आदर्श

0
57
  • – प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

शिक्षा करणे अथवा सूड घेणे सोपे आहे; पण क्षमा करणे हे सोपे नाही. मन सागराएवढे विशाल आणि भव्य असेल तरच सगळा अपमान आणि सगळी निंदा गिळून टाकण्याची महाशक्ती आपल्यामध्ये येईल.

भारतभूमी सार्‍या विश्‍वासाठी आदर्श भूमी मानली गेली आहे. या भूमीचे आकर्षण संपूर्ण जगाला आहे. ‘इंडिया’ला जाऊन यावे हे स्वप्न पाश्‍चात्त्य राष्ट्रे हृदयाशी कवटाळून असतात. कारण या भूमीच्या इतिहासाची जादू त्यांच्यावर असते. कित्येक मैलांचा प्रवास करून या भूमीला पाय लागल्यावर त्यांना धन्य वाटते. याचे प्रमुख कारण म्हणजे, भारतीयांनी प्राचीन काळापासून प्रत्येक क्षेत्रात जपलेले आदर्श.

आपली जनता पैशांच्या बाबतीत गरीब असेल, परिस्थितीपुढे दुबळी असेल; पण तत्त्वांपुढे आणि आदर्शांपुढे कधीही कमकुवत असणार नाही. मोडेन पण वाकणार नाही, उपाशी राहीन पण झुकणार नाही, घर-दार नसताना झाडाखाली झोपेन पण आत्मसन्मान सोडणार नाही, मरेन पण आपले स्वत्व विकणार नाही, असे उच्च आदर्श या भूमीने जोपासले. देवतांची ही भूमी, पुण्यात्म्यांची ही भूमी, महात्म्यांची ही भूमी. या भूमीला शोभेल अशा आचरणांचा ठेवा कित्येक महापुरुषांनी व महान स्त्रियांनी वारशाच्या रूपाने मागे ठेवलेला आहे.

ज्यांनी-ज्यांनी उच्च जीवनतत्त्वे आणि मूल्ये स्वीकारली आणि जीवनभर त्या मूल्यांचा पुरस्कार केला आणि सर्वसामान्य जनतेला अंतिम सत्याचा मार्ग दाखवला ते या मातीत अजरामर झाले. पैसे आणि धनसंपत्ती कितीही जरी संग्रहित करून ठेवली तरी जाताना कोणीच काही घेऊन जाऊ शकले नाहीत; आणि इथून एकदा गेल्यावर त्याची मालकीदेखील आपल्याकडे ठेवू शकले नाहीत.
आदर्शवाल्यांना आपल्या आदर्शांना चिकटून राहताना त्रास जरूर झाला, अतोनात कष्ट सहन करावे लागले, सर्वस्वाचा त्याग करावा लागला. आपल्यासाठी काहीच बाळगता आले नाही; पण जे आदर्श त्यांनी या भूमीत पेरले आणि स्वतःच्या हातांनी वाढवले ते कसेच वाया गेले नाहीत. कोणालाही ते या जमिनीतून उपटता आले नाहीत अथवा नष्ट करता आले नाहीत. कारण या जगाच्या निर्मात्याचे पाठबळ या आदर्शांना लाभलेले आहे.

हे आदर्श कुठले आणि कसले? तुम्ही हवी तशी निंदा करा. कोण चोर म्हणेल, कोण निर्लज्ज म्हणेल, कोण भिकारी म्हणेल. हवे ते म्हणा. पण मी तसा नाही हे मला माहीत आहे आणि मी कसा आहे हे मी सांगणारच नाही. माझी जी कृती शेवटपर्यंत जगाला दिसेल त्यातूनच जग काय ते ठरवेल. मी माझे स्पष्टीकरण देण्याची गरजच नाही. समजा मी चोर असतो, तर मी चोर नाही हे सिद्ध करण्यासाठी धडपड केली असती. मुळातच जर माझ्या मनात चोर नाही तर कोणीही आरोप केले म्हणून मी चोर ठरू शकणारच नाही. मग का म्हणून मनाला वेदना करून घ्याव्यात? सहनशीलता हा आपला कमीपणा नाही; तर दुष्टालादेखील सावरणारा आणि दुर्जनालादेखील संरक्षण देणारा भारतभूमीचाच हा महान आदर्श आहे.

शिक्षा करणे अथवा सूड घेणे सोपे आहे; पण क्षमा करणे हे सोपे नाही. मन सागराएवढे विशाल आणि भव्य असेल तरच सगळा अपमान आणि सगळी निंदा गिळून टाकण्याची महाशक्ती आपल्यामध्ये येईल.

या भूमीत कसले आदर्श आहेत हा प्रश्‍न विचारण्याऐवजी या भूमीत कसले आदर्श नाहीत ते अगोदर शोधा. क्षणभरदेखील विसावा न घेता दिवसाचे चोवीस तास राब-राब राबणार्‍यांचे आदर्श या भूमीत आहेत. कष्टांचे डोंगर उपसण्याची जिद्द बाळगून मरेपर्यंत हाडे चंदनासारखी झिजवणार्‍यांचे येथे आदर्श आहेत.

मातीत हात-पाय तुडवून इतरांना पोसण्यासाठी अन्न निर्माण करणार्‍या कष्टाळू कर्जबाजारी शेतकर्‍यांचे आदर्श येथे आहेत. स्वतःसाठी अंगभर कपडा नाही; पण इतरांसाठी हातमागावर भराभरा कापड विणणार्‍या अर्धपोटी किंवा उपाशीपोटी गरीब विणकरांचे येथे आदर्श आहेत. विज्ञानाच्या नवनव्या प्रयोगांसाठी आपले जीवन प्रयोगशाळेत बंदिस्त करणार्‍या वैज्ञानिकांचे येथे आदर्श आहेत. सदैव अंधारामध्ये चाचपडत, वादळ-तुफानामध्ये लढत या देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांचे आदर्श येथे आहेत. जनसेवेसाठी तन-मन-धन समर्पित केलेल्या लोकनेत्यांचे आदर्श येथे आहेत; आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी आपले जीवन झोकून देणार्‍या अविवाहित तरुण-तरुणींचे आदर्श याच देशात आहेत.
ज्ञानदान करणारा ज्ञानाचा महापर्वत असा महागुरू कसा असावा याचा आदर्श प्राचीन काळापासून आजपर्यंत ही भारतभूमी जगापुढे ठेवतच आली आहे. हा अभिमान आपण जरूर बाळगावा आणि आपण ही परंपरा अखंडपणे चालू ठेवण्याचा वसा घ्यावा.
आदर्शांची आपल्याला गरजच काय? आदर्शांची पूजा करण्यासाठी आपण पुढे का सरसावतो? आदर्श हेच आपल्या जीवन-निष्ठेचे भूषण आहे. पुढील पिढ्यांना संस्कारांचे अमृत पाजण्यासाठी आदर्श हाच मूलाधार आहे. सदाचाराचा आदर्श हाच पाया आहे.