आयआयटीच्या जागा निश्‍चितीसाठी सरकारतर्फे खास समितीची नियुक्ती

0
86

राज्य सरकारने आयआयटी संकुलासाठी जागा निश्‍चित करण्यासाठी खास समितीची नियुक्ती केली आहे.
राज्य सरकारने आयआयटी संकुल उभारण्यासाठी मेळावली सत्तरी येथे जमीन उपलब्ध केली होती. त्याठिकाणी आयआयटी संकुल उभारण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला. स्थानिकांनी नऊ महिने आंदोलन करून सरकारला आयआयटी संकुल रद्द करण्यास भाग पाडले. यापूर्वी काणकोण तालुक्यात आयआयटी संकुल उभारण्यास विरोध करण्यात आला. त्यानंतर सांगे तालुक्यात आयआयटी संकुलासाठी जागेचा शोध घेण्याचे काम सुरू असताना राज्य सरकारने मेळावली सत्तरी येथील जागा आयआयटी संकुलासाठी उपलब्ध करून दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मेळावली गुळेली येथील आयआयटीसाठीची जागा स्थगित जाहीर केल्यानंतर आयआयटी संकुलासाठी नवीन जागा निश्‍चित करण्यासाठी खास समितीची नियुक्ती करण्याची घोषणा केली होती.
या खास समितीमध्ये दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महसूल सचिव, शिक्षण सचिव, तांत्रिक शिक्षण खात्याचे संचालक, लॅण्ड रेकॉर्ड ऍण्ड सेटलमेंटचे संचालक, वन खात्याचे प्रतिनिधी आणि आयआयटी गोवा संचालनालयाच्या प्रतिनिधीचा समावेश आहे.

सरकारने नियुक्त केलेली ही समिती आयआयटी संकुल उभारण्यासाठी योग्य जागेची निवड करून सरकारला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.