आमोणा पुलावरून बहिणींचा आत्महत्येचा प्रयत्न

0
128
नीता गावस

एकीला वाचवण्यात यश; एक बेपत्ता
मोर्ले-गुळ्ळे येथील दोघा सख्ख्या बहिणींनी आमोणा पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पैकी एका बहिणीला वाचवण्यात यश आले तर दुसरी बेपत्ता आहे. काल दुपारी २.४५ वा. च्या सुमारास हा प्रकार घडला.
नीता गावस व सुजाता गावस असे या बहिणींचे नाव असून पैकी नीता गावस ही अजून बेपत्ता आहे तर सुजाता गावस हिला वाचविण्यात यश आले. नीता हिचा रात्री उशिरापर्यंत शोध चालू होता. नीता ही २० वर्षांची असून ती साखळी महाविद्यालयात शिकत आहे तर सुजाता ही १७ वर्षांची अजून साखळीत उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे.
काल दुपारी दोघा बहिणींनी उडी घेतल्यानंतर नीता ही पाण्यात खोलवर गेली तर सुजाता पाण्यात तरंगत राहिली. तिला आमोणा पुलाखाली रेती काढणार्‍यांनी पाहिली व पाण्याबाहेर काढली. त्यानंतर तिला बांबोळी येथे गोमेकॉत पाठविण्यात आले. तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
दरम्यान, सुजाता गावस हिने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटल्यानुसार, सकाळी उठल्या नाहीत म्हणून त्या दोघींना भावाने मारले त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
आई तीन भाऊ व चार बहिणी असे हे एकुण कुटुंब आहे. पैकी दोन बहिणींची लग्ने झाली असून दोन भाऊ लग्न होऊन वेगळे राहतात. एका भावाकडे आईसह या दोन्ही बहिणी राहतात. मिळालेल्या माहितीनुसार गेले दोन दिवस या दोघी घरी जेवल्या नव्हत्या व आपल्याच विचारात असायच्या. काल घरून जाताना आपल्या अंगावरील दागिने त्या घरीच ठेऊन गेल्या होत्या.
या प्रकरणी अधिक तपास फोंडा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश गावडे करीत आहेत.