आयनॉक्स नूतनीकरणाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण: फळदेसाई

0
276

गोवा मनोरंजन संस्थेच्या चार आयनॉक्स थिएटरच्या नूतनीकरणाचे काम ऑक्टोबर २०२० अखेर पूर्ण होणार असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून चारही थिएटरमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून सिनेमांचे स्क्रिनिंग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती या संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. कोरोना महामारीच्या काळात या चारही थिएटरच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. या थिएटरच्या नूतनीकरणाच्या कामावर राज्य सरकार किंवा गोवा मनोरंजन संस्थेला एक पैसाही खर्च करावा लागलेला नाही. ही थिएटर्स चालविणार्‍या आयनॉक्स कंपनीने सर्व थिएटर्सच्या नूतनीकरणाचे काम केले आहे. या संस्थेला ही थिएटर्स पंधरा वर्षे चालविण्याच्या करारावर देण्यात आली आहेत. या कंपनीकडून दर महिना २० लाख रुपये भाडे दिले जात होते. या भाड्यात वाढ करून ५४ लाख करण्यात आले असून दरवर्षी त्यात ५ टक्के वाढ होणार आहे. चारही थिएटर्समध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आलेली आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.

आयनॉक्स थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठीच्या सध्याच्या तिकीट दरात दुप्पट किंवा तिप्पट वाढ करण्यास मान्यता दिली जाणार नाही. तथापि, थिएटरच्या नुतनीकरणामुळे तिकीट शुल्कात थोडीशी वाढ करण्यास मान्यता दिली जाणार आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.
गोवा मनोरंजन संस्थेने मागील २०१२ ते २०२० या आठ वर्षांच्या काळातील आर्थिक ताळेबंद तयार करून घेण्यात आला असून आयकर खात्याला यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. या संस्थेचे आठ वर्षांचा आर्थिक ताळेबंद तयार करण्यात न आल्याने संस्थेची नोंदणी रद्द झाली होती. संस्थेला दंडापोटी वार्षिक ५० लाख रुपयांचा भरणा करावा लागत होता, असेही फळदेसाई यांनी सांगितले.