आयएसएलच्या सातव्या पर्वाला आजपासून प्रारंभ

0
95

>> एटीके मोहन बागान-केरला ब्लास्टर्स यांच्यात शुभारंभी लढत

एटीके मोहन बागान-केरला ब्लास्टर्स यांच्यात जीएमीसी-बांबोळी स्टेडियमवर होणार्‍या लढतीने सातव्या हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेला आज प्रारंभ होणार आहे.
निष्ठावान चाहत्यांचा पाठिंबा, चुरशीच्या लढतींचा इतिहास, स्टार खेळाडूंचा भरणा आणि धूर्त प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असे समान दुवे असलेले संघ आमनेसामने येतील. त्यामुळे या लढतीने लीगला जोरदार प्रारंभ होण्याची अपेक्षा आहे.

सुमारे आठ महिन्यांच्या खंडानंतर भारतात सुरू होत असलेली ही पहिली मोठी क्रीडा स्पर्धा असेल. सलामीच्या लढतीत हे दोन संघ आमनेसामने येण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. पहिल्या दोन लढतींमधील विजयामुळे दोन वेळचा उपविजेता ब्लास्टर्स तिसर्‍या वेळी बाजी मारणार का याची उत्सुकता आहे.

या दोन संघांतील मागील लढतीपासून बरेच काही बदलले आहे. ब्लास्टर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून एल्को शात्तोरी यांच्याकडून किबू व्हिकुना यांच्याकडे सूत्रे आली आहेत. त्यामुळे ब्लास्टर्सच्या कामगिरीचा अंदाज बांधणे अवघड असेल. गेल्या मोसमात व्हिकूना यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन बागानने आय-लीग विजेतेपद पटकावले. या संघाने आक्रमक शैलीचा खेळ प्रदर्शित केला. आता आधीच्या क्लबविरुद्ध आपली क्षमता सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

स्पेनच्या व्हिकुना यांनी सांगितले की, बागानविषयी माझ्या भावना नेहमीच चांगल्या असतील. मी एक मोसम त्यांच्याकडे होतो आणि त्यांनी मला चांगली वागणूक दिली. संचालक मंडळात माझे बरेच मित्र आहेत, पण आता मी ब्लास्टर्समध्ये येऊन आनंदात आहे. येथील पदाधिकार्‍यांनी माझे चांगले स्वागत केले. मी सर्वोत्तम कामगिरी करेन. क्लबच्या सदस्यांशी माझे चांगले संबंध आहेत. उत्तम खेळ करण्यासाठी प्रयत्नशील असलेला चांगला संघ घडविण्याचा आमचा प्रयत्न असेल.
दुसरीकडे गतविजेता आणि एकूण तीन वेळचा विजेता एटीके यंदाही संभाव्य विजेता असेल. अँटोनिओ लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघ आणखी भक्कम करण्यात आला आहे. हबास यांनी सांगितले की, व्हिकुना यांनी बागानसाठी चांगली कामगिरी बजावली, पण आयएसएल ही वेगळी स्पर्धा आहे. मला त्यांच्याविषयी आदर वाटतो, पण तीन गुण मिळविण्याचा आमचा निर्धार आहे. दररोज त्यासाठीच आम्ही कसून सराव करीत असतो.

स्पेनचे हे दोन प्रशिक्षक आमनेसामने येत आहेत. त्यांच्याकडे स्टार खेळाडूंची कमतरता नाही. त्यामुळे कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्याच्या नव्या निर्बंधांनुसार होत असलेल्या लढतीत चाहत्यांना चुरशीच्या खेळ पाहता येईल. हे दोन्ही संघ नेहमीच दर्जेदार खेळ करतात. मोसमाचा प्रारंभ करण्यास याहून सरस लढत असू शकत नाही.

आयएसएलसह आज देशात फुटबॉलचे पुनरागमन
७व्या हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या पुनरागमनासह करोनाच्या जागतिक संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील फुटबॉलचे पुनरागमन होत आहे. शुक्रवारी गोव्यातील बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर केरला ब्लास्टर्स आणि एटीके मोहन बागान यांच्यात शुभारंभी लढत होणार आहे.

मार्च महिन्यात सहाव्या हिरो आयएसएलचा अंतिम सामना एटीके आणि चेन्नईन यांच्यात झाला तेव्हा देशभर कोरोना महामारीचा संसर्ग वाढला होता. त्यामुळे लीगचा अंतिम सामना प्रेक्षकांशिवाय बंदिस्त स्टेडियममध्ये खेळवावा लागला होता. सामान्य जीवन ठप्प होण्यापूर्वी झालेली ती एक अखेरची क्रीडा स्पर्धा ठरली होती.

आता सुमारे आठ महिन्यांच्या कालावधीनंतर आयएसएलचे देशात पुनरागमन होत आहे. त्यामुळे देशात पुनरागमन करीत असलेली पहिली मोठी क्रीडा स्पर्धा ठरली आहे. या स्पर्धेला स्टेडियममध्ये प्रेक्षकांची उपस्थिती नसेल. जैव-सुरक्षित विभागात गोव्यात सर्व संघ खेळतील. यंदा हीच एक बाब वेगळी नाही. यंदा एका संघाची भर पडली असून ही आजवरची सर्वांत मोठी आयएसएल ठरेल. एससी ईस्ट बंगालच्या पदार्पणासह सहभागी संघांची संख्या एकने वाढून ११ झाली आहे, तर एकूण सामने ९५ वरून ११५ पर्यंत वाढले आहेत.

ईस्ट बंगालचे पदार्पण होईल, तर एटीके-मोहन बागान यांचे विलिनीकरण झाले आहे. त्याबरोबरच भारतीय फुटबॉलमधील सर्वाधिक ऐतिहासिक वारसा असलेले दोन संघ आयएसएलमध्ये प्रथमच आमनेसामने येतील. ही बहुचर्चित कोलकता डर्बी २७ नोव्हेंबर रोजी रंगेल. दोन्ही संघांमधील खेळाडू आणि चाहत्यांची उत्सुकता तेव्हा ताणलेली असेल.

ईस्ट बंगालने भरती केलेला नॉर्विच सिटीचा स्टार अँथनी पिल्कींग्टन याने सांगितले की, स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा डर्बी तसेच ही लढत किती प्रतिष्ठेची असेल याबद्दल आम्हाला सांगण्यात आले. साहजिकच मोसमाचा प्रारंभ होण्यासाठी मी आतूर झालो आहे. ही स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरेल याची मला खात्री आहे.

चाहत्यांना आपल्या दूरचित्रवाणी संचाच्या पडद्यावर अनेक नवे स्टार पाहायला मिळतील. रिडिंगचा माजी स्ट्रायकर ऍडम ली फॉंड्रे, न्यूकॅसल युनायटेडचा बचावपटू स्टीव्हन टेलर अशा खेळाडूंनी भारत दौरा करण्याचा निर्णय घेतला. गतमोसमात सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत संयुक्त अव्वल स्थान मिळविलेला नेरीयूस वॅल्सकीस आता जमशेदपूर एफसीमध्ये दाखल झाला आहे. भारताचा भक्कम बचावपटू संदेश झिंगान याने एटीके मोहन बागानशी करार केला आहे. असे काही खेळाडू नवी जर्सी परिधान करतील.

फातोर्डा येथील जवालरलाल नेहरू स्टेडियम, वांबोळी येथील जीएमसी स्टेडियम आणि वास्को येथील टिळक मैदान येथे सामने होतील. चाहते स्पर्धेचा थरार घरात बसून टीव्हीवर लुटणार असले तरी गोव्यातील तीन स्टेडियमवर त्यांची गैरहजेरी जाणवणार नाही. नावीन्यपूर्ण अशा फॅन वॉल संकल्पनेमुळे घरच्या मैदानावर गर्दी करणारे स्थानिक तसेच प्रतिस्पर्धी संघाचे समर्थक प्रोत्साहन देण्यास उपस्थित असतील. स्टेडियमवर दोन एलईडी स्क्रीन लावण्यात येतील. त्यामुळे दोन्ही संघांना प्रोत्साहन मिळेल.