आरसीबीकडून खेळणार झॅम्पा

0
103

इंडियन प्रीमियर लीगमधील फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने केन रिचर्डसन याच्या जागी लेगस्पिनर ऍडम झॅम्पा याचा संघात समावेश केला आहे. यंदाच्या आयपीएल मोसमात झॅम्पा आरसीबी संघाचा भाग असेल. रिचर्डसन याची पत्नी गर्भवती असून आयपीएल काळात तिच्या प्रसुतीची शक्यता असल्याने रिचर्डसन याने स्पर्धेतील अंग काढून घेतले आहे. झॅम्पा याच्या समावेशामुळे आरसीबीचा फिरकी विभाग अजून मजबूत झाला आहे. आरसीबी संघात युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर हे आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी अनुभव असलेले दोन भारतीय फिरकीपटू आहेत. इंग्लंडचा ऑफस्पिनर मोईन अली, भारताचा डावखुरा फिरकीपटू पवन नेगी व नवोदित शाहबाज अहमद हे फिरकी विभागातील आरसीबीचे अन्य पर्याय आहेत.

आयपीएलमध्ये खेळण्याची झॅम्पा याची ही दुसरी वेळ असेल. यापूर्वी झॅम्पाने रायझिंग पुणे सुपरजायंटस्‌कडून खेळताना ११ सामन्यांत १९ बळी घेतले होते. आयपीएलच्या इतिहासातील फिरकीपटूद्वारे सर्वोत्तम १९ धावांत ६ बळी ही कामगिरीदेखील त्याच्या नावावर आहे. मागील वर्षी डिसेंबरमधील लिलावात झॅम्पा याने आपले आधारमूल्य १.५ कोटी ठेवले होते. त्यावेळी त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नव्हता. झॅम्पा व रिचर्डसन हे दोघे सध्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकांसाठी इंग्लंडमध्ये आहेत. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी ३ दिवस असताना त्यांचा हा दौरा संपणार आहे.