आम आदमी पक्षाचे राघव चड्‌ढा गोव्यात

0
120

गोवा विधानसभा निवडणुका आठ महिन्यानंतर येऊन ठेपलेल्या असल्याने आता विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठीच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. काल आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्‌ढा यांचे गोव्यात आगमन झाले. विमानतळावरून बाहेर येतानाच त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपण शनिवारी (आज) गोव्यात एक मोठी पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेतून एक मोठी घोषणा करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यासंबंधी अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. गोव्यातील राजकारणाविषयी बोलताना ते म्हणाले की राज्यातील जनता ही कॉंग्रेस तसेच भाजप या दोन्ही पक्षांना कंटाळलेली आहे. कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येणारे आमदार हे आपला पक्ष सोडून भाजपात सामील होऊ लागलेले असल्याने लोकांना कॉंग्रेसविषयी तिटकारा निर्माण झालेला आहे. भाजप दुसर्‍या पक्षांचे आमदार फोडू लागला असल्याने भाजपविषयीही जनतेमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.