आमदार पालयेकरांकडून मुख्यमंत्र्यांच्या आरोपांचे खंडन

0
243

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादई प्रश्‍नी केलेल्या आरोपांचे माजी जलस्रोत मंत्री तथा शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी खंडन केले असून मुख्यमंत्र्यांचे लक्ष भलतीकडे असल्याने म्हादईचे पाणी वळविण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला पर्यावरण दाखला दिला आहे, असा दावा माजी जलस्रोत मंत्री पालयेकर यांनी काल केला.

जलस्रोत खात्याचा कार्यभार सांभाळताना म्हादईच्या प्रश्‍नाकडे जास्त लक्ष केंद्रित होते. म्हादई येथे पाणी वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी स्फोटक वातावरणात घटनास्थळी जाऊन स्थानिक जिल्हाधिकार्‍याच्या साहाय्याने काम बंद पाडण्याचे काम केले होते. तसेच म्हादई लवादाच्या ४ ते ५ सुनावण्यांच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून देखरेख ठेवण्याचे काम केले होते. म्हादई प्रश्‍नी बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ ऍड. आत्माराम नाडकर्णी यांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याने ही आगळीक करण्यात आली आहे. ऍड. नाडकर्णी यांची नियुक्ती रद्द करणे ही घोडचूक झालेली आहे. म्हादईच्या प्रश्‍नाकडे योग्य लक्ष असल्याने लवादाचा निवाडा चांगला लागल्याचा दावा पालयेकरांनी केला.