आयएसएल अंतिम सामना प्रेक्षकांविना खेळविणार

0
133

>> कोरोनामुळे निर्णय

>> कोरोना ः गोमेकॉत आणखी एक संशयित दाखल

कोरोना विषाणूच्या (कोविड -१९) पार्श्‍वभूमीवर फातोर्डा मडगाव येथील स्टेडियमवर येत्या शनिवार १४ मार्च रोजी आयोजित इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचा (आयएसएल) अंतिम सामना प्रेक्षकांविना खेळविण्याचा निर्णय आयोजकांकडून काल घेण्यात आला आहे.
आयएसएल स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी हजारो फुटबॉलप्रेमी एकत्र येणार असल्याने आयोजक प्रेक्षकांच्या आरोग्य सुरक्षेबाबत धोका पत्करू इच्छित नाहीत. त्यामुळे सामना प्रेक्षकाविना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सामन्याची तिकीट विकत घेतलेल्या नागरिकांना तिकिटाची रक्कम परत केली जाणार आहे. अंतिम सामना एटीके एफसी विरुद्ध चेन्नई एफसी यांच्यात खेळविला जाणार आहे.

राज्यात कोरोना विषाणूबाधेच्या (कोविड -१९) आणखी एका रुग्णाची नोंद काल झाली. गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलच्या खास कोरोना वॉर्डात ३ कोरोना संशयितांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य खाते या रुग्णांच्या रक्त तपासणी अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. आत्तापर्यंत राज्यात कोरोना विषाणूचा एकही निश्‍चित रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये बुधवार ११ रोजी संध्याकाळपर्यंत दोन कोरोना संशयितांना दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री आणखीन एका कोरोना संशयास्पद व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आले. आरोग्य खात्याकडे गुरुवार १२ मार्चला तीन प्रवाशांनी निरीक्षणासाठी नोंदणी केली आहे. आरोग्य खात्याच्या निरीक्षणाखाली ३६ प्रवासी होते. आरोग्य खात्याकडून आत्तापर्यंत ८६ प्रवाशांचे घरातच निरीक्षण केले जात आहे.

केतवन संगीत महोत्सव कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. या संगीत महोत्सवात देश- विदेशातील कलाकार सहभागी होतात. आरोग्य सुरक्षेच्या कारणावरून हा संगीत महोत्सव पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. या संगीत महोत्सवाची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे, असे संयोजकांनी कळविले आहे.