आला आला ग कान्हा.. आ ऽ ऽ ला

0
161
  • डॉ. गीता काळे
    पर्वरी

बालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात विविध रूपात हा श्रीकृष्ण वसलेला आहे. म्हणूनच त्याचा जन्मोत्सव जन्माष्टमी, गोकुळाष्टमी संपूर्ण भारतात भक्तिभावाने, श्रद्धेने साजरी केली जाते. मंदिरातून भजन, कीर्तन करीत रात्री बारा वाजता बाळकृष्णाला पाळण्यात ठेवून जन्मोत्सव केला जातो.

आपला भारत देश हा उत्सवप्रिय देश आहे. विविध धार्मिक उत्सव, सण, थोर विभूतींचे स्मृतिदिन, राष्ट्रीय दिन हे सातत्याने साजरे होत असतात. हे सण- उत्सव त्या त्या प्रदेशात संपन्न होतात. परंतु रामनवमी आणि कृष्णजन्माष्टमी ही सर्व भारतभर साजरी होते. श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी श्रीराम व श्रीकृष्ण हे अवतार जगद्वंद्य झाले. दोन्ही अवतारपुरुषांचे कार्य धर्मसंस्थापनेचेच होते. पण दोघांचं व्यक्तिमत्त्व भिन्न होतं. मातापित्यांचे आज्ञापालन, बंधुप्रेम, पत्नीशी एकनिष्ठता, गुरुजनांविषयी आदर, प्रजेच्या सुखासाठी त्यागवृत्ती या विविध गुणवैशिष्ट्यांचा आदर्श म्हणजेच मर्यादापुरुषोत्तम श्रीराम.

जनमनाला मोहीत करणारं कृष्णरूप

श्रीकृष्णाच्या ठायी अलौकिक बुद्धिमत्ता, शरीरसामर्थ्य, चपलता, प्रसंगावधान, धैर्य, कुशलता, संवादचातुर्य, मुत्सद्दीपणा, मित्रप्रेम असे अनेकविध गुण एकत्रित झालेले दिसतात. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री १२ वाजता या अवतारपुरुषाने जन्म घेतला. जन्मतःच आईवडिलांपासून दूर नंदयशोदेच्या प्रेमळ छत्राखाली हा कान्हा वाढू लागला. कंसमामाच्या तडाख्यांचा प्रतिकार करत, बालगोपाळांबरोबर क्रीडा करत, गवळणींना आपल्या बाललीलांनी हसवत रंजवत वाढला. श्रीकृष्णाचं लाडिक, नटखट रूप आजही जनमनाला मोहीत करतं. म्हणून माता आपल्या बाळाला कृष्णाच्या रूपात पाहून खूश होतात तर युवक-युवतींना कृष्णाच्या राधेसह गोपिकांसमवेतच्या रासलीला भुरळ पाडतात. कृष्णाचं व राधेचं पारलौकिक प्रेम अद्भुत आहे. विष्णुपुराण, भागवत, ब्रह्मवैवर्तपुराण, हरिवंश या ग्रंथातून कृष्णचरित्रात राधाकृष्णाच्या प्रेमाचे वर्णन आलंय. पण खरं तर ही राधेची उच्च पातळीवरील भक्ती आहे. ती कृष्णाशी इतकी एकरूप झाली होती की स्वतःला कृष्णाशिवाय वेगळी मानतच नव्हती. राधेच्या निस्सीम भक्तीमुळे ती कृष्णाशी अद्वैत पावली होती. राधेच्या दिव्य आध्यात्मिक प्रेमाचा आदर्श जगासमोर ठेवला आहे. म्हणून आज मंदिरातून मूर्ती दिसते ती राधाकृष्णाची!

श्रीमद्भगवद्गीता म्हणजेच श्रीकृष्ण

‘मामेकं शरणं व्रज’- ही भक्तीची भावना ज्यांच्यामध्ये जागृत होती त्या द्रौपदीला वस्त्रहरणाच्या प्रसंगी तिच्या साहाय्याला धावून जाणारा, सुदाम्याचे पोहे खाऊन मित्रप्रेमाचा आदर्श निर्माण करणारा हा श्रीकृष्ण सत्याचा पूजक आहे. सत्याच्या, धर्माच्या बाजूने पांडवांच्या बरोबर राहून महाभारत युद्धात धनुर्धर वीरश्रेष्ठ अर्जुनाचं सारथ्य स्वीकारतो. किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला मानवी जीवनाचे रहस्य सांगतो. श्रीकृष्णाने केलेला हा उपदेश केवळ अर्जुनासाठी नव्हता तर तो अखिल मानवजातीसाठी होता. आजही श्रीकृष्णाने गायिलेली श्रीमद्भगवद्गीता एक आदर्श ग्रंथ म्हणून सर्वमान्य आहे. मानवी जीवनाचे अंतिम सत्य, ज्ञान, सांख्य, कर्म, भक्ती मार्गांचे विश्लेषण या विविध जीवनसारावर प्रकाश टाकणारी ही गीता तत्त्वज्ञानी, संत, महंत यांना प्रबोधित करते. श्रीमद्भगवद्गीता म्हणजेच श्रीकृष्ण होय. भगवद्गीता समजली तर श्रीकृष्ण समजणार; असंच त्याचं व्यक्तिमत्त्व गूढ आहे.
बालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात विविध रूपात हा श्रीकृष्ण वसलेला आहे. म्हणूनच त्याचा जन्मोत्सव जन्माष्टमी, गोकुळाष्टमी संपूर्ण भारतात भक्तिभावाने, श्रद्धेने साजरी केली जाते. मंदिरातून भजन, कीर्तन करीत रात्री बारा वाजता बाळकृष्णाला पाळण्यात ठेवून जन्मोत्सव केला जातो. काही ठिकाणी रासक्रीडांचं आयोजन होतं. काही संस्थांमध्ये वाद्यांच्या गजरात श्रीकृष्णाचा जयघोष करत भक्तजन नाचतात. सर्व भक्तगण भक्तिरसात ओथंबून गेलेले असतात.

मनुष्यधर्म हाच श्रेष्ठ धर्म

महाराष्ट्रात जन्मोत्सवाबरोबर दुसर्‍या दिवशी दहीहंडीचा उत्सवपण करतात. पूर्वी कमी प्रमाणात होता पण या दोन दशकात हा उत्सव अति उत्साहाने संपन्न होत आहे. श्रीकृष्ण बालवयात सवंगड्यांबरोबर खेळायला जात असे. त्याचे सवंगडी म्हणजे गोपाळ गाईगुरांना चरायला रानात घेऊन जात. तिथेच ते दिवसभर खेळत. दुपारच्या वेळी या मुलांनी बरोबर आणलेले भोजन म्हणजे भाकरी, दही, चटणी. हे सर्व एकत्र करून त्याचा काला करून सर्वजण मिळून खात. श्रीमंती, गरिबी, जात, पंथ ही सर्व बंधनं दूर करून मनुष्यधर्माचं पालन करण्याचाच संदेश श्रीकृष्णाने दिला आहे. हा दहीहंडी उत्सव त्यातून सुरू झाला. पण आजकाल या उत्सवाला थोडं विकृत स्वरूप प्राप्त झालंय असं वाटतं. नाच, गाणी, स्पर्धात्मकता दिसून येते. ही दहीहंडी जिवावरसुद्धा बेततेय. हा आनंदोत्सव आनंदीच व्हावा. तरुणवर्गानं दहीहंडीचं मूळ उद्दिष्ट लक्षात घेऊन समाजप्रबोधनाला जर महत्त्व दिलं तर गोकुळाष्टमी खर्‍या अर्थाने साजरी झाल्याचा आनंद श्रीकृष्णालाही होईल. कारण भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे –
यः शास्त्रविधिमृत्सृज्य वर्तते कामकारतः |
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ |
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥
….