राज्यसभेच्या सात खासदारांनी राघव चढ्ढा यांच्या नेतृत्वाखाली नुकताच आम आदमी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला हा मोठा झटका आहे. राघव चढ्ढा यांची भाजपाशी जवळीक ‘आप’च्या नेतृत्वानी आधीच हेरली होती आणि त्यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटविलेही होते, परंतु त्यांच्यासोबत पक्षाचे एवढे खासदार जातील ह्याची सुतराम कल्पना केजरीवाल यांना आली नाही हे मात्र खरे. राघव चढ्ढा फार तर राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील ह्या भ्रमात केजरीवाल व त्यांचा पक्ष राहिला. मात्र, चढ्ढा यांनी पक्षाच्या एकूण दहा राज्यसभा खासदारांपैकी सहाजणांना आपल्यासोबत घेत अधिकृत पक्षांतरासाठी आवश्यक असलेल्या दोन तृतीयांशची अट सहजगत्या पूर्ण केली हे केजरीवाल यांच्यासाठी धक्कादायक होते. ज्या सहाजणांना चढ्ढा यांनी सोबत घेतले त्यात त्यांच्या उपनेतेपदावरून हकालपट्टीनंतर केजरीवाल यांनी ज्यांना उपनेते बनवले होते ते अशोक मित्तल यांचाही समावेश आहे. गमतीचा भाग म्हणजे केजरीवाल यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर ते मित्तल यांच्याच निवासस्थानी गेले वर्षभर सहकुटुंब राहत होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी ते निवासस्थान सोडले आणि त्यांना हा हादरा बसला. मित्तल यांच्या पक्षांतरामागे त्यांच्यावर गेल्या 15 एप्रिलला पडलेला ईडीचा छापा हेच कारण असावे असे स्पष्ट दिसते. चढ्ढा यांनीच मित्तल यांना घाबरवण्यासाठी ईडीचा छापा टाकायला लावला असे आता ‘आप’ म्हणते आहे आणि ती शंका रास्त आहे. पक्षांतर करणाऱ्यांमध्ये विक्रमजित साहनी हेही एक उद्योगपती आहेत. त्यामुळे ईडीच्या भीतीने त्यांनाही ग्रासले असावे. पक्षांतर करणाऱ्यांपैकी स्वाती मालिवाल यांचा केजरीवाल यांच्याशी उघडपणे खटका उडाला होता. स्वाती मलिवाल या केजरीवाल यांना भेटायला गेल्या असता त्यांना मारहाण झाली होती. पक्षांतर करणाऱ्यांतर क्रिकेटपटू हरभजनसिंग हेही आहेत. त्यांच्या पक्षांतराचे कारण गुलदस्त्यात आहे. सर्वांत आश्चर्यकारक पक्षांतर आहे ते संदीप पाठक यांचे. आजवर आम आदमी पक्षाचे ‘चाणक्य’ म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाई. येत्या पंजाब विधानसभा निवडणुकीची रणनीती तेच ठरवणार होते. अशा नेत्याचे पक्षांतर ‘आप’ ला हादरवून गेले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने किंवा वैयक्तिक फायद्याखातर हे पक्षांतर झाल्याचे आम आदमी पक्ष आता म्हणत असला, तरी केवळ तेवढ्याच कारणाने पक्षांतराच्या ह्या निर्णयापर्यंत एवढे सगळे नेते आले असे म्हणता येणार नाही. केजरीवाल यांची नेतृत्वशैली व पक्षाची कार्यपद्धती यामुळे आजवर अनेक नेत्यांचा भ्रमनिरास झाला. प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, कुमार विश्वास, आशुतोष, शाझिया इल्मी, कैलाश गेहलोत, सत्येंद्र जैन अशी भ्रमनिरास होऊन पक्षाबाहेर गेलेल्या नेत्यांची नामावली मोठी आहे. राघव चढ्ढा हा त्यातील नवा अध्याय आहे. एकेकाळी आम आदमी पक्षाचे पोस्टर बॉय गणले जाणारे चढ्ढा भाजपमध्ये जाणे हे ‘आप’साठी अडचणीचे ठरेल. राज्यसभेच्या दहापैकी सात खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश आम आदमी पक्षासाठी मोठी आव्हाने घेऊन आला आहे. पक्षापाशी आता केवळ राज्यसभेचे तिघे खासदार उरले आहेत, ज्यापैकी दोघे दिल्लीचे, तर एक पंजाबचे आहेत. ज्यांनी पक्षांतर केले, त्यापैकी काहींच्या पक्षांतराच्या शक्यतेचा सुगावा पक्षाला लागला होता आणि त्यासंदर्भात केजरीवाल सर्वांसमवेत बैठकही घेणार होते. काहींना पंजाब विधानसभेची उमेदवारी देण्याचेही घाटत होते. परंतु राघव चढ्ढा यांनी भाजपच्या साथीने त्वरेने हालचाल केल्याने त्या बैठकीपूर्वीच हे पक्षांतर घडल्याचे दिसले. आता येणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठे आव्हान निर्माण होईल. पंजाब हे एकमेव राज्य आज आम आदमी पक्षाच्या हाती उरले आहे. तेथील अनेक आमदारही भाजपच्या वाटेने जाण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून आम आदमी पक्षाच्या प्रतिमेलाही मोठा तडा गेला आहे. राज्यसभेत तर पक्षाचे स्थान आता नगण्य उरले आहे. दिल्लीतील सत्ता गमावल्यानंतर पक्षाच्या पुनरूज्जीवनासाठी केजरीवाल प्रयत्न करणार होते, परंतु त्यातील बिनीचे शिलेदारच त्यांच्यापासून आता दूर गेले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आम आदमी पक्षावर सध्या पक्षविस्ताराऐवजी पक्षाच्या अस्तित्वासाठीच लढण्याची वेळ ओढवली आहे. भारतीय राजकारणामध्ये मोठे व्यवस्थात्मक परिवर्तन घडवण्याचे आश्वासन मतदारांना देत आम आदमी पक्ष राजकारणात अवतरला होता. परंतु परिवर्तन घडवणे दूरच, हा पक्ष त्या मूल्यऱ्हासाला आणखी खालच्या पातळीवर घेऊन गेला. आता पक्षाच्या उरल्यासुरल्या अस्तित्वात केजरीवाल प्राण कसे फुंकणार हे पाहावे लागेल.