगता संध्याकाळी फुलपत्रीरुपी आयताराला तुळशी वृंदावनात विसर्जित करून केली जायची. नवी नवरी तर सुरवातीला दोन रविवार सासरी तर नंतरचे दोन रविवार माहेरी पूजते. गेल्या कित्येक वर्षांची ही परंपरा आहे. मंगळागौर हा असाच माहेरवाशिणीचा सण.. हसत खिदळत, नाचत गात गात रात्र जागविण्याचा हा सण नव्या नवलाईच्या नटण्या मुरडण्याला प्रेरणा देतो. भावाबहिणीच्या नात्याचे अतूट बंधन टिकविणारा हा महिना आहे. संपूर्ण वाड्याची म्हणून एकच गोकुळाष्टमी असायची. केलेला उपवास सोडण्यासाठी मग सार्‍याजणी त्या तिथं जमा व्हायच्या. लहान मुलांचा सावळा गोंधळ .. महिलांची लगबग .. मोठ्यांची शिस्त .. त्यांचा त्यांना दिलेला आदर आणि सर्वांच्या मिळून उठणार्‍या जेवणाच्या पंगती. पुरुष भजन आरत्यांत तर महिला फुगडीत दंगगुंग.. खरंच सारं घरच गोकूळ व्हायचे. ही किमया श्रावणाचीच होती. श्रावण हा विविध रंगांनी विनटलेला महिना जसा आहे तसाच तो गंधांचा ही महिना आहे. कवठीचाफा, सोनचाफा, जाई, जुई, मोगरी, प्राजक्त, रातराणी, गुलाब असे एक ना अनेक गंध घेऊनच हा सणांचा राजा श्रावण भाद्रपदातील गणेशपूजनाची तयारी करण्यासाठी जणू काही सजून धजून तयार होतो. सूर्याची लडिवाळ किरणे ऊनसावलीच्या खेळांत दंग राहतात. श्रावणाला ओल्या मेंदीचा भार पेलता पेलवत नाही. अंगणात एरव्ही ताठ उभी असलेली मेंदी. आता तर तिला आधारासाठी टेकू लावावा लागतो एवढी ती भाराने वाकलेली दिसते. पाण्याने थबथबलेल्या पानापानातून एकेक थेंब ओघळतानाचे तिचे रूप नव्या नवेल्या माहेरवाशिणीसारखेच आरक्त. त्याच्या ओढीने व्याकुळलेले. हा प्रीतीचा भार तिलाही आता सोसवत नाही. नागपंचमी, मंगळागौरीसारख्या सणांची ती आतुरतेने वाट पाहत राहते. मेंदी तळहातावर रेखून थोडा भार हलका होईल या आशेने तर श्रावण संध्याकाळ अधिकच अधीर होत जाते. ही अधीरता तिन्हीसांजेला प्रसन्न टवटवीत करते. फुलाफुलातून सुगंधित हाका ऐकू येत राहतात. घराघराचे होते देऊळ. पावित्र्याचा गंध चोहोबाजूंनी परिमळू लागतो.

टाळचिपळ्यांच्या आवाजात भक्तिचैतन्य कणाकणात दरवळू लागते. श्रावण फुलाफुलातून येतो. नदीकाठची हिरवाई. क्षितिजाची अथांग निळाई सोनपिवळ्या उन्हाचे गाणे सोबतीला घेऊनच श्रावण गिरीदरीतून हुंदडत बागडत येतो. कधी भरून येणारा पाऊस तर कधी उन्हाचे गाणं करणारा पाऊस.. ओले आभाळ घेऊन झाडांच्या फांदीफांदीवर विसावणारा श्रावण… पाऊस होऊन श्रावण सृष्टीला नवजीवन देतो. पक्षी ओळीने तारांवर थेंबांची नक्षी रेखीत बसतात. ते थेंब टपोरे .. इंद्रधनुषीं रंग त्यात श्रावणाचे लावण्य खुलवितात. एरव्ही श्रावण महिना हा एकूणच मराठी महिन्यातील पाचवा महिना. सृष्टीला पाचवा महिना असे सार्थ वर्णन बा. भ. बोरकर यांनी केलेले आहे. पाचव्या महिन्याची गर्भार नार जशी चेहर्‍यावर नवतेज, चैतन्य लेऊन असते तसाच तर श्रावण महिना. सृष्टीला टवटवीतपणा बहाल करणारा. श्रावण फांदीफांदीवर स्वतःची खूण उमटवीत येतो.

गवतावर दवबिंदूंचे सडे पसरतात.. अनवाणी पावलांनी पायवाटेवरून चालताना दूरदूरपर्यंत पसरलेली हिरवी मखमल पावलांना गुदगुल्या करते. भिजवून टाकते तनाला. त्याहीपेक्षा मनाला.. श्रावण धरित्रीच्या परीतृप्तीचे प्रतीक. तोच तिला मोहरायला लावतो. रोमारोमात भिनतो .. पुलकित करतो. हे असे अलीकडे श्रावणाला नसानसांत भिनवून घेणं होत नाही. त्याच्यात गुंतणं.. गुंफून घेणंही जमत नाही. तो कधी येतो .. कधी जातो काहीच कळत नाही. काही दशकांपूर्वी तो गावागावांतील मंदिराच्या परिसरात डोकावून अनुभवले की लक्षात यायचा.. आता मंदिरापेक्षा ही मनाची कवाडे बंद आहेत. डोळ्यांवरील पट्टी अधिकच गडद होत जाते. सतेज हिरवा श्रावण काळी किनार घेऊन अवतीर्ण होतो.. खरं तर श्रावण तसाच आहे. बालकवींच्या कवितेतून भेटलेला.. सरसर शिरव्याचा.. चोहीकडे दाटलेल्या हिरवळीचा.

श्रावणात बरसणार्‍या घननीळ रेशीमधारांचा हासरा.. नाचरा ..जरासा लाजरा –! पण माणूस बदलला आहे. त्याची दृष्टी त्याला रोमारोमात भिनवून घेण्याची त्याची क्षमता सारेच कुठंतरी तणावाच्या ओझ्याखाली दबून गेलंय. पायवाटेवरच्या दवबिंदूंचे स्पर्श चिखल पाण्याने माखलेले वाटतात .. म्हणून वाटेवर पेव्हर्स बसवून श्रावणाला आधुनिक केले जात आहे. अंगणाचा मातीचा स्पर्श, मोगरा जाइजुर्ईच्या बहराने सुगंधित माती आताशा हरवली आहे. अंगणात अगदी समोर पसरलेल्या प्राजक्त सड्यावर अधिकार असलेल्या श्रावणाला तर तिथं आता जागाच उरली नाही.
ओंजळीत प्राजक्त फुलांनी आरक्त होत ओसंडून वाहायचा श्रावण! दोडक्या चिटक्यांनी. तवशी भेंडीच्या सहवासाने घराला तृप्ती द्यायचा श्रावण! रातराणीच्या मनमोही सुगंधाने बेहोष करायचा श्रावण! भक्तीग्रंथाच्या पारायणांनी पावित्र्य, मांगल्याने भारून टाकायचा घरातील कोपरान्‌कोपरा श्रावण! व्रतवैकल्यांनी शरीरमनाला सळसळता उत्साह पुरवायचा श्रावण! झुल्यावर उंच उंच झुलवायचा श्रावण! आट्यावरील गीतांनी आपल्या माणसांसाठी व्याकूळ करायचा श्रावण! किती त्याला आठवायचे? हृदयकुपीत साठवायचे? महामारीचे सावट गडद होताना कोमेजल्या मनांना श्रावणसांज हवी आहे. भक्तिरसात डुंबून परमतत्वाच्या लावण्यात हरवून जीवनचैतन्याचा ठेवा जपायचा आहे. मेंदीभरल्या हातांनी श्रावणाला हुंगायचे आहे आणि जमलंच तर रंग गंध श्रावणाचे ओंजळीत भरून सुक्या सड्यावर पेरायचे आहेत. अनवाणी पावलांनी पायवाटांना स्पर्शून वारा कवेत घ्यायचा आहे. श्रावणाला मनभर पसरायचा आहे. श्रावण भरभरून जगायचा आहे.
लाल पिवळा
हिरवा निळा
श्रावणाचा नाद खुळा
घालू गळा
सखींनो चला
झिम्मा फुगडी खेळा
अंगण अंगण
रेखू रिंगण
गोल गोल फिरत राहू
वादळवारे झेलत राहू
ओल्या मेंदीची
रितीचं ओंजळ
श्रावणाने भरून घेऊ
रंग गंध श्रावणाचे
करपल्या मनांवर सुकल्या गालांवर
थोडे थोडे पेरीत जाऊ
थोडे थोडे पेरीत जाऊ