आयकॉन ‘कृतिका’

0
151

– प्रा. रामदास केळकर

आज जिथे मोबाइल, इंटरनेटने युवा पिढीला वेड लावले आहे, तिथे एक अंध दिव्यांगना आपल्या कर्तृत्वाने शिक्षणासाठी धडपडते.. तिच्या आवडीच्या क्षेत्रात येण्यासाठी तिला न्यायालयाकडे जावे लागते… हा निष्ठुर दैवदुर्विलास नव्हे का?

ह्याच महिन्यात आपण विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने युवा सप्ताह दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा केला. कुणी व्याख्यान आयोजित केले तर कुणी सामूहिक सूर्यनमस्कारांचे आयोजन केले. १२ जानेवारीला जन्मलेल्या स्वामीजींची उण्यापुर्‍या चाळीस वर्षांची कारकीर्द, पण आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम आपल्या विचारांनी ज्यांनी अढळपद निर्माण केले ते स्वामीजी युवकांचे आयकॉन मानले जातात. आपला देश जास्तीत जास्त युवकांची संख्या असलेला देश. त्यामुळे स्वामीजींची प्रेरणा युवकांना मिळावी हा ह्या सप्ताहाच्या मागचा खरा उद्देश. आपल्याला दिशा दाखविणारा कोणीतरी हवा असतो. स्वामीजींचे चरित्र त्यांचे उद्बोधक मानवतावादी विचार हे योग्य दिशा दाखविणारे आहेत. जगाच्या व्यासपीठावर स्वानुभव आणि गुरु परमहंस ह्यांची शिकवण या दोहोंची सांगड घालून आणि आपल्या देशाचे संचित असलेल्या अध्यात्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे गाठोडे घेऊन त्यांनी ते साता समुद्रापार नेऊन पोचविले. ‘शिवभावे जीवसेवा’ हा मंत्र देणार्‍या स्वामीजींप्रमाणे योग्य दिशेने जाणारे आपल्याला नेहमीच प्रेरणा देणारे ठरतात ह्यात शंका नाही.
काल-परवाच तुम्ही अंधत्वावर मात करून डॉक्टर झालेल्या कृतिका पुरोहित हिची बातमी वाचली असेल. ही बातमी सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. ‘‘उठा, जागे व्हा…’’ हा स्वामीजींचा संदेशच जणू देणारी कृतिकेची वाटचाल आहे. कृतिका ही नालासोपारा येथील शेखर व शाश्वती ह्यांची कन्या. दुर्दैवाने आठव्या वर्षी तिला अंधत्व आले. अंधत्व आलेल्यांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे पण जिद्दी कृतिकाने जे क्षेत्र निवडले ते आगळेवेगळे – चक्क डॉक्टरी! अंधत्वाची प्रतिकूलता आठव्या वर्षापासून सोबत घेत कृतिकाने अतिशय जिद्दीने, निग्रहाने आपले शिक्षण चालू ठेवले. अंध मंडळीना शिकण्यासाठी मदत करणार्‍या अनेक संस्था आहेत, उपकरणे आहेत. नेब नावाची संस्था अशा मंडळीना हात, दृष्टी देते. त्यांच्या मदतीने तिने बारावीपर्यंत शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण केले. आता खरे तर अशा मुलीकडून संगीत किंवा बैठ्या खेळासारख्या क्षेत्रात तिने चमक दाखवावी अशी अपेक्षा सर्वसाधारणपणे असते. पण कृतिकेच्या मनात होते डॉक्टर व्हावयाचे. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तिला प्रवेश परीक्षा देणे भाग होते. त्याप्रमाणे तिने सीईटी परीक्षा द्यावयाची ठरविले. पण इथे नियमांच्या चौकटीच्या बादशहांचे आडमुठे धोरण आड आले. ह्या चौकटीमुळे देशातील अनेकांना आपल्या स्वप्नांचा चुराडा करावा लागला आहे. गाईच्या गळ्यात तीस फूट दोरी बांधून तिला चरायला सोडले तर ती ३१ फुटापर्यंत चरायचा प्रयत्न केल्यास तिच्या मानेला हिसका बसणारच पण म्हणून तिने २९ फुटापर्यंत चरू नये का? नियमांची मर्यादा असते ती एका व्यवस्थेच्या रचनेसाठी, तिला दिशा दाखविण्यासाठी. कृतिकाची शिकण्याची उमेद तिने त्यासाठी घेतलेले प्रयत्न डोळस मंडळीना कसा समजेल? तिने न्यायालयाची दारे ठोठावली. विशेष म्हणजे न्यायालयात तिची बाजू मांडण्याचे काम अंध वकील कांचन पाम्नानी ह्यांनी केले! न्यायदेवतेने तिची बाजू समजून तिच्या बाजूने निकाल देत तिला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. जस्टीस शाह ह्यांनी आपली मानसिकता बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली. अनेक कुटुंबात दिव्यांगना जन्माला येतात, आपण त्यांना नाकारतो का? … असा प्रश्‍न न्यायाधीशांनी उपस्थित केला. कुठे तरी सुरुवात ही केली पाहिजेच ना! एक अडसर दूर झाला होता पण चांगल्या गुणांची अट मागे होती. जिद्दी, मेहनती कृतिकाने तोही अडसर लीलया पार करीत दिव्यांगनासाठी राखीव असलेल्या यादीत ती चांगल्या गुणांनी तिसरी आली. नियम-बहाद्दूराना एकप्रकारे तिने कृतीतून चपराक दिली होती. सीईटीचा अडसर दूर झाला होता. आपल्या श्रमांवर, प्रयत्नावर तिचा पूर्ण विश्वास होता. तिला व्हायचे होते डॉक्टर, तेही ‘फिजिओथेरपिस्ट’. पुन्हा नियमांचे बादशाह झारीतल्या शुक्राचार्याप्रमाणे आड आले. म्हणे डॉक्टरी शिक्षणात प्रात्यक्षिके असतात तिला कसे जमणार? ई… कुस्कुटे त्यांनी पुढे आणली. पण जिद्दी कृतिकाने हार मानली नाही. कोर्टाचा अनुभव तिने घेतला होताच. पुन्हा एकदा तिने न्यायदेवतेकडे जायचे ठरविले. न्यायदेवता पुन्हा कृतिकेच्या मागे ठाम राहिली आणि तिचा फिजिओथेरपीस्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला. कृतिकेने मिळालेल्या संधीचा लाभ घेत मुंबईतील सेठ जी एस मेडिकल कॉलेजमधून रीतसर शिक्षण घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन नियम-बहाद्दूराना गप्प केले.
कुठल्याही राष्ट्राची योग्यता, पुढारपण तिच्या लोकसंख्येवर ठरत नसते तर त्या राष्ट्रात युवाशक्ती किती आहे… ह्यावर त्याची मदार असते. राष्ट्राचे सुकाणू युवकांच्या हाती असेल तर ते राष्ट्र प्रगतीपथावर जायला कोणतीच अडचण येत नाही. सुदैवाने ज्या स्वामीजींनी युवकांना ‘‘उठा, जागे व्हा! राष्ट्र बलशाही करा..!’’ असे आवाहन केले होते त्या महान देशाची सर्वाधिक लोकसंख्या तरुणांनी व्यापलेली आहे. अशावेळी युवकांना जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. विशेष करून शिक्षणाच्या प्रांतांत जुनी मळकट विचारसरणी बदलून उदार धोरण राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी नियम देखील शिथिल केले पाहिजे. थोर गणितज्ञ रामानुजनना ह्याच बुरसटलेल्या नियमांच्या चौकटीने नापास ठरविले होते, प्रवेश नाकारला होता. आता त्याच गणितज्ञाचा चित्रपट दाखवून आपण युवकांना गणिताचे आकर्षण निर्माण व्हावे म्हणून प्रयत्न करत आहोत हा नियमांचा पराभव नाही का? आज जिथे मोबाइल, इंटरनेटने युवा पिढीला वेड लावले आहे, तिथे एक अंध दिव्यांगना आपल्या कर्तृत्वाने शिक्षणासाठी धडपडते.. तिच्या आवडीच्या क्षेत्रात येण्यासाठी तिला न्यायालयाकडे जावे लागते… हा निष्ठुर दैवदुर्विलास नव्हे का? आपण युवकांना स्वत:त बदल घडविण्यासाठी व्यासपीठावरून आवाहन करतो पण इथे केवळ युवकच नव्हे तर जे नियम करतात त्यांनी देखील बदलायला नको का?

‘‘बदल जावो वक्त के साथ या खुद बदलना सिखो
सच्चाईको मत कोसो हर हाल मे चलना सिखो|’’

ह्या उक्तीप्रमाणे प्रयत्न करणार्‍या कृतिकासारख्या अनेकजणी आहेत. बहुतेकांना नियमांचे शुक्राचार्य अडचणी आणत असतील. त्यांच्यापर्यंत ह्या ओळी कधी जातील? .. हे तो परमेश्वरच जाणे! कृतिकेचा प्रवास तमाम डोळसांनाही तेवढाच प्रेरणा देणारा आहे.