आयएसएल होणार गोव्यात

0
570

इंडियन सुपर लीगचा आगामी मोसम गोव्यात खेळविला जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून या मोसमाची सुरुवात होणार आहे. फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बांबोळी येथील ऍथलेटिक स्टेडियम व वास्को येथील टिळक मैदानावर या स्पर्धेतील सामने खेळविले जाणार आहेत. संपूर्ण स्पर्धा प्रेक्षकांविना होणार आहे.

फुटबॉल स्पोर्टस् डेव्हलपमेंट लिमिटेडने काल रविवारी यासंबंधी अधिकृत घोषणा केली. गोवा क्रीडा प्राधिकरण, गोवा फुटबॉल असोसिएशन व राज्य सरकारशी समन्वय साधून सुरक्षित वातावरणात स्पर्धेच्या आयोजन केले जाईल, असे ‘एफएसडीएल’ने म्हटले आहे. एफएसडीएलने गोव्यातील तिन्ही स्टेडियम्समधील पायाभूत सुविधाची पाहणी केली असून मैदानाची स्थिती सुधारणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी सुविधा उभारणे, विद्युतझोतांची डागडुजी, खेळाडूंचे ड्रेसिंग रुप आदींचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. आशियाई फुटबॉल कॉन्फडरेशनने यंदाच्या मोसमापासून १२ संघांची स्पर्धा आयोजित करण्यास सांगितले होते. परंतु, कोरोनामुळे यंदाच्या मोसमासाठी यातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ १० संघांची स्पर्धा यावेळी होईल. एटीके-मोहन बागान हा नवीन संघ प्रथमच यंदाच्या मोसमात खेळताना दिसणार आहे.

मँचेस्टर सिटी या क्लबची मालकी असलेल्या सिटी फुटबॉल ग्रुपने ताबा मिळवल्यानंतर मुंबई सिटी एफसी या स्पर्धेत प्रथमच नवीन मालकाच्या खाली खेळणार आहे.