आमदार अपात्रता; सभापती मंगळवारी घेणार सुनावणी

0
169

गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर येत्या मंगळवारी २० एप्रिल २०२१ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर सुनावणी घेणार आहेत. आमदार अपात्रता याचिकेवर सभापती २० एप्रिलला निवाडा जाहीर करतील, असे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले आहे.

गोवा विधानसभेच्या सभापतींनी कॉंग्रेसचे गिरीश चोडणकर आणि मगोपचे ज्येष्ठ नेेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवर २९ एप्रिल २०२१ रोजी निवाडा देण्याचे जाहीर केले होते. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणी लवकर निवाडा देण्याचे सूचित केले. त्यानुसार, सभापतींकडून आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी २० एप्रिल रोजी ठेवली आहे. सभापतींनी आमदार अपात्रता प्रकरणातील याचिकांवर अनेकदा सुनावणी घेतलेली आहे. सभापतींकडून आमदार अपात्रता प्रकरणी कोणता निवाडा दिला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणी २२ एप्रिल २०२१ रोजी सुनावणी निश्‍चित करण्यात आलेली आहे.