आयकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया आता सोपी

0
142

>> करदात्यांच्या सोयीसाठी आयकर विभागाकडून नवीन पोर्टल सुरू

करदात्यांच्या सोयीसाठी आयकर विभागाने काल नवीन ई-फायलिंग पोर्टल लॉंच केले. ुुु.ळपलेाशींरु.र्सेीं.ळप ही आयकर विभागाची नवीन वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आयटीआर दाखल करण्यासह इतर सर्व महत्त्वाची कामे करता येणार आहेत. हे नवीन पोर्टल सुरू झाल्यामुळे करदात्यांसाठी आयकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ होणार आहे. तसेच या पोर्टलवर सर्व कामे जलदगतीने करता येणार आहेत.

नवीन ई-फाइलिंग पोर्टलद्वारे करदात्यांना एक आधुनिक आणि अखंड सेवा प्रदान करणे, हे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) उद्दिष्ट आहे. या पोर्टलमध्ये आयकर विभागाशी संबंधित इतर महत्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे करदात्यांना लवकरच परतावा मिळण्यास मदत होईल. हे पोर्टल लॉंच झाल्यानतंर काही दिवसांनी आयकर विभाग याबाबतचे एक नवे मोबाईल ऍपही सुरू करणार आहे. तसेच १८ जूनपासून नवीन कर देय प्रणाली सुरू केली जाणार आहे.

ई-फायलिंग पोर्टल नेमके काय आहे?
ई-फायलिंग पोर्टल करदात्याला आयकर विवरणपत्र भरण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी, अपील करण्यासाठी आणि त्याचप्रकारे तक्रार नोंदविण्यासाठी, परतावा आणि अशा बर्‍याच कामासाठी वापरता येणार आहे. आयकर विभागाकडून या पोर्टलचा वापर नोटीस पाठवण्यासाठी, करदात्याकडून उत्तर मिळवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी देखील केला जाणार आहे.

कोणकोणत्या सुविधा मिळणार?
या पोर्टलमध्ये अपलोड केलेली सर्व कागदपत्रे, राहिलेली कामे करदात्याला एकाच डॅश बोर्डवर दिसतील. नवीन आयकर पोर्टल हे आयकर रिटर्नच्या प्रोसेसिंग पोर्टलने जोडण्यात येईल. जेणेकरून करदात्याला त्वरित कर परतावा मिळेल. आयटीआर भरण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सॉफ्टवेअर उपलब्ध केले जाईल. करदात्याला आयकराचे ज्ञान नसताना आयकर भरण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून आधीच भरलेला डेटा सॉफ्टवेअरमध्ये असेल, जेणेकरून कमीत कमी डेटा भरावा लागेल. कोणत्याही करदात्याला त्याचे प्रोफाईल सक्रियपणे अपडेट करता येणार आहे. त्याचा उपयोग आयटीआर दाखल करण्यासाठी केला जाईल. टीडीएस आणि एसएफटी तपशील अपलोड झाल्यानंतर पगाराचे उत्पन्न, व्याज, लाभांश आणि भांडवली नफ्यासह प्री-फिलिंगची सोय या पोर्टलमध्ये उपलब्ध असेल.

करदात्यांसाठी नवीन कॉल सेंटर
करदात्याच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी नवीन कॉल सेंटर देखील सुरू केले जाणार आहे. करदात्यांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न, उपयोगकर्ता नियमावली, व्हिडिओ यासारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच इतर काही समस्या असल्यास चॅटबॉट आणि लाईव्ह एजंटशी बोलण्याची सुविधा देखील मिळेल. करदाता आणि इतर भागधारकांसाठी हा एक नवीन उपक्रम असेल; परंतु सुरुवातीच्या काळात येणार्‍या काही समस्यांना सामोरे जावे लागेल.