आराखडा रद्दसाठी 5 दिवसांची मुदत

0
31

>> 17 ऑक्टोबरपर्यंत पेडण्याचा आराखडा रद्द न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा; विर्नोड्यातील सभेत इशारा

पेडणे तालुक्यातील जनतेला आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता जो जमीन रूपांतर आराखडा तयार केला आहे, तो 17 ऑक्टोबरपूर्वी रद्द करावा; अन्यथा त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी पेडण्यातील जनता भव्य मोर्चा काढेल, असा इशारा पेडणे बचाव अभियानातर्फे विर्नोडा-पेडणे येथे जाहीर सभेत देण्यात आला. हा आराखडा रद्द करण्यासाठी 17 तारखेपर्यंतची मुदत देण्यात आली असून, पुढील 5 दिवसांत राज्य सरकार त्यावर काय निर्णय घेते ते पाहावे लागणार आहे.

पेडणे बचाव अभियानतर्फे विर्नोडा येथील माऊली मंदिराच्या पटांगणात भव्य सभेचे आयोजन केले होते. विर्नोडा पंचायत क्षेत्रातील विर्नोडा ते मानशीपर्यंत एकूण 15 मीटर रुंदीचा रस्ता जमीन रूपांतर आराखड्यात दाखवण्यात आलेला आहे. आणि या रस्त्यामुळे 45 घरे आणि 7 मंदिरे नष्ट होतील. त्या संदर्भात जनजागृतीसाठी आणि आराखडा रद्द व्हावा, या मागणीसाठी या सभेचे आयोजन केले होते.

यावेळी व्यासपीठावर मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, मांद्रेचे सरपंच अमित सावंत, विर्नोडाच्या सरपंच सुजाता ठाकूर, माजी सरपंच सिताराम परब, पंच स्वाती मालपेकर, हरमलचे सरपंच बर्नाड फर्नांडिस, माजी सरपंच डॅनियल डिसोजा, आगरवाड्याचे सरपंच अँथनी फर्नांडिस, पालयेचे पंच सागर तिळवे, ॲड. प्रसाद शहापूरकर, दयानंद मांजरेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.
पेडणे तालुक्याचा जमीन रूपांतर आराखडा जो नगरनियोजनमंत्र्यांनी स्थगित ठेवलेला आहे, तो कायमस्वरूपी रद्द करावा, अशी जोरदार मागणी या सभेत करण्यात आली. केवळ विधानसभेवर धडक नव्हे, तर 17 ऑक्टोबरपूर्वी सरकारने हा आराखडा कायमस्वरूपी रद्दबातल केला नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मोर्चा नेण्याचा इशारा देण्यात आला.

लोकांना कशा प्रकारचा आराखडा हवा आहे, याविषयी सरकारने आणि नगरनियोजन खात्याने अगोदर लोकांची मते जाणून घेतली पाहिजेत. लोकांना हवा तसा आराखडा तयार करावा, आमचा विकासाला विरोध नाही. येथील जवळपास सर्वच्या सर्व जमीन नो डेव्हलपमेंट झोनमध्ये आहेत, ते क्षेत्रही रूपांतरित करणे कितपत योग्य आहे, असा सवाल जीत आरोलकर यांनी केला.

मांद्रेतील जनता स्वाभिमानी जनता आहे. आमच्या लोकप्रतिनिधीला सरकारने हीन दर्जाची वागणूक दिली, तर आम्ही कदापि सहन करणार नाही. जीत आरोलकर यांच्या फार्म हाऊसला नोटीस पाठवण्याचा जो इशारा दिला, त्याला आम्ही भीक घालत नाही; परंतु त्यांच्यावर कारवाई झाली, तर मांद्रे जनता गप्प बसणार नाही, असा इशारा अमित सावंत यांनी दिला.

जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका : आरोलकर
जमीन रूपांतर आराखड्यानुसार विर्नोडा गावात एका बाजूने 15 मीटर रुंदीचा रस्ता आणि दुसऱ्या बाजूने 45 रुंदीचा रस्ता हा खासगी जमिनीतून लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवून तयार केला जाईल, असे दाखवण्यात आले आहे. केवळ 45 घरेच नव्हे, तर या गावातील एका इंचाच्या जमिनीला जरी हात लावला, तर आपण सहन करणार नाही. पेडणे तालुक्यातील जनतेच्या संयमाचा राज्य सरकारने आता अंत पाहू नये आणि ताबडतोब हा आराखडा रद्द करावा, अशी मागणी जीत आरोलकर यांनी केली.