आराखड्यावरून जीत-विश्वजीत आखाड्यात

0
12

>> आराखडा मागे घ्या; अन्यथा आंदोलन : जीत आरोलकर

>> आरोलकर स्वार्थी; कारनामे उघड करणार : विश्वजीत राणे

पेडणे तालुका विभागीय आराखड्याच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे आणि मगोचे आमदार जीत आरोलकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. आरोलकर यांनी काल सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेत सदर आराखडा रद्द करण्याची मागणी केली; अन्यथा रास्ता रोको केला जाईल, असा इशारा दिला. यानंतर सायंकाळी मंत्री विश्वजीत राणे यांनी आमदार प्रवीण आर्लेकर व इतर संबंधितांबरोबर बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राणे यांनी आरोलकर यांच्यावर काही आरोप करत त्यांचे कारनामे विधानसभेत उघड करण्याचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर आरोलकर यांनी अशा धमक्यांना घाबरत नसल्याची प्रतिक्रिया दिली. सरकारमधील एक मंत्री आणि सत्तेतील सहभागी मगोच्या आमदारामध्ये वाद रंगल्याने त्याची चर्चा राज्यभर रंगली आहे.

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, पेडण्याचे नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंच सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य यांच्याशी पेडणे विभागीय आराखड्याच्या प्रश्नावर चर्चा केली आहे. पेडणे विभागीय आराखड्याच्या कच्च्या मसुद्याबाबत येत्या 15 ते 20 दिवसांत सूचना, आक्षेप सादर करण्यात आल्यानंतर तज्ज्ञ समितीसमोर ठेवून आवश्यक दुरुस्ती करून आराखड्यात सुधारणा केली जाणार आहे. त्यानंतर आराखड्याचे पंचायतनिहाय सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. हा आराखडा तयार करण्याचे काम पारदर्शक आहे. आगामी 20 वर्षांचा विचार करून नियोजन केले जात आहे, असे विश्वजीत राणे यांनी आल्तिनो पणजी येथील वनभवनामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, या बैठकीला जीत आरोलकर उपस्थित नव्हते.

नगरनियोजन खात्याने विभागीय आराखडे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पहिला विभागीय आराखडा पेडणे तालुक्याचा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची निवड करण्यात आली आहे. लोकांच्या सहभागातून या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.

आरोलकरांचे कारनामे उघड करणार : राणे
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पेडण्यातील 1 लाख चौरस मीटर जमिनीचे रूपांतर करण्यासाठी ते माझ्या घरी आले होते. मात्र आपण जमीन रूपांतर करण्यास स्पष्ट नकार दिला. आरोलकर स्वार्थासाठी काम करीत असून, त्यांनी शेतजमिनीमध्ये फार्म हाऊस बांधले आहे. नगरनियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या फार्म हाउसवर कारवाई करण्याचे निर्देश दिला आहे. एसआयटीकडे असलेल्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आपले नाव नाही. मात्र आमदार आरोलकर यांचे कारनामे आपण विधानसभेत उघडकीस आणणार आहे, असा इशारा मंत्री विश्वजीत राणे यांनी दिला. याशिवाय 200 मतांनी जिंकून येणाऱ्यांनी आपणास सल्ले देऊ नये, असेही राणे म्हणाले. दरम्यान, जमीन घोटाळ्यात काही महिन्यांपूर्वी जीत आरोलकर यांचे नाव समोर आले होते, त्याचा अप्रत्यक्ष उल्लेख राणे यांनी केला.

धमक्यांना घाबरत नाही : आरोलकर
पेडण्यातील नागरिक विभागीय आराखड्याचा विषय घेऊन आपल्याकडे आल्याने त्याला पाठिंबा दिला. माझ्याविरोधात फाईल्स उघड करण्याच्या धमक्यांना आपण घाबरत नाही, असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले. आपण पेडणे तालुक्यातील जनतेसोबत राहणार आहे. वेळप्रसंगी माझ्यावर कसलीही आणि कोणतीही कारवाई केली तरी मला पर्वा नाही. माझे फार्म हाऊस मोडून टाकले तरी चालेल; परंतु सर्वसामान्य जनतेच्या घरावर बुलडोजर चालवण्याचा प्रयत्न झाला, तर आपण गप्प राहणार नाही, असा इशारा आरोलकर यांनी दिला.

मसुदा मागे घ्या; अन्यथा रास्ता रोको

>> आरोलकरांची मागणी; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

पेडणे तालुक्याचा विभागीय आराखडा तयार करून त्याचा मसुदा जारी करण्यात आला आहे. सोमवारपर्यंत हा मसुदा मागे न घेतल्यास संपूर्ण तालुक्यात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले जाईल, असा इशारा मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिला.

आमदार आरोलकर यांनी स्थानिक पंचायतींच्या सरपंचांसह पणजी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन हा आराखडा रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पेडण्याचा विभागीय आराखडा करताना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पंचायतींना विश्वासात घेणे आवश्यक होते. मात्र, याबाबत तसे झालेले नाही. आम्हालाही विकास हवा आहे. मात्र, तो करताना स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवे, असे आरोलकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सोमवारपर्यंत थांबण्यास सांगितले आहे. नगरनियोजनमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मागणीची पूर्तता न झाल्यास मंगळवारनंतर आम्ही ‘पेडणे बचाव अभियान’ सुरू करणार आहोत. प्रत्येक गावात जाऊन याबाबत जागृती करणार आहोत. तसेच, ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले जाणार आहे, असा इशारा आरोलकर यांनी यावेळी दिला.

चर्चेअंती निर्णय घेणार : मुख्यमंत्री
पेडणे विभागीय आराखड्याबाबत नगरनियोजनमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. या आराखड्याचा मसुदा जाहीर झाला आहे. त्याबाबत सूचना, आक्षेप नोंदवता येतात. हा मसुदा पेडणे तालुक्यातील पंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यास नगरनियोजनमंत्र्यांना सांगितले आहे. त्या खात्यातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.