आयव्हरमेक्टीन, डॉक्सिसायक्लिन औषधांचा वापर थांबवण्याची सूचना

0
63

>> केंद्राच्या निर्देशांमुळे राज्य सरकारला धक्का

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने कोविड व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांत बदल करून आयव्हरमेक्टीन, डॉक्सिसायक्लिन या औषधांचा कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापर थांबविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे गोवा सरकारला जोरदार धक्का बसला आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच आयव्हरमेक्टीन गोळ्यांचे घरोघरी वितरण करण्याचा निर्णय घेतला होता.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने आयव्हरमेक्टीन, डॉक्सिसायक्लिन यासह हायड्रोक्सिक्लोरोक्विन, जस्त, मल्टीव्हिटॅमिन या औषधांचा रुग्णांवरील उपचारांसाठी वापर थांबविण्याची सूचना केली आहे. आयव्हरमेक्टीन गोळ्यांचा वापर थांबविण्याची सूचना केल्याने गोव्यात खळबळ उडाली आहे. गोवा सरकारने अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून आयव्हरमेक्टीन गोळ्यांचे वितरण करण्याचा निर्णय घेतला होता.

आरोग्य सचिवांकडून अहवाल मागवला : मुख्यमंत्री
या पार्श्‍वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, आरोग्य सचिवांना केंद्राच्या आयव्हरमेक्टीनच्या आदेशाबाबत सविस्तर माहिती सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच, आयव्हरमेक्टीन गोळ्यांच्या खरेदी व वितरणाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. या गोळ्यांची खरेदी आणि वितरणाबाबत तूर्त आपणाकडे माहिती नाही. या गोळ्यांच्या विषयावर राज्य सरकारकडून योग्य निर्णय घेतला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.